हवाईदल सहा डॉर्नियर विमाने खरेदी करणार

11 Mar 2023 17:55:00
iaf-to-procure-six-dornier-२२८-aircrafts-from-hal-at-rs-६६७-crore-vwt


नवी दिल्ली: भारतीय हवाईदलाची परिचालन क्षमता वाढवण्यासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) सहा डॉर्नियर-२२८ विमाने खरेदी केली जातील. त्यासाठी एचएएलसोबत ६६७ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
 
वाहतूक वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांचा वापर केला जाईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. हवाई दलाकडे सध्या ५० डॉर्नियर-२२८ युटिलिटी विमाने सेवेत आहेत. हवाई दलाशिवाय भारतीय तटरक्षक दल आणि नौदलही या विमानांचा वापर करतात. आता नवीन करारामध्ये, ६६७ कोटी रुपये खर्चून पाच-ब्लेड संमिश्र प्रोपेलरसह प्रगत इंधन-कार्यक्षम इंजिनसह सहा विमानांची नवीन तुकडी खरेदी केली जाईल. हे विमान ईशान्येकडील लहान धावपट्टी आणि भारताच्या बेट साखळीपासून कमी अंतराच्या ऑपरेशन्ससाठी उपयुक्त आहे.

जानेवारी २०२० मध्ये डॉर्नियर-२२८ लाईट युटिलिटी विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात औपचारिकपणे समाविष्ट करण्यात आले. २०१५ मध्ये, हवाईदलाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत १४ डॉर्नियर-२२८ विमाने खरेदी करण्यासाठी करार केला. पहिले विमान १९ नोव्हेंबर २०२० रोजी हवाई दलाला सुपूर्द करण्यात आले. सेशेल्स आणि मॉरिशसमध्येही त्याची निर्यात करण्यात आली आहे. डॉर्नियर-२२८ हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड द्वारे भारतीय तटरक्षक दल, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलासाठी निर्मित ट्विन-टर्बोप्रॉप शॉर्ट टेक-ऑफ आणि लँडिंग युटिलिटी विमान आहे.

विमान प्रवासी वाहतूक, एअर-टॅक्सी ऑपरेशन्स, सागरी टेहळणी आदींसाठी हे विमान अतिशय उपयुक्त आहे. प्रदूषण प्रतिबंध, सैन्यदल वाहतूक, हवाई सर्वेक्षण, शोध आणि बचाव, मालवाहतूक आणि रसद सहाय्य यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. विमानाच्या कॉकपिटमध्ये दोन क्रू मेंबर्स आणि वातानुकूलित केबिनमध्ये १७ प्रवासी बसू शकतील. विमानाचे पंख १६.९७ मीटर, एकूण लांबी १६.५६ मीटर आणि एकूण उंची ४.८६ मीटर आहे.

Powered By Sangraha 9.0