राहुल गांधींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्या!

भाजपा नेत्याने सूचना करत जमीनही सुचवली

    12-Mar-2023
Total Views |
rahul-gandhi-house-under-pradhan-mantri-awas-yojana-bjp-leader-writes-letter-to-govt-chhattisgarh

नवी दिल्ली
: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्याकडे स्वत:चे घर नसल्याने त्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर देण्यात यावे, अशी मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष आणि नवागड जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष देवदास चतुर्वेदी यांनी केली आहे. राहुल यांनी आपल्या भाषणांत अनेकदा त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे एकही घर नसल्याचा उल्लेख केल्याने भाजपा नेत्यांनी राहुल त्यांना टोला लगावला आहे.
 
“माझ्याकडे स्वतःचं घर नाही, हे वाक्य राहुल गांधी यांच्याकडून अनेकदा ऐकायला मिळाले आहे. अनेक सभांमध्ये ते या गोष्टीचा उल्लेख करतात. अलिकडेच छत्तीसगडमधल्या रायपूर येथील काँग्रेसच्या ८५ व्या महाअधिवेशनात ते म्हणाले होते की, “माझं वय ५२ वर्ष आहे. परंतु माझ्याकडे अद्याप स्वतःचं घर नाही”. हाच धागा पकडत छत्तीसगडच्या बेमेतरा येथील भाजप नेते देवदास चतुर्वेदी यांनी प्रशासनाला एक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी राहुल यांना पीएम आवास योजनेअंतर्गत घर देण्याची मागणी केली आहे.

देवदास चतुर्वेदी यांनी पत्रात राहुल गांधी यांना सरकारी जमीन देण्याची मागणी केली आहे. देवदास यांनी पत्रात लिहिलं आहे की, असं केल्याने राहुल गांधी यांच्यासारख्या गरिबाला पक्कं घर मिळेल आणि राहुल गांधी यांचं स्वप्नदेखील पूर्ण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान आवासअंतर्गत त्यांना घर मिळेल. प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनाची प्रत भाजपने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

देवदास चतुर्वेदी यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रात लिहिलं आहे की, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी नुकतेच छत्तीसगला आले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्यांचे वय ५२ वर्षे इतकं आहे. अद्याप त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचं घर नाही. त्यामुळे राहुल यांना पीएम आवास योजनेअंतर्गत पक्कं घर बांधून द्यावे अशी मागणी देवदास चतुर्वेदी यांनी प्रशासनाकडे केली आहे. यात चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की, नवागड नगर पंचायत क्षेत्राअंतर्गत संबळपूर रोडलगत खसरा नंबर ६५९ येथील २५० डीसमील जमीन राहुल गांधी यांना देण्यात यावी. जिथे केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत खासदार राहुल गांधी यांच्यासारख्या गरिबाला पक्के घर बांधून देता येईल. हे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यावर त्यावर राहुल यांच्यावर टोलेबाजी करण्यात येत आहे.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.