जगाची डोकेदुखी वाढविण्यासाठी हिटलरशाहीचा नवा चेहरा

11 Mar 2023 15:09:36
Xi Jinping

नवी दिल्ली
: शी जिनपिंग यांची शुक्रवारी तिसर्‍यांदा चीनचे अध्यक्ष म्हणून एकमताने नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे ते माओ झेडोंग यांच्यानंतर सर्वाधिक काळ चीनचे नेतृत्व करणारे नेते बनले आहेत. त्याचवेळी जिनपिंग यांच्या या तिसर्‍या कार्यकाळात जगासमोरील डोकेदुखी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

बीजिंगमधील नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये हजारो प्रतिनिधींनी जिनपिंग यांचे अध्यक्षपद आणि त्यांना आणखी पाच वर्षांसाठी लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यावर मतदान केले. अर्थात, चीनमधील दिखाऊ राजकीय प्रक्रियेमध्ये ही केवळ एक औपचारिकताच होती. कारण, गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनामध्ये जिनपिंग यांनी साम-दाम- दंड-भेद वापरून पक्ष आणि देशावरील आपली पकड घट्ट केली होती. त्यानंतर आता शुक्रवारी २ हजार ९५२ प्रतिनिधींनी जिनपिंग यांच्या हुकूमशाहीवर शिक्कामोर्तब केले. त्याचवेळी हान झेंग यांना चीनचे उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे.
 
 
शी जिनपिंग यांच्या अध्यक्षपदाच्या तिसर्‍या कार्यकाळात चीन जगासाठी अधिक धोकादायक होणार, यात आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांना कोणतीही शंका वाटत नाही. जिनपिंग हे आपल्या यापूर्वीच्या कार्यकाळातील आक्रमक विस्तारवादाचे धोरण कायम ठेवतील. त्यामुळे भारतासह जगाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. अर्थात, भारताची चीनविषयीचे धोरण अतिशय ठाम असल्याचे डोकलाम ते गलवान खोरे संघर्षामध्ये स्पष्ट झाले आहे. चीनच्या लष्करी अरेरावीस दुप्पट क्षमतेने प्रत्युत्तर देऊन भारताने चीनचे दात त्यांच्याच घशात घातले आहेत. त्याचप्रमाणे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीदेखील भारत - चीन संबंध हे सर्वसामान्य नसल्याचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपल्या तिसर्‍या कार्यकाळात भारतासोबत संघर्ष सोपा नसल्याची जिनपिंग यांनाही जाणीव आहे.
 
जिनपिंग हे जगासाठी धोकादायक

शी जिनपिंग यांची तिसर्‍यांदा चीनच्या अध्यक्षपदी झालेली नियुक्ती ही जगासाठी अतिशय धोकादायक घटना आहे. शी जिनपिंग यांची तुलना जग आता अ‍ॅडॉल्फ हिटलरसोबत करते. कारण, जिनपिंग यांचा स्वभाव आणि आक्रमक विस्तारवादाचे धोरण हे हिटलरप्रमाणेच आहे. चीनच्या सामर्थ्याचे दर्शन घडविणे, अनेक देशांच्या भूभागांवर कब्जा करणे - दावा करणे हे प्रकार त्यांचे वैशिष्ट्य. जिनपिंग यांच्या कार्यकाळात चीनचा जपानसोबतचा संघर्ष तीव्र झाला. दक्षिण चिनी समुद्रात संघर्ष आहे. तैवान आणि भारतासोबत संघर्ष तीव्र झाला आहे. आता तिसर्‍या कार्यकाळात जिनपिंग हे अधिक आक्रमक होतील. त्यामुळे आशियासह जगाचे वातावरण तापलेले राहणार आहे. त्याचप्रमाणे चीन - अमेरिकेतील मतभेदही मोठ्या प्रमाणात वाढतील. जिनपिंग यांना नियंत्रणात आणण्यासाठी समविचारी राष्ट्रांनी एकत्र येणे, हे अत्यावश्यक झाले आहे.
- शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक


Powered By Sangraha 9.0