दुर्गम भागात पोहोचणार डॉक्टर, १२ नवी वैद्यकिय महाविद्यालये उभारणार

    14-Mar-2023
Total Views |
12 new medical colleges will be established
 
मुंबई : दुर्गम आणि अतिदुर्गम भागात वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी राज्यात नव्याने १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येत असून, त्यासंदर्भातील कामे गतीने सुरू आहेत. तसेच निवासी डॉक्टरांची सोय व्हावी यासाठी वसतिगृह बांधणे आणि जुन्या वसतिगृहांची डागडुजी करण्यात येणार आहे. यासाठी १४६ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना मंत्री महाजन बोलत होते. यावेळी सदस्य प्रसाद लाड, महादेव जानकर यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

मंत्री महाजन म्हणाले, निवासी डॉक्टरांसाठी असलेल्या 10 हजार खोल्या अपुऱ्या पडत असून, पदवी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी नव्याने खोल्या बांधण्यात येणार आहे. मोडकळीस आलेले जे वैद्यकीय वसतीगृह महानगरपालिकेच्या अखत्यारित असतील अशा वसतीगृहांबाबत संबंधित संस्थाना निर्देश देण्यात येतील. तसेच राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढणार असल्याने, वसतीगृहांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. यासंबंधीत कामे गतीने पूर्ण करण्यास शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.अंबरनाथ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. याचबरोबर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील वेतनही वाढविण्यात येणार असल्याची माहिती महाजन यांनी यावेळी दिली. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.