मुंबईला पुन्हा कोरोनाचा विळखा?

    13-Mar-2023
Total Views |

Covid in Mumbai
मुंबई Covid Updates in Mumbai : मागील १० दिवसांमध्ये मुंबईत सक्रिय कोविड प्रकरणांमध्ये ९६ टक्क्यांनी वाढ झाली असून पालिकेच्या आकडेवारीनुसार, १ मार्चपर्यंत शहरात ४७ सक्रिय प्रकरणे होती. १० मार्चपर्यंत ९२ झाली. तसेच मार्चच्या पहिल्या १० दिवसांत १२१ प्रकरणे नोंदवली गेली. म्हणजे दररोज सरासरी १२ प्रकरणे. तर, १९ ते २८ फेब्रुवारी दरम्यान, दररोज सरासरी पाच प्रकरणे होती.
 
तज्ज्ञ काय म्हणतात?
 
तापमानातील चढउताराचा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असून, काळजी करण्यासारखे काही नाही, असे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले. साथीच्या रोगांचे माजी राज्य निरिक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले की, तापमानातील बदलामुळे रुग्णांची संख्या वाढली असल्याने घाबरून जाण्याची गरज नाही. संपूर्ण भारतातील, विशेषत: मुंबईतील खराब हवेच्या गुणवत्तेमुळे, नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.
 
मुंबईकरांना सावध राहण्याचा सल्ला
 
“दक्ष राहण्याची आणि चाचणी, ट्रॅक, उपचार, लसीकरण या धोरणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच, चाचणी सकारात्मकता दरात किरकोळ वाढ झाली आहे", असा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून हंगामी इन्फ्लूएंझा H3N2 च्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे काही राज्यांमध्ये कोविड पॉझिटिव्ह दरात हळूहळू वाढ होत असल्याने सावधगिरी बाळगण्यास आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. राज्यांनी कोविड आणि इन्फ्लूएंझा विरूद्ध औषधांची उपलब्धता, वैद्यकीय ऑक्सिजन आणि लसीकरण या तयारीचा आढावा घेण्यास सांगितले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.