शाळांचा वीजपुरवठा २४ तास सुरू रहाणार

13 Mar 2023 18:01:01
Electricity supply to schools will continue for 24 hours


मुंबई
: प्राथमिक शाळांनी वीज देयक भरण्यासाठी पुरेश्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या शाळांची वीज जोडणी तोडली जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल. तसेच या शाळांची वीज जोडणी तोडू नये, याबाबत वीज वितरण मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत चर्चा झाली असून त्यांच्यासोबत लवकरच बैठक देखील घेतली जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री केसरकर म्हणाले की, प्राथमिक शाळांसाठी आकारले जाणारे विजेचे दर हे घरगुती दरापेक्षा कमी असावेत याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. या सवलतीच्या दरांमुळे यापुढे देयक प्रलंबित राहणार नाही, अशी अपेक्षा आहे. तथापि, शाळांची वीज तोडण्यात येऊ नये याबाबत व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत करार करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्याचप्रमाणे शाळांमध्ये सोलरद्वारे वीज पुरवठा करण्याबाबतही प्रायोगिक तत्त्वावर टप्प्या टप्प्याने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.यासंदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, शशिकांत शिंदे, ज्ञानेश्वर म्हात्रे आदींनी सहभाग घेतला.


Powered By Sangraha 9.0