स्थानिक कलावंतांसाठी चित्रपट प्रशिक्षणाचे दालन उघडणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

    13-Mar-2023
Total Views |

Sudhir Mungantiwar



चंद्रपूर
: चंद्रपूर जिल्ह्याला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. जल, जंगल, जमीन, निसर्ग आदी बाबींनी पूर्व विदर्भ सुजलाम सुफलाम आहे. यापूर्वी काही चित्रपटांचे चित्रीकरण पूर्व विदर्भात झाले आहे. वाघांच्या अधिवासावर आधारित टेरिटरी हा चित्रपट तर चंद्रपूरच्या स्थानिक कलावंतांनीच तयार केला आहे. याच प्रतिभेला समोर नेण्यासाठी व स्थानिक कलावंतांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी चित्रपट प्रशिक्षणाचे दालन उघडे करणार, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

चंद्रपुरातील मिराज सिनेमा येथे पहिल्या चंद्रपूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेसी, पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे सीईओ डॉ. जब्बार पटेल, सपना मुनगंटीवार प्रकाश धारणे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे माजी अधिष्ठाता प्रो. समर नखाते आदी उपस्थित होते.

पूर्व विदर्भात कलेची कुठेही कमतरता नाही, असे सांगून सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, स्थानिक कलावंतांना अभिनय व चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यांच्या प्रशिक्षण संस्थेत येथील प्रतिभावंत कलावंतांना पाठविण्याचा आपला मानस आहे. आपल्या जिल्ह्यातील तरुण-तरुणीही चित्रपट सृष्टीत येऊन जिल्ह्याचा नावलौकिक करू शकतात, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. मुंबई चित्रपट नगरी ही जगातील सर्वात सुंदर इंडस्ट्रीज होऊ शकते. कारण बाजूलाच 104 किलोमीटर परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व तेथील जैवविविधता चित्रपट निर्मितीचे प्रमुख आकर्षण आहे.

दादासाहेब फाळके यांनी 3 मे 1913 रोजी पहिला भारतीय चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' ची निर्मिती केली. मराठी माणसाने सुरू केलेले हे क्षेत्र आज प्रचंड विस्तारले आहे. प्रसिद्ध अभिनय सम्राट दादा कोंडके यांनी 1971 पासून सलग 9 चित्रपट सुपरहिट व पुरस्कार प्राप्त देऊन मराठीचा नावलौकिक वाढविला. मराठी माणूस सतत पुढे जावा, याच भावनेने आपले काम सुरू आहे. पुढील वर्षी चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलची मोठी तयारी करू, असा मी आपल्याला विश्वास देतो.

सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा पदभार स्वीकारल्यानंतर चित्रपटाच्या अनुदानात आपण वाढ केली आहे. एवढेच नाही तर महिला दिग्दर्शकांना पाच लक्ष रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय आपल्या विभागाने घेतला. तसेच महापुरुषांवर आधारित चित्रपटाकरिता एक कोटीचे अनुदान आता पाच कोटीपर्यंत करण्यात आल्याचेही श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले.
प्रास्ताविकात प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल म्हणाले, सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या पुढाकारामुळेच चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे पहिल्यांदाच आयोजन होत आहे. हा फिल्म फेस्टिवल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा अधिकृत उपक्रम आहे. या विभागाला नवीन चेहरा देण्याचे काम श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे. गत 20 वर्षापासून आपण या फिल्म फेस्टिवलचे आयोजन करीत असतो. मात्र आता पुण्याच्या बाहेर मुंबई, चंद्रपूर, नागपूर आणि लातूरमध्येही आयोजन होणार आहे. या आयोजनामुळे चंद्रपूरला चित्रपटसृष्टीचे एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
चित्रपट हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे. अभिनय, कॅमेरा, संगीत या सर्व बाबी मानवाला प्रसन्नता देतात. विदर्भाच्या भूमीत चांगले कलागुण आहेत. त्याला आणखी विकसित करून पुढील चित्रपट या भूमीत निर्माण व्हावे, अशी अपेक्षाही डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे पु. ल. देशपांडे अकादमीची एक शाखा चंद्रपुरात सुरू करावी, अशी मागणी त्यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री मुनगंटीवार यांच्याकडे केली.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.