धक्कादायक! ९९ रुपयांत विकली गेली 'या' बँकेची शाखा!

13 Mar 2023 16:23:28
सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोर घोषित
SVB


कॅलिफोर्निया : अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेचे शेअर्स कोसळल्याचा परिणाम भारतासह जगाला भोगावा लागत आहे. शेअर बाजारावरही याचा परिणाम जाणवला आहे. विशेष म्हणजे लंडनच्या सिलिकॉन व्हॅली बँकेच्या शाखेचा सौदा केवळ एका युरोला झाला आहे. म्हणजे अवघ्या ९९ रुपयात एचएसबीसी बँकेला ही शाखा विकण्यात आली. तंत्रज्ञान व लाईफ सायन्स क्षेत्रात बँकेचे मोठे नुकसान झाल्यानंतर हा व्यवहार झाला. फेडरल रिझर्व्हच्या कठोर नियमावलीमुळे हा फटका बसला आहे.
 
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅली बँक बंद होणे हे जागतिक संकट मानले जात आहे. ही अमेरिकेतील सोळाव्या क्रमांकाची बँक आहे. आंतरराष्ट्रीय बँक असल्याने बँकिंग क्षेत्रातील शेअर बाजारात ८.१ टक्क्याने घसरला. तीन वर्षांतील मोठी घसरण आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला. शुक्रवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. यामुळे अमेरिकेतील बाजारपेठांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
 
सिलिकॉन व्हॅली बँक बंद का झाली ?
 
एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, बँकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 'कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशन'तर्फे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकेची संपत्ती २१० अब्ज डॉलरपेक्षा जास्त असून अमेरिकेतील अनेक ठिकाणी तिच्या शाखांचे जाळे विस्तारले होते. व्याजदर वाढल्याने बँकेची स्थिती खालावत राहिली. सिलिकॉन व्हॅली बँक टेक कंपन्या आणि नवीन उपक्रमांना आर्थिक सहाय्य पुरवते.
 
तंत्रज्ञान आणि हेल्थकेअर कंपन्यांकडे एकूण ४४ टक्के व्यवसाय आहे. यूएस फेडरल रिझर्व्हतर्फे व्याजदरात घट करण्यात आली होती. त्याचा या क्षेत्रावर विपरित परिणाम झाला. SVB बँकेच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाल्याने या क्षेत्रांमधील गुंतवणूकदारांचा हिरमोड झाला. बँकेची कर्ज बुडीत निघाल्याने आर्थिक स्थितीवर झालेला परिणाम ही कारणे बँक दिवाळखोरीत निघण्यासाठी कारणीभूत ठरली.


Powered By Sangraha 9.0