अन्न हे पूर्ण ब्रह्म...

    14-Mar-2023
Total Views |
Anna He Purnabramha

सध्या उष्णतेच्या लाटेने देशभरात आजारांचे प्रमाणही वाढलेले दिसते. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांनी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच हैराण दिसतात. पण, जर या रोगराईला दूर ठेवायचे असेल तर व्यायाम आणि योग्य निद्रेबरोबर पोषक आहारही तितकाच गरजेचा. तेव्हा, आजच्या लेखातून आहाराचे विविध प्रकार, ऋतुमानानुसार अन्नसेवन यांची माहिती करुन घेऊया....


वदनी कवळ घेता नाव घ्या श्रीहरीचे,
सहज हवन होते, घेता नाम फुकाचे,
जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म,
उदर भरण नोहे, जाणीजे यज्ञकर्म...

डॉक्टर या नात्याने पेशंटच्या आहाराविषयी अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. अमूक आजारात पथ्य काय पाळावे? काय खावे? तसेच वजन कमी करण्यासाठी व वजन वाढविण्यासाठी काय खावे?अन्न हे पूर्णब्रह्म आहे. आपल्या शरीराचे कार्य चालण्यासाठी लागणारी ऊर्जा ही अन्नातून तयार होते. योग्य आहार, योग्य वेळी व योग्य प्रमाणात घेतल्यास शरीर निरोगी राहते. त्याचप्रमाणे विरुद्ध आहार टाळावे. पाणी योग्य प्रमाणात पिणे, ऋतूंप्रमाणे आहारात बदल करणे व मुख्य म्हणजे जेवताना प्रसन्नचित्त असणे, जेवताना अन्न बारीक चावून खाल्ले पाहिजे. लक्ष फक्त जेवणावर केंद्रित असले पाहिजे. जेवताना बोलणे व हसणे टाळावे. चमचा, काटे यांचा वापर टाळता आल्यास टाळावा.
 
हितभूक

जे शरीरास हितकारक आहे, असे अन्न योग्य प्रमाणात खावे. जेवणात वरण-भात, पोळी-भाजी, तूप, चटणी, लोणचे, कोशिंबीर, लिंबू यांचा योग्य प्रमाणात समावेश असावा. विरुद्ध आहार टाळावा. उदाहरणार्थ- दुधाबरोबर लिंबू, चिंच, केळी खाणे टाळावे. भोजनाच्या शेवटी केळी, काकडी, बटाटा खाणे टाळावे. जेवणानंतर जास्त पाणी पिऊ नये.
 
हितकारी अन्न

खजूर आणि दही, नारळीभात, गाजर, मेथी, चिंच, मका आणि ताक, केळी आणि वेलची पूड.
 
मितभूक

 
मितभूक म्हणजे जेवण संतुलित असावे व ते योग्य प्रमाणात खावे. आपल्या आवडीचा पदार्थ आहे म्हणून ताव मारणे किंवा एखादा पदार्थ आवडत नाही म्हणून टाळणे, या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. आहाराचे ‘गुरू’ आणि ‘लघु’ असे विभाजन करण्यात येते.पचण्यास जड व पचण्यास वेळ लागणार्‍या पदार्थांना ‘गुरू’ मानण्यात येते. उदाहरणार्थ - कढईत तळलेले पदार्थ वडा, समोसा, फरसाण, मसालेदार पदार्थ इत्यादी. गुरू पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करावे. तसेच अशा पदार्थांचे सेवन आजारपणात टाळावे.
लघु आहार

पचण्यास हलका असा आहार. याचे पचन लवकर होऊन लवकर भूक लागते. सुस्ती राहत नाही. उदा. खिचडी, इडली, पोहे, ढोकळा, लाह्या. पचनसंस्थेवर अतिताण पडणार नाही, असा आपला आहार असावा.

ऋतुभूक

आपल्या देशात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत. पृथ्वीच्या अखंड परिक्रमेमुळे हे बदल घडत असतात. या काळात वातावरणातही बदल झालेले असतात व त्या अनुषंगाने आपण आपल्या आहारात बदल करण्याची आवश्यकता असते.
 
उन्हाळा

 
या काळात तापमान व आर्द्रता वाढलेली असते. पचनशक्ती थोडी क्षीण होऊन जाते. घाम जास्त येत असतो. अतिउष्ण प्रदेशात ‘हिट स्ट्रोक’ होण्याची शक्यता असते.

आहारातील बदल

पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. अतिथंड पदार्थांचे सेवन टाळावे. लिंबू सरबत, ताक, कैरीचे पन्हे, कोकम सरबत, आवळा सरबत, आमरस, नारळपाणी, पुदिन्याचा रस, टोमॅटो सूप यांचे प्रमाण वाढवावे. जेवणात ‘लघु’ आहाराचा वापर करावा. मसालेदार, तेलकट व मांसाहार अत्यल्प प्रमाणात करावा वा टाळावा.

पावसाळा

पाण्याची जास्त काळजी घ्यावी. पाण्यावाटे पसरणारे आजार - टायफॉईड, कावीळ, उलट्या, जुलाब यांचे प्रमाण पावसाळ्यात वाढते. शहरात नळास पाणी गढूळ येते. अशा वेळेस पाणी गाळून व उकळून प्यावे. फक्त ‘एक्वागार्ड’च्या भरवशावर राहू नये. शिळे अन्न, बाजारातील उघड्यावर असणारे अन्नपदार्थ टाळावे. मसालेदार पदार्थ व मांसाहार टाळावा. पावसाळ्यात उपलब्ध होणार्‍या भाज्या, वरण, भात, खिचडी यासारखा हलका आहार घ्यावा. जास्त पाऊस पडल्यास कांदा भजी व गरम बटाटावडा अवश्य खावा. दुधात तुळसी व सुंठ घालून त्याचे सेवन करावे.

हिवाळा

हिवाळ्यात भूक जास्त लागते. हा बलवर्धक ऋतू समजला जातो. या काळात व्यायाम जास्त करावा व भरपूर पौष्टिक आहार घ्यावा. ‘गुरू’ पदार्थदेखील खाण्यास हा ऋतू चांगला. अनेक सणदेखील या ऋतूत असतात. खजूर, गूळ, उडीद, शेंगदाणे, आवळा, गाजर, मेथी, तीळ यांचे सेवन वाढवावे. खीर, रबडी, गोड पदार्थ जास्त खावे. मांसाहार आवडीनुसार करावा.

आहारात पाण्याचे नियोजन

पाणी हा अन्नातील मुख्य घटक आहे. तसेच पाणी आपल्या शरीराचा व रक्ताचा मुख्य घटक आहे. पोषक द्रव्ये शरीराच्या विविध भागांना पोहोचविणे, अन्न पचनाची क्रिया राबवणे, शरीराचे तापमान व्यवस्थित ठेवणे इत्यादी कामे पाणी करत असते. पिण्याचे पाणी हे शुद्ध असावे.

१. सकाळी उठून दात न घासता दोन ग्लास पाणी प्यावे. रात्रभर तोंडात जमा झालेली लाळ या पाण्यावाटे पोटात जाऊन पोट साफ होण्यास मदत होते. थंडीमध्ये कोमट पाणी, तर इतर ऋतूत माठातील किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.

२. जेवणाच्या आधी एक तास अर्धा ते एक ग्लास पाणी प्यावे. जेवताना कमीत कमी प्यावे. जेवण झाल्यावर चूळ भरावी व थोडेसे पाणी प्यावे.
 
३. जेवणानंतर एक तासाने एक ग्लास पाणी प्यावे.
 
४. शौचास जाऊन आल्यावर वा लघवी करुन झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. थोडा वेळ थांबून मग आवश्यकता असल्यास पाणी प्यावे.
 
५. थंड पदार्थ खाल्ल्यावर त्यावर गरम पेय घेऊ शकतो. मात्र, गरम जेवणानंतर लगेच थंड पदार्थ वा आईस्क्रीम खाणे टाळावे. त्याने दात व हिरड्या ह्यांना अपाय होतो.
६. उन्हामधून घरी आल्यावर लगेच पाणी पिऊ नये. थोडा घाम ओसरु द्यावा व मग पाणी प्यावे.
७. जेवण प्या आणि पाणी खा- जेवताना अन्न व्यवस्थित चावून खावे व त्याचे रुपांतर द्रव पदार्थात होऊ द्यावे. अन्नातील सहा रसांचा व्यवस्थित आस्वाद घ्या. तसेच पाणी पिताना सावकाश प्या. ते लाळेत एकरुप होऊ द्या. घटाघटा पाणी पिण्याचे टाळावे.

 
 
-डॉ. मिलिंद शेजवळ


 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.