जीनिव्हामध्ये भारताविरुद्ध खोडसाळ अपप्रचार!

    14-Mar-2023   
Total Views |
Anti-India posters in Geneva

जीनिव्हामध्ये जी जागा उपलब्ध करून दिली होती, त्या भागात भारतविरोधी पोस्टर्स लावण्यात आली होती. स्विस सरकार या पोस्टरबाजीचे समर्थन करीत नसले तरी अशी पोस्टर्स लावण्यास कोणी परवानगी दिली, हे उघड होणे गरजेचे आहे. या पोस्टरबाजीच्या मागे नेमके कोण आहे, कोणती कथित मानवाधिकार संस्था आहे, याचा शोध घेण्याची जबाबदारी स्विस सरकारवर आहे.

 
स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा या शहरात संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय असून तेथे मानवी हक्कांसंदर्भात विविध कार्यालये आहेत. जीनिव्हामधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्य इमारतीच्या परिसरात अलीकडेच भारताची बदनामी करणारी विविध प्रकारची पोस्टर्स झळकली होती. भारतात स्त्रियांना स्वातंत्र्य दिले जात नाही, महिलांना आणि अल्पसंख्याक समाजास भारतात गुलामासारखे वागविले जाते, भारतातील ख्रिस्ती समाजास सरकार पुरस्कृत दहशतवादास तोंड द्यावे लागते, भारतात चर्चेसची जाळपोळ केली जाते, भारतात बालकांच्या हक्कांची पायमल्ली केली जाते. तसेच, भारतात बालविवाह होतात, अशा अनेक मुद्द्यांवर आधारित अशी ही पोस्टर्स होती. समाजमाध्यमांवरही जीनिव्हामधील ही अतयंत आक्षेपार्ह पोस्टर्स झळकली होती. भारतविरोधी प्रचार करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय समुदायापुढे भारताची बदनामी करण्याच्या हेतूनेच हा सर्व प्रकार करण्यात आल्याचे दिसून येत होते.या पोस्टरबाजीच्या प्रकाराबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीतील स्विस राजदूतास पाचारण करून झाल्याप्रकाराबद्दल तीव्र निषेध नोंदविला.

भारताविरुद्ध खोडसाळपणे केल्या गेलेल्या अपप्रचाराबद्दल स्विस राजदूताकडे करण्यात आली. भारताचे म्हणणे स्विस सरकारच्या कानावर गांभीर्याने घालू, असे आश्वासन स्विस राजदूताने परराष्ट्र मंत्रालयास दिले. जीनिव्हामध्ये जी भारतविरोधी पोस्टर्स झळकली, त्याचे स्विस सरकार मुळीच समर्थन करीत नाही, असेही या राजदूताने स्पष्ट केले.जीनिव्हामध्ये जी जागा उपलब्ध करून दिली होती, त्या भागात ही पोस्टर्स लावण्यात आली होती. स्विस सरकार या पोस्टरबाजीचे समर्थन करीत नसले तरी अशी पोस्टर्स लावण्यास कोणी परवानगी दिली, हे उघड होणे गरजेचे आहे. या पोस्टरबाजीच्या मागे नेमके कोण आहे, कोणती कथित मानवाधिकार संस्था आहे, याचा शोध घेण्याची जबाबदारी स्विस सरकारवर आहे. कारण, जीनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेरच्या परिसरात ही पोस्टर्स उजळपणे झळकली होती. खरे म्हणजे, त्यावर स्विस सरकारने आक्षेप घ्यायला हवा होता. तसेच, जीनिव्हामधील संयुक्त राष्ट्रांच्या पदाधिकार्‍यांनी या प्रकाराबद्दल आक्षेप घेऊन पोस्टर लावणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करायला हवी होती. पण, भारताची बदनामी होत असेल, तर होऊ द्या, असे मानणारा वर्ग तेथे कार्यरत असल्यानेच त्या वर्गाने भारताची बदनामी करण्याचे हे साहस केल्याचे उघड आहे, अशी घटना पुन्हा घडू नये याची दक्षता भारत सरकारने तर घ्यायला हवीच, तसेच यजमान देशानेही आपल्या भूमीवर भारताचा अवमान होणार नाही याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे!

अयोध्येमध्ये धुमधडाक्यात रामनवमी उत्सव!


अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभारणीचे कार्य वेगात सुरू असतानाच दुसरीकडे रामनवमी उत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्याची योजना श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासने उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीने आखली आहे. या महोत्सवाची तयारी जोरदार सुरू आहे. यानिमित्ताने राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्याने योजलेल्या कार्यक्रमात मंगळवार, दि. २८ मार्च रोजी २०० कलाकार आपली कला सादर करणार आहेत. रामजन्मभूमीच्या परिसरात योगी सरकारकडून रामायण परिषद आणि रामलीला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते गुरुवार, दि. ३० मार्च रोजी होणार आहे. चैत्र नवरात्रोत्सव केवळ रामजन्मभूमी परिसरापुरता मर्यादित राहणार नाही, तर राम की पैडी घाटावर शरयू नदीच्या दोन्ही तीरावर हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अयोध्यानगरीत ज्या भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामध्ये राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्याचा मोठा सहभाग असणार आहे.

रामजन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या मंदिराचे काम वेगाने सुरू असून पुढील वर्षी संक्रांतीला हे मंदिर भाविकांसाठी खुले होईल, असा अंदाज आहे. या महिन्यात जो महोत्सव होणार आहे, त्याचे संपूर्ण अयोध्यानगरीत आयोजन करण्यात येईल. अधिकाधिक जनतेचा या महोत्सवात सहभाग होण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती न्यासाचे एक सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राम मंदिराची उभारणी वेगाने सुरू असून लाखो भाविक आताच अयोध्यानगरीस भेट देत आहेत. मंदिर येत्या संक्रांतीला पूर्ण होईल, असा अंदाज आहे. त्यापूर्वीची ही रामनवमी अत्यंत उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरी करण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या मानस आहे.

बिहारमध्ये मंदिरावर हल्ला करून विध्वंस
 
आपल्याच हिंदुस्थानात हिंदूंची मंदिरे असुरक्षित असल्याचे दाखवून देणारे एक उदाहरण बिहार राज्यात घडले. बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांचे सरकार आहे. पण, हे सरकार हिंदू मंदिरांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले असल्याचे नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरून दिसून येते. बिहारमधील मुस्लीमबहुल असलेल्या किशनगंजमध्ये हनुमान आणि दुर्गा यांची मंदिरे उद्ध्वस्त करून ती जाळून टाकण्यात आली. या घटनेबद्दल हिंदू समाजाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असतानाही बिहार सरकार मात्र मंदिरांना लागलेली आग ही मुद्दाम लावली नसल्याचे सांगत आहे. मंदिरालगतच्या दुकानांना आग लागली आणि ती आग मंदिरापर्यंत पसरली, असे स्पष्टीकरण बिहार पोलिसांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.मात्र, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी या हल्ल्याची माहिती समाजमाध्यमांवर दिली आहे. मुस्लीमबहुल किशनगंज भागात हनुमान आणि दुर्गा यांच्या मंदिरांचा विध्वंस करून ती जाळून टाकण्याची घटना वेदनादायक आणि अत्यंत निषेधार्ह आहे. या घटनेसंदर्भात प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्यास हिंदूंना उग्र आंदोलन उभारावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

 
मंदिरावर हल्ला करणार्‍यांनी मंदिरांमधील देवतांची विटंबना केली. या मंदिरांना लागलेली आग अपघाताने लागली नसून ती मुद्दाम हेतुपूर्वक लावण्यात आली, असे स्थानिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. मात्र, पोलीस यंत्रणेस हे म्हणजे मान्य नाही. रविवार, दि. १२ मार्च रोजी किशनगंज जिल्ह्यातील कोचाधामन भागातील काही दुकानांना आग लागली आणि ती आग मंदिरापर्यंत पसरली. अग्निशामक दलाने त्वरित कारवाई करून आग विझवली, असेही पोलिसांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे या घटनेसंदर्भात कोणी अफवा पसरविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्याशीर पोलीस विसरले नाहीत. पण, या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदू समाजाने केली आहे. आता बिहारमध्ये हिंदू सुरक्षित असून तेथे जंगलराज नाही, हे दाखवून देण्याची जबाबदारी नितीशकुमार यांच्या सरकारवर आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.