साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षपदी प्रथमच महिला

11 Mar 2023 18:11:05
madhav-kaushik-elected-new-president-of-sahitya-akademi-election-professor-kumud-sharma-vice-president-sahitya-akademi

नवी दिल्ली : साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी माधव कौशिक तर उपाध्यक्षपदी प्रा. कुमुद शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य अकादमीच्या इतिहासात प्रथमच महिला उपाध्यक्ष लाभल्या आहेत.

साहित्य अकादमी कार्यकारिणीची निवडणूक शनिवारी नवी दिल्ली येथील रवींद्र भवन येथे पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी माधव कौशिक, मल्लपुरम व्यंकटेश आणि रंगनाथ पठारे हे तीन उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीदरम्यान सर्व ९९ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

निवडणुकीत माधव कौशिक यांच्या बाजूने ६० मते पडली, तर कन्नड साहित्यिक मल्लपुरम व्यंकटेश यांना ३५ मते पडली. मराठी साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या बाजूने केवळ तीन मते पडली. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदासाठी प्रा. कुमुद शर्मा यांना ५० आणि सी. राधाकृष्णन यांना ४९ मते मिळाली. त्यानंतर अध्यक्षपदी माधव कौशिक आणि उपाध्यक्षपदी कुमुद शर्मा यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

प्रथमच महिला उपाध्यक्ष


अवघ्या एका मताने विजयी झालेल्या प्रा. कुमुद शर्मा या साहित्य अकादमीच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष ठरल्या आहेत. त्या २००६ पासून दिल्ली विद्यापीठात अध्यापनाचे कार्य करत आहेत. त्यांनी प्रसार भारती सुकाणू समिती, एनसीईआरटी सल्लागार मंडळ, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ शैक्षणिक परिषद यासह विविध संस्थांमध्ये त्यांनी काम केले आहे. प्रा. कुमुद शर्मा यांना त्यांच्या साहित्यिक आणि शैक्षणिक योगदानासाठी भारतेंदू हरिश्चंद्र पुरस्कार, बालमुकुंद गुप्ता पत्रकारिता पुरस्कार, दामोदर चतुर्वेदी स्मृती सन्मान आणि साहित्य श्री यासारख्या सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे.





 
Powered By Sangraha 9.0