‘डबल इंजिन’ सरकारचा डबल दमदार अर्थसंकल्प

    12-Mar-2023
Total Views |
maharashtra budget 2023-24


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ‘सबका साथ सबका विकास’ या तत्त्वाने सर्वसामान्यांना प्रगत्याभिमुख वाटेवर नेण्याचे काम अधिक जोमाने सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पात शेवटच्या व्यक्तीचा विचार करताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा केली. या अर्थसंकल्पात बर्‍याच योजनादेखील लक्षवेधी ठरल्या आहेत.


जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ‘पिकवावे धन। ज्याची आस करी जन॥’ या तत्त्वास अनुसरुन अर्थसंकल्प, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली. ही बाब अत्यंत अभिमानास्पद अशी आहे. ‘पंचामृता’च्या माध्यमातून मांडण्यात आलेला अर्थसंकल्पात सर्वसामान्य घटकाचा प्राधान्याने विचार केल्याचे दिसते. राज्याची अर्थव्यवस्था अधिक व्यापक करण्यावर यंदाच्या अर्थसंकल्पात भर दिल्याचे ठळकपणे जाणवते.

शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी भरघोस तरतूद

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष असून या महोत्सवासाठी ३५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी ५० कोटी देण्यात आले आहेत. मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने उभारली जाणार आहेत. शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारण्यात येणार असून शिवकालीन किल्ल्यांचे संवर्धनासाठी ३०० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

शेतकर्‍यांचा सन्मान

या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी अधिक तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, शेतकर्‍यांसाठी आता केवळ एक रुपयांत पीकविमा दिला जाणार आहे. याचबरोबर, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी तीन वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणले जाणार आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनांचे लाभ दिले जातील. २०१७च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्‍यांना योजनेचे लाभ दिले जातील. ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ही शेतकर्‍यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. ‘महाकृषिविकास अभियान’ तसेच कोकणासाठी काजू बोर्ड बनवले जाणार आहे. याबरोबरच नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले गेले आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेसाठी एक हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. तसेच ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राबवली जाईल. शेतकर्‍यांसाठी ‘ट्रान्सफॉर्मर योजना’ उपयुक्त ठरेल. एकूणच शेतकर्‍यांना थेट रोखीने आर्थिक मदत देण्यावर भर देण्यात आला आहे.

मुंबईसाठी अधिक निधी

‘बोलण्यावर नाही, कृतीवर भर’ मुंबईचा सर्वांगिण विकास या न्यायाने मुंबईच्या सुशोभीकरणासाठी १ हजार, ७२९ कोटी रुपये तरतूद केली आहे. ‘एमएमआर’ क्षेत्रात ‘पारसिक हिल्स बोगदा’, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण केले जातील. ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडणार आहे. ‘गेट वे ऑफ इंडिया’जवळ ‘रेडिओ क्लब’नजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण केल्या जाणार आहेत. ‘पुणे मेट्रो’साठी ८ हजार, ३१३ कोटींची कामे प्रगतिपथावर आहेत. मुंबईत ३३७ किमी मेट्रोचे जाळे निर्माण केले जाईल. मुंबई मेट्रो १०, ११, १२ असे नवीन प्रकल्प उभारले जातील. यातून सर्वसामान्य मुंबईकरांची वाहतूककोंडीतून मुक्तता होणार आहे.

महिला सक्षमीकरण

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ आता नव्या स्वरूपात येत आहे. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ मिळेल.जन्मानंतर मुलीला पाच हजार रुपये तसेच पहिलीत चार, सहावीत सह, अकरावीत आठ आणि मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५ हजार रुपये अशी तरतूद केली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना ५० टक्के सवलत देण्यात आली. महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर मुंबईत ‘महिला युनिटी मॉल’ची स्थापना होईल. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानात चार कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार केले जातील. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ केली गेली आहे.नोकरदार महिलांसाठी ५० वसतिगृहे आणि अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी ‘स्वाधार’ आणि ‘उज्ज्वला’ या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना आणण्यात आली आहे.

आरोग्याची विशेष काळजी

अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या आरोग्यावर खर्चासाठी अधिक तरतूद करण्यात आली आहे. ’महात्मा जोतिराव फुले जनारोग्य योजने’त विमा संरक्षण १.५० लाखांहून पाच लाख रुपये केले आहे. त्यामुळे आता पाच लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार आहेत. नवीन २०० रुग्णालयांचा यात समावेश होईल. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ २.५० लाखांहून चार लाखांपर्यंत केले जाईल. तसेच राज्यभरात ७०० स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहेत.

रस्त्यांसाठी भरघोस निधी

अर्थसंकल्पात रस्ते प्रकल्पाच्या आधुनिकतेवर भर दिला गेला आहे. पुणे रिंगरोड, मुंबई-पुणे मिसिंग लिंक, विरार-अलिबाग मार्ग, रायगड जिल्ह्यातील रेवस ते रेड्डी, सिंधुदुर्ग सागरी महामार्गासाठी निधी देण्यात आला आहे. ‘हायब्रीड अ‍ॅन्युईटी’तून ७ हजार, ५०० किमींचे रस्ते त्यासाठी ९० हजार कोटी रुपये तरआशियाई बँक प्रकल्पातून ४६८ किमींचे रस्ते उभारले जातील. ’प्रधानमंत्री ग्रामसडक योजने’तून ६५ हजार किमींचे रस्ते तयार केले जाणार आहेत.

रेल्वे प्रकल्प, बसस्थानक आधुनिकीकरण आणि विमानतळ विकास

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी दिला आहे. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज्साठी ४५२ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. १०० बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे ४०० कोटीचा निधी दिला जाणार आहे. शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल उभारले जाणार असून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तारही केला जाणार आहे. पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी देण्यात आले आहेत.


युवकांच्या हाताला काम

युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार नवनव्या योजना आखत आहे. रोजगारासाठी गावा गावातून होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी आता रोजगार आणि स्वयंरोजगाराचा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यातील ५०० ग्रामपंचायतींमधून कौशल्य विकास कार्यक्रम सुरु करण्यात येणार आहे. तसेच कौशल्य वर्धानाद्वारे युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी पुढील तीन वर्षात २ हजार, ३०७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ५०० औद्योगिक संस्थांचा दर्जाही वाढविण्यात येणार आहे. तसेच ७५ संस्थांचे आधुनिकीकरण करून त्याद्वारे युवकांना रोजगाराचे धडे देण्यात येणार आहेत. या योजनांसाठी ६१० कोटींचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

विद्यार्थी विकासाकडे लक्ष
 
विद्यार्थांना आता भरीव शिष्यवृत्ती मिळणार आहे. शिक्षणसेवकांच्या माधनात मोठी वाढ केली आहे. शैक्षणिक संस्थासाठी ५०० कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. तर खेळांना प्रोत्साहनासाठी विविध योजना मांडल्या आहेत. खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध, बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार आहे. पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ होणार आहे.

भाषा अन् संस्कृतीसाठी मोठी घोषणा
 
अमरावती जिल्ह्यातल्या रिद्धपूर येथे मराठी भाषेचे विद्यापीठ करण्याची घोषणा अर्थमंत्री फडणवीस यांनी केली. यासह अनेक ठिकाणी नाट्यगृह, चित्रनगरींसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळे सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी ५० कोटी रुपये, ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव’, कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी ११५ कोटी रुपयांची तरतूद आहे. कलाप्रकार जतनासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाचीही स्थापना करण्यात येणार आहे.

पर्यटनाला चालना

प्रत्येक जिल्ह्यातील ५०० युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण दिले जाईल. पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास केला जाणार आहे. दहा पर्यटनस्थळांवर ‘टेंट सिटी’ उभारणार आहे. राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा तयार असून यात शिवजन्मोत्सव शिवनेरी, भगवान बिरसा मुंडा महोत्सव, जव्हार, वीर बाल दिवस महोत्सव नांदेड इत्यादींचा समावेश आहे.

यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात निश्चित जनतेच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब दिसते. या अर्थसंकल्पातील सर्वच बाबी ‘सर्वजनहिताय’ अधोरेखित करणार्याब आहेत,’ एकूणच राज्याचा हा नुसता अर्थसंकल्प नाही, तर महाअर्थसंकल्प ठरणारा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कुठलेही आकडे न फुगवता मागील वर्षाची तरतूद ५ लाख २८ हजार कोटी असताना एवढ्या मिशन स्वरूपात योजना ५ लाख ४७ हजार ४५० कोटीत बसवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ३० वर्षाच्या तळागाळातील अनुभवाची एक प्रचिती या अर्थसंकल्पातून दिली आहे.

-प्रतीक कर्पे

(भाजप मुंबईच सचिव आणि भाजप ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य)


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.