आत डरकाळी, बाहेर पराभव

    14-Mar-2023   
Total Views |
Mamata Banerjee, Akhilesh Yadav's parties announced to contest the upcoming elections separately


ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांच्या पक्षांनी ते आगामी निवडणुका स्वतंत्ररित्या लढविण्याची घोषणा करुन अप्रत्यक्षरित्या काँग्रेसचे ‘हात’ दाखवून अवलक्षणच केले. त्यातच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव शुक्रवार, दि. १७ मार्च रोजी पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर जाणार असून यावेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची ते भेट घेतील. इकडे उत्तर प्रदेश सोडून सपा शनिवार, दि. १८ मार्चपासून कोलकातामध्ये पक्षाची दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी आयोजित करत आहे. यामध्ये विविध राज्यांतील विधानसभा आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीती ठरवली जाईल. एकूणच ममता आणि अखिलेश यांनी वेळोवेळी एकमेकांना मदतीचीच भूमिका घेतलेली दिसते. २०२१ साली बंगाल विधानसभा निवडणुकीत अखिलेश यांनी ममतांना आपले समर्थन जाहीर केले होते. त्याची परतफेड म्हणून २०२२ साली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ममतांनी अखिलेश यांचा प्रचार केला होता. त्यामुळे दोघेही ‘एकमेका साहाय्य करू’ची भूमिका घेत आले आहे आणि आता आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचे ठरवले आहे. भाजपपेक्षा पंतप्रधान मोदी यांना हटवणे हा यांचा मुख्य अजेंडा. परंतु, यात त्यांना कितपत यश येईल, हादेखील मोठा प्रश्न. कारण, बंगालमध्ये भले ममतांनी टक्क्यांच्या राजकारणात बाजी मारली. परंतु, देशाची लोकसभा निवडणूक म्हणजे बंगाल विधानसभेची निवडणूक नव्हे. ममतांनी २०२४ साली लोकसभा निवडणुकीसाठी ४० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. परंतु, बंगालमध्ये भाजपने मागील लोकसभेत दीदींना मोठा धक्का देत १८ खासदार निवडून आणले. त्यामुळे आहेत ते खासदार सांभाळणे ममतांना अवघड जाणार आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतही पक्षाला पराभव सहन करावा लागला. बंगालसोबत त्यांनी अन्य १२ राज्यांतही निवडणुका लढवल्या. परंतु कधीही त्यांना सरकार स्थापन करता आलेले नाही. त्रिपुरात जवळपास ६० टक्के लोकसंख्या ही बंगाली भाषिक आहे. परंतु, तृणमूलला कधीही सत्तेपर्यंत पोहोचता आले नाही. बंगालमध्ये डरकाळी फोडायची आणि बाहेर पराभव पचवायचे, त्यामुळे ममतांनी ४० खासदार निवडून आणणे ही बाब स्वप्नवतच. तिकडे अखिलेश यांना योगींनी जशास तसे उत्तर देत सळो की पळो करून सोडले आहे. त्यामुळे ममतांचा तेवढा सहारा!

 
मौलानांची मल्लिनाथी...


'इत्तेहाद मिल्लत काऊंसिल’चे अध्यक्ष मौलाना तौकीर रजा यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आणि पुन्हा एकदा नको नको ते बोलून चमकोगिरी करण्याची संधी साधली. रजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुषणे देत कुप्रसिद्ध बाहुबली अतिक अहमद याचे गुणगान गात आपल्या बौद्धिक कौशल्याचे जाहीर प्रदर्शन केले. मुसलमानांनी दहशतवादी बनले पाहिजे आणि बॉम्ब फोडले पाहिजे. तसेच, योगी आदित्यनाथ स्वतः दंगली घडवत होते. परंतु, आता ते स्वतः सत्तेत असल्यामुळे उत्तर प्रदेशात दंगली होत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वांत जास्त मुस्लिमांनी बलिदान दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. देशातील मुस्लिमांना एकत्र करून बुधवार, दि. १५ मार्चपासून हे महाशय बरेली ते दिल्ली अशी ‘तिरंगा यात्रा’ काढणार आहे. रजा महाशय मुसलमांना भडकावण्याचे काम करत आहे. हिंदूराष्ट्राच्या मागणीवर कायमची बंदी घालावी, अन्यथा स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी सुरू होईल, असेही रजा म्हणाले. आपल्या मागण्या घेऊन हे महाशय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची लवकरच भेट घेणार आहे. हिंदुस्थानातील दहा लाख मुस्लीम मुलींना फसवून त्यांचे हिंदू मुलांसोबत लग्न लावून दिल्याचा दावाही रजा यांनी केला. उत्तर प्रदेशात ‘का बा’ असे विचारणार्‍यांना आता उत्तर प्रदेशात ‘बाबा बा’ असे उत्तर मिळत आहे. सपा सरकारच्या काळात सायंकाळी ७ वाजल्यानंतर महिलांना घराबाहेर पडणेही धोक्याचे मानले जात होते. परंतु, आता योगींच्या कार्यकाळात रात्रीदेखील महिला सुरक्षित प्रवास करू शकतात. सपा सरकार असताना दर आठवड्याला उत्तर प्रदेशात कुठे न कुठे दंगल होत असे. परंतु, आता दंगल तर दूरच, परंतु साधी दगडफेकीची घटनाही घडत नाही. अतिक अहमदच्या मुसक्या आवळल्यानंतर आता हळूहळू त्याआड आपले इप्सित साध्य करणार्‍या वृत्ती बाहेर येत आहे. त्यापैकीच एक म्हणजे हे महाशय. ‘मिट्टी मे मिला दूँगा’ म्हणत योगींनी बाहुबली, माफियांविरोधात बुलडोझर कारवाई सुरू केली आहे. एकूणच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने आता ते फूट पाडून का होईना, पण टिकवण्याचा हा प्रयत्न आहे. योगी आणि मोदी यांचा विरोध असेलही. परंतु, त्यासाठी मुसलमानांची माथी भडकवणे चुकीचे. अशांवर कठोरातली कठोर कारवाई व्हावी इतकंच!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.