यादव कुटुंबीयांकडे ६०० कोटींचे घबाड

12 Mar 2023 15:31:03
600-crores-scam-done-by-lalu-prasad-yadav-family-ed-claim-unaccounted-amount-of-1-crore-seized

नवी दिल्ली : “जमिनीच्या बदल्यात नोकरी’ घोटाळ्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाकलेल्या छाप्यांमध्ये जवळपास ६०० कोटी रूपयांच्या शोध लागला आहे,” अशी माहिती ‘ईडी’तर्फे देण्यात आली आहे.

‘जमिनीच्या बदल्यात नोकरी’ घोटाळ्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून ‘ईडी’ची यादव कुटुंबीयांवर छापेमारी सुरू होती. छापेमारीविषयी ‘ईडी’तर्फे अधिकृत माहिती देण्यात आली आहे. ‘ईडी’ने म्हटले की, “जमिनीच्या बदल्यात नोकरी’ घोटाळ्याप्रकरणी २४ विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यात एक कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, १९०० अमेरिकी डॉलरसह विदेशी चलन, ५४० ग्रॅम सोने आणि दीड किलो सोन्याचे दागिने सापडले आहे. त्याचप्रमाणे या छापेमारीदरम्यान सध्या ६०० कोटी रुपयांच्या गुन्ह्याचा शोध लागल्याचेही ‘ईडी’ने सांगितले आहे. नोकरी घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजस्वी यादवसह लालू यादव यांच्या मुलींच्या घरावर ‘ईडी’ने छापे घातले होते. हे प्रकरण २००४ ते २००९ दरम्यान लालू प्रसाद याजव रेल्वेमंत्री ’ग्रुप-डी’ नोकरीशी संबंधित आहे.


Powered By Sangraha 9.0