त्यांचा पराभव म्हणजे मराठीचा पराभव?

12 Mar 2023 19:50:09
Editorial on Sahitya Akademi election result and dispute

साहित्य अकादमीच्या निवडणुकीत ज्यांचा पराभव झाला तो पराभव म्हणजे मराठीचा पराभव मानण्याचे कारण नाही. आशयनिर्मितीच्या अस्सल प्रक्रीयेतच आपण मार खातोय आणि साहित्यबाह्य राजकीय गोष्टी करण्यात डाव्या कंपूचा रस हे त्याचे खरे कारण आहे.

बहुचर्चित साहित्य अकादमीच्या निवडणुकीत माधव कौशिक आणि प्रा. कुमुद शर्मा यांचा विजय झाला. साहित्य अकादमी ही करदात्यांच्या पैशातून चालणारी संस्था शिवाय तिचे सारे व्याप चालविण्याची जबाबदारी देशाच्या सांस्कृतिक मंत्रालयाची. मात्र ही संस्था नोकरशहांच्या माध्यमातून न चालता प्रत्यक्ष साहित्यिकांच्या सहभागातून चालावी म्हणून त्यात या निवडणुकीची रचना. ही रचना आजची आहे असे मुळीच नाही. यापूर्वीही ती चालतच होती. मात्र, माधव कौशिक आणि कुमुद शर्मा यांची निवड झाल्याबरोबर डाव्यांचे शेवटचे क्षेत्र उरलेल्या साहित्यिक वर्तुळात त्याची आलेली प्रतिक्रिया अत्यंत रंजक आहे कुमुद शर्मांना त्यांनी थेट उजवे ठरूवून टाकले आहे आणि महाराष्ट्रातून ही निवडणूक लढविलेल्या रंगनाथ पठारेंचा विजय म्हणजेच मराठीचा आणि महाराष्ट्राचा पराभव वाटू लागला आहे. यात मुख्य ओरड म्हणजे उजव्यांनी काही राजकारण करून आपली माणसे निवडून आणली आहेत आणि त्यांचा कला आणि साहित्याशी काहीच संबध नाही. या सगळ्याचा मक्ता डाव्यांनी घेतलेला. तो मक्ता घेण्याविषयी काही हरकत नाही. मात्र, साहित्यबाह्य गोष्टी करून साहित्याचा दर्जा आणि प्रभाव कोणी कमी केला, या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर ही मंडळी सरळ आकाशाकडे पाहू लागतात.

गेल्या निवडणुकीत डाव्या कंपूने गाजविलेले वाजविलेले भालंचद्र नेमाडेही ‘सपशेल’ पडले होते. नेमाडेंची ख्याती अशी होती की, औचित्य आणि ते याचा काही संबध नव्हता. ‘कोसला’ या त्यांच्या उत्कृष्ट कादंबरीनंतर त्यांनी जे काही लिहिले त्याला मराठी वाचकांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. अमोल पालेकरांच्या सिनेमांना नंतरच्या काळात न मिळणार्‍या प्रतिसादाइतकेच हे खरे होते. मग, पालेकर लोकशाहीच्या गप्पा मारण्याच्या कार्यक्रमात व्यस्त झाले. नयनतारा सेहगल यांना मराठी साहित्य संमेलनात आणून संकटात आलेली लोकशाही वाचविण्याचे भजन-कीर्तन त्यांना साहित्य संमेलनाच्या मांडवात करायचे होते. साहित्याच्या व्यासपीठांवर जिथे जिथे डाव्यांचा प्रभाव आहे, तिथे तिथे हे सारे चालूच असते. ही व्यासपीठे नव्या मंडळींसाठी रिकामी करण्यापेक्षा आपल्या मानापमानाच्या नाटकांच्या खेळानंतर उरलेल्या वेळात देशात कशी भीती आहे? लोकशाही कशी संकटात आली आहे? याची चर्चा हे लोक करीत असतात. हे लोक इतके बिनडोक आहेत की, युरोपातील डावे - उजवे संकल्पना इथे लावून झोपायच्या उशा डोक्याला न घेता त्याला शत्रू म्हणून बडवत असतात. पूर्वी काँग्रेस आणि डाव्यांच्यात उत्तम समझोता होता. सत्ता काँग्रेसची तर शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रावर पकड डाव्यांची.

वाटणी एकदम सरळ होती. आता मुद्दा असा आहे की, काँग्रेसच उरली नाही, तर या साहित्यबाह्य कुटाळक्या करणार्‍यांना निवडून देणार कोण? एकदा का तुम्ही निवडणुकीच्या खेळात उतरलात की, तुम्हाला तो खेळ त्याच्या नियमांनुसारच खेळावा लागतो. जिंकलो की साळसूद आणि हरलो की समोरचे बेईमान, असे चालत नाही. मराठी साहित्याचा प्रभाव अन्य राज्यात नाही, ही ओरड खरी असली तरी त्यामागे मागणी नसणे, हे खरे कारण आहे. आता मागणी का नाही तर या साहित्यात अस्सलपणा नाही आणि वाचकाला आकर्षित करेल, असा विचार आणि लालित्यही नाही. कुसुमाग्रसांच्या कविता गुलजारना भाषांतरित कराव्याशा वाटल्या. कारण, त्यात काही मजकूर होता. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात डॉ. अरूणा ढेरे व अजून काही मोजके संमेलानाध्यक्ष सोडले, तर बाकी काय कचरा करून ठेवला आहे, याची कल्पनाही करवत नाही. निवडणुकीचे तंत्र आत्मसात करून निवडून आलेले माजी सनदी अधिकारी, कोणी ख्रिस्ती पाद्री एक ना अनेक काय काय प्रयोग झाले आहेत, त्याला सीमा नाही. आता या सगळ्या कंपूशाहीला वाचकांनीही आश्रय द्यावा, अशी कल्पना करणे खुळेपणाचे.
 
पण हा खुळेपणा सतत सुरूच आहे. हे राजकारण म्हणजेच साहित्याची निर्मिती व सेवा असा समज आहे व तो सुरूच आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आले किंवा त्यापूर्वीचा तमाशा आपल्याला आठवत असेल, तर याच साहित्यिकांनी मोदींना लोकांनी मतदान करू नये, यासाठी केवढे जमिनास्मान एक केले होते. पण लोकांनी मोदींनाच वरले. त्यावेळी देश सोडून जाण्याच्या वल्गना करणारे, पुरस्काराच्या फक्त ट्रॉफी परत करून प्रसिध्दी मिळवलेले धूर्त लोक अजून इथेच आहेत.खरेतर साहित्य रसिकाला व सर्वसामान्य वाचकाला या राजकारणाशी काहीच देणे घेणे नाही. त्याला कसदार साहित्य हवे आहे, जे तो तास तास वाचत बसेल. आता जी काही मंडळी निवडून आली आहेत, त्यांच्या समोरही हे नवे प्रवाह सामावून घेण्याचेच मोठे आवाहन आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी नवी कोरी आशय निर्मिती तिला व्यासपीठ मिळवून देण्यापासून ते त्यातला युवांचा सहभाग मानण्यापर्यंत कितीतरी मोठ्या कामाची सुची आहे. मूळ काम साहित्याचे आणि भाषेचे आहे हे मान्य केले, तरी खूप काही करण्यासारखे आहे.




Powered By Sangraha 9.0