भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘ब्रह्मोस’

14 Mar 2023 15:40:30
indian-navy-placing-order-to-buy-over-२००-brahmos-supersonic-cruise-missiles-for-its-warships


नवी दिल्ली
:चीनला शह देण्यासाठी भारतीय नौदल सज्ज होत असून, समुद्रातील शक्ती वाढवण्यासाठी २००हून अधिक ’ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ’ क्षेपणास्त्रे खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी नौदल २० हजार कोटी रुपयांचा करार करणार आहे. संरक्षण मंत्रालयात ही प्रक्रिया प्राथमिक अवस्थेत असून, लवकरच या संदर्भात संरक्षण अधिग्रहण परिषदेसोबतही बैठक होणार आहे.

 
‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र हे मुख्य शस्त्र आहे, जे समुद्रात शत्रूच्या जहाजांवर हल्ला करण्यासाठी वापरले जाते. या माध्यमातून स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे युद्धनौकांवर तैनात केली जातील. ‘ब्रह्मोस एरोस्पेस’ भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम आहे.भारतीय नौदल स्वावलंबनाकडे पावले टाकत आहे. क्षेपणास्त्रांव्यतिरिक्त, ‘ब्रह्मोस एरोस्पेस’ पाणबुडी, जहाजे, विमाने आणि ‘लॅण्ड प्लॅटफॉर्म’देखील बनवते.
 
चीनच्या आगळीकीस भारताचे चोख प्रत्युत्तर

भारत-चीनदरम्यान्यच्या वास्तविक नियंत्रण रेषेची (एलएसी) यथास्थिती बदलण्याचा सातत्याने प्रयत्न चीनने केला असला, तरी भारतीय सैन्याने त्यास चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर परिणाम झाला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या वार्षिक अहवालात नमूद केले आहे. सीमाप्रश्नाचा अंतिम तोडगा निघेपर्यंत, सीमावर्ती भागात शांतता राखणे हा द्विपक्षीय संबंधांच्या सर्वांगीण आधार असल्याचे दोन्ही बाजूंचे एकमत आहे.

 
 
Powered By Sangraha 9.0