तळेगावचा तेजस्वी गदरी तारा...

    11-Mar-2023
Total Views |
Vishnu Ganesh Pingle


सावरकरांनी लिहिलेल्या ‘तेजस्वी तारे’ या पुस्तकात त्यांनी दहा क्रांतिकारकांची ओळख आपल्याला करून दिली आहे, त्यात विष्णू गणेश पिंगळे यांचा समावेश आहे. आपण येथे त्या क्रांतिकारकास समजून घेण्याचा प्रयत्न करू.
 
एखाद्या होतकरू नटाचे नाव जितके लोकांच्या तोंडी असते, तितकेदेखील त्या देशदेशांतरी त्याच्याच स्वातंत्र्यासाठी प्राण संकटात घालून झगडत, झुंजत, सहत, भटकत असलेल्या हिंदी निर्वासिताचे नाव कोणाच्या तोंडी नसते. इतकेच नव्हे, तर क्रांतिकारकाचा संपूर्ण कार्यक्रम पुढे नसता आणि जो तटपुंजा कार्यक्रम त्याच्यापुढे असतो, त्याचे मर्मही कळण्याइतके इतिहासाचे आणि राजकारणाचे प्रत्यक्ष ज्ञान अनेकांना नसते. हिंदुस्थानी क्रांतिकारकांच्या चळवळीचे मध्यवर्ती केंद्र परदेशस्थ क्रांतिकारक हे बर्‍याच वर्षांपर्यंत राहिले होते. याचे उत्तरदायित्व ब्रिटिशांच्या अन्यायी नि हिडीस राज्यपद्धतीवर, की ज्यामुळे क्रांतीची चळवळ हिंदुस्थानात अवघड होऊन बसली होती.

इसवी सन १८५७ मध्ये इंग्लंडच्या दास्यत्वाचे जू फेकून देण्याचा हिंदी राष्ट्राने प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही. त्यावेळी हिंदी राष्ट्रीय पुढार्‍यांचे प्रतिनिधी परदेशात गेले. त्यांनी फ्रान्स नि रशिया यांच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो सिद्धीस गेला नाही. त्या काळापासून साधारणतः स्वातंत्र्याकरिता करण्यात आलेल्या प्रत्येक राजकीय चळवळीतून अशी माणसे बाहेर पडली की, त्यांना हिंदुस्थानात अज्ञातवासात राहावे लागले किंवा या परदेशाचा आश्रय करावा लागला. बहुदा ही माणसं म्हणजे ध्येयवादी नि करारी अशा व्यक्ती असून, जर त्यांनी हिंदुस्थानात उघड उघड राजकीय क्रांती केल्या, तर त्यांना कारागृहात बद्ध व्हावे लागले असते किंवा ते फाशी तरी गेले असते. अशा परदेशी राहिलेल्या गृहस्थाविषयी विशेषतः माहिती आपण आज येथे बघणार आहोत.

विनायक दामोदर सावरकर हे जसे स्वातंत्र्यवीर होते तसेच ते लेखनकार्यातही निष्णात होते. त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. त्या नभोमंडलात त्यांचे ’तेजस्वी तारे’ नावाचे स्फुट लेखन आहे.सावरकरांनी लिहिलेल्या ‘तेजस्वी तारे’ या पुस्तकात त्यांनी दहा क्रांतिकारकांची ओळख आपल्याला करून दिली आहे, त्यात विष्णू गणेश पिंगळे यांचा समावेश आहे. आपण येथे त्या क्रांतिकारकास समजून घेण्याचा प्रयत्न करू.दि. २ जानेवारी, १८८९ रोजी पुण्याजवळील तळेगाव ढमढेरे येथील चित्तपावन ब्राह्मण परिवारात जन्मलेल्या विष्णू गणेश पिंगळे यांचे शालेय शिक्षण हे तेथील शाळेत झाले. नंतर उच्चशिक्षणासाठी इ. स. १९११ साली अमेरिकेतून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. मनात आणले असते, तर सरकारी अथवा खासगी आस्थापनांत गलेलठ्ठ पगाराची नोकरी स्वीकारून ते सुखाने जगले असते.

तथापि, देशाच्या दुर्दर्शेने, पारतंत्र्यातील जुलमामुळे पिंगळे तळमळत असल्याने क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी ठाम निश्चय केला. विदेशात असतानाच त्यांनी लाला हरदयाळ, पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्यासोबत ‘गदर पार्टी’ या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. भगतसिंग यांना पिंगळे यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली होती.ऑरेगॉन व कॅलिफोर्निया संस्थानातील सैन्य सिद्धतेला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. त्यांच्या देखरेखीखाली प्रसिद्ध तयार ’गदरी लष्कर’ तयार झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सशस्त्र क्रांती करून देश स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने पिंगळे हिंदुस्थानात परत आले. रासबिहारी बोस, विष्णू पिंगळे, कर्तारसिंह सराबा, शचिंद्रनाथ संन्याल आदींनी दि. २१ फेब्रुवारी, १९१५ रोजी हिंदुस्थानात सार्वत्रिक सशस्त्र उठाव करण्याची योजना केली होती. फितुरीमुळे त्यांचा कट फसला आणि विष्णू पिंगळे यांच्यासहित आठ क्रांतिकारकांना लाहोरच्या कारागृहात दि. १६ डिसेंबर, १९१५ रोजी फासावर चढवले गेले. त्या हुतात्म्यांत विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह कर्तारसिंह सराबा, सरदार बक्षीससिंह, सरदार जगनसिंह, सरदार सुरायणसिंह, सरदार बुटासिंह, सरदार ईश्वरसिंह, सरदार हरनामसिंह हे क्रांतिकारकही होते.

१८२९ साली तळेगावात स्थापन झालेल्या एका लहान शाळेच्या शतवार्षिक वाढदिवसाच्या लहानशा घटनेच्या कार्यक्रमप्रसंगी १९२९च्या सप्टेंबरात सावरकरांनी आपल्या मनोगतात त्या शाळेबरोबर पिंगळे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. मनुष्यास १०० वर्षे झाली, तर आपण १०० वर्षे भरली असे म्हणतो. कारण, मनुष्याचे सामान्य आयुष्य तरी आजवर १००च्यावर गेलेले नाही. परंतु, संस्थांचे आयुष्य अनेक शतकांचे असू शकते. म्हणूनच संस्थेला १०० वर्षे झाली म्हणजे ती गोष्ट आगामी निकट अंताची दुःखसुचक घटना होत नसून तिच्या भावी भरभराटीची आनंददायी हमीही होऊ शकते आणि म्हणूनच आपण तो शतवार्षिक वाढदिवस अशा पूर्ण आनंदाने साजरा करतो. संस्कृतमधील एका सुभाषिताच्या आशयाला अनुसरून सावरकर सांगतात की, ‘काकबळीवर कावळा सुद्धा पुष्कळ वर्ष जगतो. पण, त्याचे जगणे निरर्थक असते.’ (काकोऽपि जीवती चिराय बलिंच भुड़्क्ते।). नुसतेच दीर्घकाळ जगणे ही जरी कौतुकाची गोष्ट असली तरी ती तेवढ्यामुळे महत्त्वाची होऊ शकत नाही. पण, तळेगावच्या शाळेविषयी अशा महत्त्वाचीही एक घटना संलग्न झालेली आहे आणि म्हणून तिची स्मृती आपण सर्वांनी बाळगली पाहिजे. ती घटना म्हणजे देशवीर विष्णू गणेश पिंगळे हे त्या शाळेतील विद्यार्थी होते.


१९१४च्या जर्मन महायुद्धाचा फायदा घेत ‘गदर’ (बंड) संस्थेचे सेनानींच्या झुंडी जेव्हा ‘चलो भाई! मातृभूमिको मुक्त करनेको चलो!’ अशा अक्षरशः गर्जना करीत जलवाहतूक करणार्‍या बाष्पनौकात (steam engine) चढल्या तेव्हा त्या क्रांतिकारकांत देशवीर पिंगळे हेही स्वदेशास परत फिरले. जर्मन रणतरीतून शस्त्रास्त्रे हिंदुस्थानास पाठवून मागोमाग हे शेकडो क्रांतिकारक चीन, सिंगापूर, ब्रह्मदेश इत्यादी भागातील ब्रिटिश सैन्यातील भारतीय सैनिकांस भडकावित आणि बंडास चेतवीत हिंदुस्थानात घुसले. ‘कोमागाटा मारू’ प्रकरणाप्रमाणे इंग्रज सैन्याशी बंदरावर उतरताच उघड लढाई देऊन मारत मरत आपली वाट काढून देशभर पसरले. काही गुप्तपणे बिनधोक प्रवेशू शकले, त्यात देशवीर पिंगळे होते. पंजाबमध्ये सैन्य बिथरवून अनेक इंग्रज अधिकार्‍यांना मारून शस्त्रास्त्रार्थ लागणार्‍या निधीसाठी दरोडे घालून, या लोकांनी मोठा धुमाकूळ मांडला. देशवीर पिंगळेही, त्यांचे बहुतेक साथीदार पंजाबातील शूर शीखांतच असल्याने, तिकडेच त्या धुमाकुळीत गुंगून गेले. शेवटी लाहोरचा खटला झाला, त्यात जे क्रांतिकारक सापडले त्या सर्वांत वयाने अगदी तरुण आणि साहसाने अगदी अग्रगण्य असे दोन क्रांतिकारक होते.

एक करतारसिंग आणि दुसरे पिंगळे! त्यांनी आपण क्रांतिकारक असल्याचे स्वतःच सांगितले. ब्रिटिशांची सत्ता आणि न्यायालये यांचा अधिकारच त्यांनी नाकारला आणि अक्षरशः हसत हसत ते फासावर चढले, असा हा देशवीर 'A real hero' २५च्या आत स्वदेश स्वातंत्र्यार्थ फासावर चढला.केवढी दुर्दैवाची गोष्ट की, त्याचे नावही सुशिक्षित महाराष्ट्रात हजारात एकास माहीत नाही.सावरकर हे देशवीर पिंगळे यांच्याबाबतीत जे शेवटी म्हणतात, त्याचा किमान आपल्यासारख्या महाराष्ट्रीय जनतेने नक्की विचार करायला हवा. तळेगावच्या आपल्या भाषणात सावरकरांनी त्या शाळेच्या चालकांना सूचवले होते की, त्यांनी त्या शाळेत देशवीर पिंगळे यांच्या नावाचा एक पितळी स्मृतिफलक लावावा किंवा त्यांचे तैलचित्रतीत ठेवावे. पिंगळे यांचेच नव्हे, तर महाराष्ट्रात ५७च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर झालेल्या देशवीरांच्या जे जे देशासाठी प्राणत्याग करते झाले, त्यांच्या-सर्वांच्या जन्मग्रामी किंवा शाळेत किंवा वसतिगृहात कुठे तरी असा एक छानदार आणि ठळक असा स्मृतिफलक लाविला जावा. या सर्वांची तर चरित्रे परिश्रमपूर्वक माहिती मिळवून ऐतिहासिक प्रमाणांच्या कसोटीने लिहिली जावी.

दि. १६ नोव्हेंबर, १९१५ ला क्रांतिवीर हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना फाशी देण्यात आली. म्हणून हा दिवस ‘हुतात्मा दिवस’ म्हणून तळेगावकर आणि पंचक्रोशीत साजरा करतात. तेथील ग्रामस्थांसमवेतच सरकारी पातळीवर पिंगळे यांच्यासहित अनेक देशवीरांचे सदा स्मरण केले जाते व त्यांना विविध प्रसंगी मानवंदना दिली जाते. आज ना तर पिंगळे यांची जयंती वा पुण्यतिथी अथवा हुतात्मा दिन! तरीही आज आपण पिंगळे यांनादेखील कायम स्मरणात ठेवत आपली राज्य व देशभक्ती सतत तेवत ठेवत त्यांना वंदन करू. या व्यक्तिमत्वावर तसे बघता खूप काही लिहिता येऊ शकते. पण, तुर्तास माझे हे स्वल्प संकलन आता येथे थांबवतो.



-श्रीपाद पेंडसे




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.