...लवकरच उल्हासनगरमध्ये धावणार मेट्रो

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ मार्गिकेचा उल्हासनगरपर्यंत होणार विस्तार

    13-Mar-2023
Total Views |
mmrda-extend-thane-bhiwandi-kalyan-metro-5-route-upto-ulhasnagar
  • सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू


  • मेट्रोमुळे उल्हासनगरवासीयांना मोठा दिलासा


  • उल्हासनगर शहरातील व्यापार व्यावसायाला मिळणार चालना


  • देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला ः आ. कुमार आयलानी

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये लवकरच मेट्रो धावणार असून शहरवासीयांना मेट्रोमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. नुकतीच भाजप आ. कुमार आयलानी यांनी यासंदर्भात माहिती दिली. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस आले होते. तेव्हा त्यांनी शहरवासीयांना उल्हासनगरपर्यंत मेट्रो आणणार असल्याचा शब्द दिला होता. हा शब्द त्यांनी खरा करून दाखवला आहे. मेट्रोला मान्यता मिळाल्याने आ. कुमार आयलानी यांनी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.


तसेच उल्हासनगरमध्ये मेट्रोच्या एका रेल्वे स्थानकाचे नाव सिंधूनगर ठेवले जाणार असल्याचे फडणवीस यांनी यापूर्वीच जाहीर केले असल्याने शहरात आनंदाचे वातावरण आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण या २५ किमी मार्गिकेच्या विस्ताराला राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. या मार्गिकेसाठी सुमारे ८ हजार, ४१६ कोटी रूपये खर्च प्रस्तावित केला असून १७ स्थानके या मार्गावर उभारण्यात येणार आहेत.
 
उल्हासनगर शहरातून व्यापारी हे भिवंडी व ठाणे येथे व्यावसायानिमित्त मोठ्या प्रमाणावर जात असतात. त्यामुळे मेट्रो ५ मार्गिकेच्या उल्हासनगरपर्यंतच्या विस्तारासाठी प्राथमिक सर्वेक्षण ‘एमएमआरडीए’ने सन २०१९ रोजी सुरू केले होते. तसेच याबाबत आवश्यक ती कार्यवाही व प्रक्रियाही सुरू केली आहे.
 
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ ही मार्गिका उल्हासनगरपर्यंत वाढविल्यास उल्हासनगरवासीयांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल, अशी लेखी मागणी आ. कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीला आता यश येताना दिसून येत आहे.


ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-५ ही उल्हासनगरपर्यंत वाढविण्यात येईल, असे आश्वासन २०१९ मध्ये प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची आठवणही आ. आयलानी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दिलेल्या पत्रात केली होती. अखेर त्यांची ही मागणी मान्य झाली आहे. एमएमआरडीएच्या मेट्रो विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश अहुजा यांनी आयलानी यांना पाठवलेल्या पत्रात विस्तार करण्याकरिता तुमची मागणी लक्षात घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले असल्याचे नमूद केले आहे. त्यानंतर सक्षम प्रधिकार्‍याची मंजुरी, निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष काम वर्षभरात सुरू होईल, अशी आशा आ. आयलानी यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, खा. श्रीकांत शिंदे यांचे आ. आयलानी यांनी आभार मानले आहेत.


मेट्रोचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार...


उल्हासनगर हे औद्योगिक शहर असून या शहरामध्ये विविध वस्तूंची निर्मिती केली जाते. कपडे, फर्निचर यांसारख्या अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहक येत असतात. मात्र, अरुंद रस्त्यांमुळे वाहतूककोंडीची समस्या तसेच पार्किंगची समस्या निर्माण होते. त्यामुळे शहरात जलद वाहतुकीसाठी मेट्रोची मागणी वारंवार होत होती. आता या मागणीला यश येताना दिसून येत असून उल्हासनगरवासीयांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.