माजी खासदार अनंतराव देशमुख यांचा भाजपामध्ये प्रवेश

    14-Mar-2023
Total Views |
 

माजी आ. सोनकवडे, संग्राम कुपेकर, अमृता पवार यांच्यासह समर्थकांचा प्रवेशोत्सव

मुंबई : विदर्भातील ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी खासदार अनंतराव देशमुख,  लातूर जिल्ह्यातील माजी आमदार धर्माजी सोनकवडे, नाशिकचे माजी खा . कै. डॉ. वसंत पवार यांच्या कन्या अमृता, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती संग्रामसिंह कुपेकर, यांच्यासह विविध पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी, सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अनंतराव देशमुख यांच्यासारख्या जमिनीवरच्या नेत्याने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करावा ही आमची अनेक वर्षांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली. पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांच्या विकासकामांविषयीच्या मागण्या प्राधान्याने पूर्ण केल्या जातील, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मंडळींच्या साह्याने राज्याच्या विकासाला आणखी गती देण्याचे काम करू, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.  

भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्यांमध्ये अनंतराव देशमुख यांचे पुत्र नकुल व चैतन्य, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप, ठाकरे गटाचे माजी पुणे शहरप्रमुख व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्याम देशपांडे, शाहीर परिषदेचे मनोहर महाराज धांडगे यांनीही त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. अनंतराव देशमुख यांच्यासमवेत वाशीम जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, बाजार समित्यांचे अनेक पदाधिकारी यांचाही समावेश होता. देशमुख यांच्या प्रवेश पश्चिम विदर्भात भाजपा मोठी मजल मारली असल्याचे मानले जात आहे.

पक्षप्रवेश कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खा. डॉ. सुभाष भामरे, आ. हरीश पिंपळे, आ. तान्हाजी मुटकुळे, प्रदेश सरचिटणीस  विक्रांत पाटील , संजय केणेकर, विजय चौधरी, मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

येत्या काळात प्रवेशाचे बॉम्ब फुटणार - प्रदेशाध्यक्ष बावनकुळे
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्त्वात येत्या काळात मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील नेते व कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार असून प्रवेशाचे मोठे बॉम्ब फुटणार आहे, असा दावा यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. देवेंद्रजी यांनी राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली असून यांच्यासारख्या नेतृत्त्वात काम करण्याची संधी मिळत असल्याचा अभिमान यावेळी बावनकुळे यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीतील पक्षांना झटका
अंनतराव देशमुख हे पश्चिम विदर्भातील कॉंग्रेसचे बडे नेते असून राज्याचे अर्थराज्यमंत्री व दोन वेळा खासदार होते. गांधी कुटुंबीयांशी त्यांचे जवळचे संबध होते. त्यांच्या भाजपा प्रवेशाने कॉंग्रेसची मोठी हाणी आहे.

संग्रामसिंह कुपेकर हे बाबासाहेब कुपेकर यांचे पुत्र असून त्यांनी कोल्हापूर जि्ल्हातील चंदवड येथून २०१४ व २०१९ मध्ये निवडणूक लढविळी आहे. ठाकरे गटाचे कोल्हापूरमधील ते मोठे नेते म्हणून ओळख आहे.

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या पदाधिकारी अमृता पवार व ठाकरे गटा्या तनुजा घोलप यांच्या प्रवेशाने नाशिक जिल्ह्यात भाजपाला बळकटी मिळाली आहे.

धर्माजी सोनकवडे यांच्या प्रवेशाने लातूर जिल्ह्यात भाजपाची पायमूळे घट्ट होणार आहे.  हे पक्षप्रवेश महाविकास आघाडीमधील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व ठाकरे गट या तिन्ही गटासाठी मोठा झटका मानला जात आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.