देशातील पहिले कार्बन न्यूट्रल वनवासी गाव भिवंडीत!

    11-Mar-2023
Total Views |
union-minister-kapil-patil-said-that-the-countrys-first-carbon-neutral-tribal-village-will-be-built-in-bhiwandi

भिवंडी : देशातील पहिले वनवासी कार्बन न्यूट्रल गाव भिवंडी तालुक्यात उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राजमंत्री गिरीराज सिंह यांच्यासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर, त्यांनी प्रकल्पाला निधी देण्याचे जाहीर केले आहे. पहिले वनवासी गाव कार्बन न्यूट्रल करण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. जम्मूमधील पल्ली गाव हे देशातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव झाले आहे. या गावात सौरऊर्जेचावापर केला जात असून, ग्रामपंचायतीतील सर्व रेकॉर्ड डिजिटल आहेत.

या गावात ५०० किलोवॅटचा सोलर प्लांट बसविला आहे. त्याच धर्तीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघात दोन वनवासी गावे व १३ ग्रामपंचायती कार्बन न्यूट्रल करण्याचा निर्धार पाटील यांनी केला आहे. त्यानुसार या संदर्भात आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. बचतगटाच्या कार्यशाळा व सरस प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्ताने नुकतेच ठाणे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेल्या सिंह यांनी अंजुरदिवे येथे बैठक घेतली. या बैठकीत प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

...ही गावे होणार कार्बन न्यूट्रल
 
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील दुधनी व अखिवली (वाफे) या वनवासी गावांबरोबरच, भिवंडी तालुक्यातील सोनाळे, रांजणोली, अंजुर, दिवे अंजुर, काल्हेर, कशेळी, कोपर, पुर्णा, दापोडे, राहनाळ, वळ, माणकोली, ओवळी आदी गावे कार्बन न्यूट्रल गावे करण्याचा आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पात प्रत्येक घराला अत्यल्प किंमतीत वीज उपलब्ध होईल. घरांमध्ये सौरचुली, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी गावात सोकपीट, सुक्या व ओल्या कचर्‍यासाठी स्वतंत्र शेड उभारण्यात येतील.