सावरकर परिवारातील तीन तेजस्वी स्त्रिया भाग-२

11 Mar 2023 21:18:21
Three brilliant ladies of the Savarkar family

तात्याराव सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई उर्फ माई यांचे माहेर त्र्यंबकेश्वरच्या जवळ असलेल्या जव्हारचे. त्यांचे वडील रामचंद्र उर्फ भाऊराव चिपळूणकर हे जव्हार संस्थानचे दिवाण होते. ते अतिशय श्रीमंत होते. तात्यारावांचे आजोळ कोठूरचे. त्यांच्या मामांचे नाव गोविंद मनोहर. तात्यांचे आई-वडील खूप लवकर मृत्यू पावले असल्याने हे मामाच सावरकर कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती होती. त्यांनी एके दिवशी अचानकपणे जाहीर केले की, “मी तात्याचे लग्न यमुना चिपळूणकरशी नक्की केले आहे.” थोड्या चर्चेनंतरतात्यांनीही या विवाहाला संमती दिली आणि मार्च १९०१ मध्ये नाशिक येथे हा विवाह साजरा झाला.


या विवाहानंतर यमुनाबाई यांचे आयुष्य पार बदलून गेले. त्या माहेरी अत्यंत श्रीमंतीत वाढलेल्या होत्या. पण, सावरकर कुटुंब मात्र अगदी साधारण आर्थिक परिस्थितीत दिवस काढत होते. पण, त्यांनी या बदलाशी शांतपणे जुळवून घेतले. त्या छान रांगोळ्या काढत, फुलांचे उत्तम हार करत असत. सर्वांशी मिळून मिसळून वागत. त्यांची मोठी जाऊ-येसूबाई - यांच्याशी त्यांची छान मैत्री झाली. त्यांनी स्थापन केलेल्या ‘आत्मनिष्ठ युवती समाजा’चे काम त्या मनापासून करू लागल्या. त्यांनी स्वदेशीचे व्रत स्वीकारले. सप्टेंबर १९०५ मध्ये तात्या आणि माई या दाम्पत्याला मुलगा झाला. त्याचे नाव प्रभाकर असे ठेवण्यात आले. पण, माईंच्या पुढच्या आयुष्यात काही अनपेक्षित घटना घडणार होत्या. तात्यारावांचे लंडनला उच्च शिक्षणासाठी जाण्याचे प्रयत्न चालू होते. त्या प्रयत्नांना यश आले आणि १९०६ सालच्या जून महिन्यात त्यांनी इंग्लंडसाठी प्रस्थान ठेवले. त्यामुळे छोट्या प्रभाकरचे संगोपन करण्याची जबाबदारी एकट्या माईंवर येऊन पडली. ती त्या चांगल्या तर्‍हेने पार पाडत होत्या. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. १९०९ सालच्या फेब्रुवारी महिन्यात प्रभाकराचा मृत्यू ओढवला.


पती परदेशी असताना आणि संपर्काची आजच्यासारखी कोणतीच साधने नसताना, त्यांनी या संकटाला एकटीने कसे तोंड दिले असेल?पुढे तात्यारावांना लंडनमध्ये अटक झाली. इकडे नाशिकला घरावर जप्ती आली आणि सावरकर कुटुंबाची वाताहत झाली. पण, या काळात यमुनाबाई यांना माहेरचा आधार मिळाला. पण, सरकारची वक्रदृष्टी चिपळूणकर कुटुंबाकडेही वळली. तात्यारावांचे सासरे असल्याने भाऊराव चिपळूणकर यांना जव्हार संस्थानमधली नोकरी गमवावी लागली.तात्या अंदमानमध्ये होते तो काळ यमुनाबाई यांच्यासाठी फारच खडतर होता. हळूहळू परिस्थिती पालटली. १९२४ मध्ये तात्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले आणि त्यांना रत्नागिरी येथे कुटुंबासमवेत राहण्याची परवानगी मिळाली. त्यावेळेस त्यांचा संसार खर्‍या अर्थाने सुरू झाला. या काळात तात्यारावांनी समाजसुधारणेची मोठी चळवळ हाती घेतली होती. माई या चळवळीत सहभागी झाल्या. विशेषत: जातिभेद निर्मूलनाच्या कामात त्या आघाडीवर असत. याच काळात कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे सावरकरांच्या भेटीसाठी रत्नागिरीला आले होते.

सावरकर पती-पत्नी यांनी हाती घेतलेले हे असामान्य काम पाहून ते अतिशय प्रभावित झाले आणि त्यांनी या दोघांची मुक्तकंठाने स्तुती केली. तात्याराव कडवे विज्ञानवादी होते; पण माई मात्र धार्मिक प्रवृत्तीच्या, व्रतवैकल्ये -जपजाप्य करणार्‍या होत्या.रत्नागिरीच्या वास्तव्यात सावरकर दाम्पत्याला एक मुलगा (विश्वास) आणि एक मुलगी (प्रभात) झाली. पुढे सावरकर पूर्णपणे निर्बंधमुक्त झाले. तात्यारावांचे कुटुंब मुंबईला सावरकर सदनामध्ये राहू लागले. तात्या सार्वजनिक जीवनात क्रियाशील होतेच. पण, माई मात्र पूर्णपणे गृहिणीचीच भूमिका बजावत होत्या. दि. ८ नोव्हेंबर, १९६३ या दिवशी त्यांचे निधन झाले.माई सावरकरांबाबत त्यांचे चिरंजीव विश्वासराव यांनी काही लेखन केले आहे. ठाणे येथील साधना योगेश जोशी यांनी २०१९ मध्ये त्यांच्याबाबत एक पुस्तक लिहिले आहे. माई सावरकरांच्या स्नुषा सुंदराबाई यांची मुलाखत घेऊन, अनेक दुर्मीळ छायाचित्रे देऊन त्यांनी हे लेखन केले आहे.
 
-डॉ. गिरीश पिंपळे



Powered By Sangraha 9.0