हिंदू समाज शक्तिशाली, भारत विश्वगुरू बनणार!

    11-Mar-2023   
Total Views |
Padma Shri Ramesh Pantage Interview

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत रमेश पतंगे यांना नुकताच भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल शुक्रवार, दि. १० मार्च रोजी आकाशवाणीवर त्यांची सविस्तर मुलाखतही प्रसारित झाली. त्या मुलाखतीच्या अनुषंगानेच रमेश पतंगे यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला आणि त्यातूनच दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांसाठी एक स्वतंत्र मुलाखत आकारास आली. पतंगे यांच्याशी साधलेल्या मुक्तसंवादाला या मुलाखतीच्या माध्यमातून मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...

 
सर्वप्रथम आपल्याला ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पुनश्च अभिनंदन. पुरस्काराविषयी कळले तेव्हा आपल्या मनात कोणत्या भावना दाटून आल्या?

 
‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित झालो, हा खरे तर माझ्या एकट्याचा सन्मान नाही. माझ्यासोबत ‘समरसते’च्या प्रवाहात नि:स्वार्थीपणेकार्य करणार्‍या अनेक लोकांचा हा सत्कार आहे. ‘समरसते’च्या संकल्पनेचे वास्तव जगताना ज्या ज्या अनुभूती आल्या, त्या सर्वांचा हा सन्मान आहे. त्यामुळे हा सन्मान त्या सर्वांचा आहे.

तुमच्या जडणघडणीमध्ये रा. स्व. संघाने मोलाची भूमिका बजावली आणि आजही तुमचे जगणे संघाशी समरस आहे. त्याविषयी काय सांगाल?


आज जो काही ‘रमेश पतंगे’ तुम्हाला दिसतो, तो संघ संस्कारांचे मूर्त रूप आहे. संघाचे वातावरण, विचार, संस्कार असतात. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, त्यांचे वागणे-बोलणे हे संस्कारच असतात. सकारात्मक ऊर्जा या संघाच्या सर्व स्तरातून येते. मी बाल असताना माझे संघ शिक्षक होते चंद्रकांत दिवकार. मी सातवीत असताना ते सगळ्यांना म्हणाले होते की, “हा रमेश पुढे क्षमतावान कार्यकर्ता होणार.” म्हणूनच की काय त्यांनी मला खूप जबाबदार्‍या दिल्या. त्यांचे संस्कार चिरकाल माझ्या मनावर ठसले आहेत.


दुसरे एक अरविंद जोशी हे शिक्षक आठवड्यातून एकदा घरी येत. मी दहावीला होतो. मी काय करतो, अभ्यास कसा चालला आहे, याची अगदी आस्थेनेविचारणा करत. पार्लेनगर कार्यवाह महेंद्र श्रृंगी. त्यांनी माझ्यावर खूप विश्वास टाकला. पुढे आणीबाणीनंतर दामुअण्णा दाते यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी मला ‘समरसता मंच’चे कार्यवाह केले. ‘समरसता’ विचार जो विस्तारला, त्यात त्यांचे योगदान जबरदस्त आहे. आज लोक मला ‘विचारवंत’ वगैरे म्हणतात,मानतात, त्यात मोठे योगदान दामुअण्णांचे आहे. माझ्या व्यक्तिमत्त्वावर त्यांचे संस्कार कळत-नकळत झाले आहेत. मी कोणताही लेख लिहिला की, सर्वांत आधी दामुअण्णांना वाचायला पाठवायचो. एवढी मोठी व्यक्ती, पण त्यांनी मला कधीही निरूत्साही केले नाही. कोणताही लेख वाचून प्रतिक्रिया द्यायचे आणि कळणारही नाही या शब्दात सूचनाही करायचे. तेव्हा त्यांचा आवडता शब्द होता अप्रतिम! लेख वाचून म्हणायचे “अप्रतिम, अरे तुला हे सगळे सुचते कसे.” पुढे ‘मी, मनु आणि संघ’ त्यांना वाचायला दिले. त्यांनी त्यामध्ये आणखीन विषय सुचविले.

असा हा तुमच्या आयुष्याच्या कणाकणात रुजलेला संघ लवकरच आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करेल. तेव्हा, संघाच्या या शतकी वाटचालीचे गमक काय, असे आपल्याला वाटते?


संघ शताब्दी वाटचाल अनेक चढउतारांतून झाली. तीन वेळा बंदी आणि त्यातूनही पार पडून संघ पूर्ण ताकदीनिशी वारंवार उभा राहिला. संघ देशाची मध्यवर्ती शक्ती आहे. शक्ती असल्यामुळे शक्तीचा गुणधर्म असतो. ती बाकीच्या लोकांना आकर्षित करते. संघ सर्वांना स्वीकारतो. संघ सगळ्या चांगल्या गोष्टी स्वीकारतो. संघ विचाराला आव्हान देईल, अशी कोणतीही विचारधारा आज देशात नाही. कारण, संघविचार सत्य आणि शाश्वत आहेत. सर्व विचारधारांचा समन्वय करून कालसापेक्षावर आधारित आहे. सर्वांना स्वीकारून समाजाला अनुकूल आहे ते घेऊन पुढे जायचे हाच संघाचा विचार. अशा संघासमोर कोण टिकणार?

तुम्ही केवळ तुमच्या लेखणीतूनच समाजचित्र मांडलेले नाही, तर प्रत्यक्षात विविध समाजांची जडणघडणही अगदी जवळून अनुभवली आहे. संघाच्या माध्यमातूनही सामाजिक पातळीवर अनेक प्रकल्प, उपक्रम राबविले जातात. तेव्हा, संघाच्या या सामाजिक योगदानाविषयी काय सांगाल?


समाजवाद्यांचे समाजकारण किंवा गांधीवादाचे समाजकारण एका विशिष्ट कालावधीत सुरळीत होते. त्यांनी सामाजिक चळवळीला धरून संस्था उभारल्या. मात्र, संस्था उभारलेल्या व्यक्ती गेल्यानंतर त्या संस्थांचे काय झाले? आता काय आणि पूर्वी काय? खरे सामाजिक काम संघाच्या माध्यमातूनच सुरू आहे. कारण, संघाचे काम व्यक्तिनिरपेक्ष आहे. व्यक्तिकेंद्री नाही. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील, नव्हे संघाची सगळीच कामे ही व्यक्तिकेंद्री नाही, तर विचार आणि समाजकेंद्री आहेत. त्यामुळे काम उभारणारी व्यक्ती गेली तरी काम संपत नाही की, नष्ट होत नाही. १९६० साली तलासरी संघाचा मोठा प्रकल्प उभा राहिला. माधवराव काणे यांचे त्यामध्ये मोठे योगदान होते. माधवराव काणे गेले म्हणून तो प्रकल्प संपला नाही. प्रकल्प कार्यासाठी दुसरा कार्यकर्ता उभा राहिला. नानाजी पालकर आणि चित्रकुट हेसुद्धा असेच अतुट नाते. पण, नानाजी गेल्यानंतर संघाच्या कार्यकर्त्यांनी काम सुरूच ठेवले. थोडक्यात, संघाच्या विचारावर आधारित सामाजिक कार्य उभे राहिले. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, आज खरे समाजकारण संघच करत आहे.

समाजकारणाबरोबरच हिंदू जनजागरण हे संघाच्या मूळ उद्दिष्टांपैकी एक. तेव्हा, सद्यस्थिती पाहता, हिंदू समाजासमोर नेमकी कोणते आव्हाने आहेत? आणि हिंदू समाजाच्या भविष्याविषयी काय सांगाल?


आजही देशात समाजाची असंघटित अवस्था संपलेली नाही. सर्व भारतीयांनी हे मानणे गरजेचे आहे की, ’आपला एक देश एक संविधान आहे.’ या संविधान, देशावर माझी पहिली निष्ठा राहील. आपले मानबिंदू आपलेआदर्श ठरवले पाहिजे. देशाच्या मानबिंदू संबंधी मी कोणत्याही पक्षात असलो तरी कोणती तडजोड नाही. आपल्याकडे आजही काही लोक ज्ञानेश्वरीवर किंवा रामचरितमानसवर बरळताना दिसतात. त्यातून समाजाला विकलांग करण्याचा प्रवाह लादला जातो.देशाच्या आस्थेबद्दलची, समाजाच्या आदर्शांबद्दल वाईट, वाकडे बोलणे, कृती करणे थांबायला हवे. तसेच, हिंदू समाजातील लोकांचे धर्मांतर, ‘लव्ह जिहाद’ आक्रमण हे सगळे गंभीर विषय आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की, धर्मांतर हे राष्ट्रांतर असते. धर्मांतर करून माणसाला देश आणि संस्कृतीपासून तोडले जाते. हे धोकादायक असते. याला प्राणपणाने विरोध केला पाहिजे, असे जरी असले तरी हिंदू समाज शक्तिशाली आहे आणि त्याचे भविष्य उज्ज्वलच आहे.
 
हिंदू समाज शक्तिशाली आहे, असे म्हणता तो कसा?

हिंदू समाज सामर्थ्यशाली आहे. तसे नसते तर हिंदू समाज नामशेष झाला असता. मध्यपूर्वेतीलसगळे देश, ज्याला अरबस्तानातील देश म्हणतात, ते मुस्लीम धर्माच्या उदयानंतर १०० वर्षांत मुसलमान झाले. मुसलमानांच्या आक्रमणाखाली इराण देश तर ५० वर्षांत मुसलमान झाला. पण, भारतात ८०० वर्षे मुसलमानांची अतिशय क्रूर धर्मांध राजवट असूनही भारत मुसलमान झाला नाही. कारण, हिंदू समाज, धर्माचे सामार्थ्य. हे सामर्थ्य पुरून उरले आणि उरेल! आणखी एक सांगतो की, आजचे भारतातले मुसलमान पुढच्या ५० वर्षांच्या कालावधीत आपण कधीकाळी हिंदू होतो, मला माझ्या जुन्या धर्मात परत यायचे आहे, यासाठी आंदोलन करतील. मला असे ठाम वाटते. कारण, आज ज्या काही ठरावीक मुस्लीम संघटना भारतविरोधी आंदोलन करतात, त्यांना विदेशातून सामर्थ्य मिळते. या असल्या लोकांना सामर्थ्य देणार्‍यांची आज स्थिती काय आहे?


 पाकिस्तानची आजची स्थिती काय आहे? अजून दहा वर्षांत तर पाकिस्तान अस्तित्वात नसेल असे आज वाटते की नाही? तसेच अरबस्तानची ताकद तेलसमृद्धीवर आधारित.पण, जगभरातील देश तेलाला पर्याय शोधत आहे. भविष्यात तसले सशक्त पर्याय उभे राहतील.तेलाची मागणी कमी झाली की, तेलावर उड्या मारणार्‍यांची ताकद कमी होणार. मग त्यांच्या जीवावर भारतात आंदोलन आणि विरोध करणार्‍यांना आर्थिक आणि इतर पाठबळ मिळणार कुठून. या लोकांची परजीविता कुठपर्यंत जीवित राहणार? त्यामुळे भारतीय मुसलमानांना मूळ धर्मात जाण्याशिवाय पर्याय नसणार. ही सगळी हिंदू समाजाची शक्ती आहे.

 
राजकारणामध्ये मागासवर्गीय समाजाचा टक्का वाढावा, अशी वैचारिक भूमिका आपण सातत्याने मांडता. याचे नेमके फलित काय?


पक्षीय राजकारण, गणित भिन्न असते. त्यामुळे मी काहीही सांगितले, तर त्याचा विचार करून राजकीय नेते तसेच करतील, अशा भ्रमात मी राहत नाही. पण, विचारधारा म्हणून विषय मांडावे लागतात. विचारधारा मानणारे नेते ते विचार त्यांच्या चौकटीत बसवतात. समाज जसा आहे, तसा तो राजकारणातही दिसला पाहिजे. सर्व समाजगटांना राजकारणात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. राजकारणातील सत्तेपासून कोणी वंचित राहायला नको, निर्णय प्रक्रियेतसुद्धा ज्यांची क्षमता आहे, त्यांना सहभागी करून घ्या, हे सर्व स्तरातून मांडत असतो. जे समाजाप्रति आणि विचारधारेशी निष्ठावान असतात, ते राजकीय नेते यावर विचार करतात.

राजकारणाबरोबरच सामाजिक समरसतेमध्येही आपले योगदान आमूलाग्र आहे. तेव्हा, सामाजिक समरसतेच्या ५० वर्षांतील यशापयशाकडे आपण कसे पाहाता?


सामाजिक कार्यामध्ये अपयश नसते. कार्य सुरू केले, तर यशच मिळते. यशाचे प्रमाण कमी-अधिक असू शकते. महाराष्ट्रात समरसतेच्या चळवळीला बौद्धिक आधार आहे. हिंदुत्ववादी विचार हा समानतावादी आहे. तो फुले, आंबेडकरविरोधी नाही, जातीपातीविरोधी नाही. हे समाजात पेरणे गरजेचे होते. लोकांना यासाठी पुस्तकं, लेख लागतात. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांत अनेक पुस्तके लिहिली गेली. नामदेव कांबळे ते अगदी डॉ. ईश्वर नंदापुरेंनी पुस्तक लिहिले. सामाजिक समरसतेचा विचार घेऊन खूप मोठ्या संख्येने महाराष्ट्रात लोक उभे राहिले हे मोठे यश! मुळात अस्पृश्यता ही रूढी आजही खेडोपाडी या न त्या स्वरूपात पाळली जाते. त्यामुळे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी ‘एक गाव, एक मंदिर, एक पाणवठा, एक स्मशान’ ही संकल्पना सांगितली. यासाठी सामाजिक समरसतेचा वारसा जपत खेडोपाडी कार्य चालले. या कार्याला यश मिळत आहे. तसेच, समाजालाही पटले आहे की, जातीपाती,विषमता कालबाह्य आहे आणि त्याप्रमाणे समाज सकारत्मकरित्या बदलत आहे. हे सगळे गतिमान पद्धतीने होत आहे. आणखी पाच वर्षांत याचे फलित दृश्य असेल. या सगळ्यासाठी समरसतेसाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांची भूमिका निश्चितच मोठी आहे.

सामाजिक समरसतेबरोबरच तुम्ही विपुल विषयांवर लेखन केले आहे. तेव्हा, एक विचारवंत, सामाजिक कार्यकर्ता, बौद्धिक योद्धा आणि लेखक म्हणून तुमच्यावर कुणाचा प्रभाव आहे?

 
माझ्यावर कुणा एका व्यक्तीचा प्रभाव पडला, असे सांगता येणार नाही. जगातील कोणत्या पुस्तकातील विधान- विचार माझ्यासाठी विचारणीय आणि प्रेरणादायी आहेत, तर ते आहेत वेद. वेदांमध्ये व्यक्त केलेले विचार हे अखिल मानवजातीच्या कल्याणासाठीचे विचार आहेत. आपल्या संतसाहित्याची परंपरा साहित्य हेसुद्धा अतिशय चिंतनशील आणि प्रभावी आहे. आमच्या ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितले ते काय स्वतःसाठी? की त्यांच्या कुटुंबासाठी? तर त्यांनी अवघ्या मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. हे सगळे किती चैतन्यमय आहे. जातपात, प्रांत, वंश, वर्ण, स्तर, वर्ग यापलीकडे जाऊन केवळ माणूस म्हणून माणसाचे कल्याण चिंतणारी भूमिका ही भारताच्या वैचारिकतेचा गाभा आहे. हीच वैचारिकता माझ्या लेखनाचा पाया आहे.

‘मी मनु आणि संघ’ या पुस्तकाने साहित्य-सामाजिक वर्तुळात वादळ निर्माण केले. त्या पुस्तक लेखनाचा अनुभव आणि त्याची तात्कालिकता याविषयी काय सांगाल?


‘मी, मनु आणि संघ’ १९९५ साली प्रकाशित झाले. ते माझे पुस्तक प्रथमवचनी आहे. त्याप्रमाणे संघाच्या आयामात प्रथमवचनी पुस्तक लिहिलेले नाही. मग ती प्रथा मोडायचे काय कारण झाले? तर ते कारण झाले की, ८०-९०च्या दशकात पुरोगामी लोकांनी संघाविरोधी एक जोरदार ‘नरेटिव्ह’ चालवला की संघ मनुवादी आहे, संघ समजाविरोधी आहे. अस्पृश्यता संघाला कायम ठेवायची आहे. विषमता कायम ठेवायची आहे. संघ जातीवादी आहे वगैरे वगैरे. याविषयी या मंडळींनी अगदी रटाळ पुस्तकं लिहिली. पुस्तकं लिहिली, म्हणजे काय तर, घरात बसायचं हस्तिदंती मनोर्‍यात बसायचं आणि पांढर्‍यावर काळं करायचं. पण, याचा समाजावर परिणाम होतो. खोटे हे अनेकदा सांगितले, तर ते खरे वाटते. याला उत्तर द्यायचे. या सगळ्या तर्कमार्तंडांच्या भाषेत सांगायचे, तर मी अत्यंत कनिष्ठ जातीतजन्मलो. त्यांच्या विचारांप्रमाणे संघात मला स्थान मिळणार नव्हते. पण, तसे झाले नाही. संघाने मला खूप मोठे केले.

संघामध्ये सामाजिक समरसता, वैचारिक स्वातंत्र्य आणि आत्मियता याची माझ्या जीवनताली असंख्य उदारहणे मी पुस्तकात दिली आहेत. या उलट टीकाकार कसे ढोंगी, उथळ हे उदाहरणावरून कोट देऊन लिहिले. ते सबळ पुरावे होते. त्यामुळे ते कुणी खोडू शकत नव्हते. त्यामुळे संघ विषमतावादी आहे, हे बोलणार्‍यांची तोंड बदं झाली. कारण, माझ्या जीवनाचे अनुभव ते कसे खोडणार? माझे नव्हे, तर संघशक्तीत प्रवाहित असणार्‍या सगळ्यांचे जीवन मांडणारे पुस्तक झाले. हे ‘माझे’ नाही, तर ‘आमचे’ पुस्तक झाले. हे पुस्तक जबरदस्त लोकप्रिय झाले. या पुस्तकाने वादळ परिवर्तन घडवून आणले आहे.

अशा या गाजलेल्या ‘मी, मनु आणि संघ’ या पुस्तकाबद्दल मान्यवरांच्या काही आठवणी नक्कीच असतील! त्या जाणून घ्यायला आम्हाला आवडेल...

 
देशभरात आज कुठेही गेलो तरी मला कुणी ना कुणी तरी भेटतो आणि म्हणतो, ‘मी तुमचं ‘मी, मनु आणि संघ’ हेपुस्तक वाचलं आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अनेक विकृतांनी म्हंटले की, या पुस्तकात मी हास्यास्पद आरोप केले आहेत. त्यांचा आक्षेप सानेगुरूजींचे मी जे विधान पुस्तकात लिहिले, त्यावर होता. त्यामध्ये मी त्यांचा संघविरोध उदाहरणासहित स्पष्ट केला होता. त्यामुळे कुणी त्यांना कसे नाकारणार? मग या लोकांनी सानेगुरूजी महान होते सांगत, त्यांच्या इतर कामांची यादी द्यायला सुरुवात केली. पण, मी त्यांचे मोठेपण कुठे नाकारले होते? सानेगुरूजींबद्दलचे हे सगळे माझ्या लक्षात राहिले.

 
तसेच या पुस्तकाबद्दल पहिली प्रतिक्रिया दिली ती नितीन गडकरी यांनी. तेव्हा आमदार असलेले गडकरी म्हणाले होते की, “रमेशजी, पुस्तक अप्रतिम! कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारे आहे,” तर तत्कालीन बौद्धिक प्रमुख रंगाहरी म्हणाले, “तुमचे पुस्तक सर्वसामान्य वाचकांना बळ देणारे आहे.” तत्कालीन सरसंघचालक सुदर्शनजी यांनी तर पुस्तकाबद्दल आठवणच सांगितली की ते करूणानिधींना एकदा भेटले. तेव्हा त्यांनी सांगितले की, भाजपच्या एका कार्यकर्त्याने करूणानिधींना तामिळ भाषेतले ‘मी, मनु आणि संघ’ पुस्तक भेट दिले. पुस्तक वाचल्यानंतर करूणानिधी म्हणाले की, “संघ जर असा असेल, तर संघाला विरोध करण्यास आम्ही ४० वर्षे फुकट घालवले.”

 
भारतीय संविधानाविषयीचा आपला सखोल अभ्यास तर आहेच. पण, यानिमित्ताने आपण इतरही देशांच्या संविधानाचा सांगोपांग अभ्यास केला. तेव्हा, त्याविषयी काय सांगाल?


तसे पाहायला गेले, तर संविधान हा मुलगामी विचार आहे. तो विचार असा की देशाला एका महान कायद्याने बांधून ठेवणारे ते विचार असतात. त्या कायद्याची मूळं आपल्या देशाच्या सांस्कृतिक मूल्यावर बेतलेली आहेत.सनातन विचारांवर आधारित आहेत. हे अभ्यास केल्याशिवाय कळत नाही. आपल्या संविधानाची आणि जगभरातल्या देशातील संविधानाची तुलना केली, तर जाणवते की, जगातील सर्व लोकशाही राष्ट्रांचे संविधान हे ‘पॉलिटिकल कॉन्स्ट्ट्यिूशन’वर आधारित आहे.पण, सहे ‘पॉलिटिकल कॉन्स्टिट्यूशन’ म्हणजे राजकीय पक्षावर आधारित नाहीत. २७० वर्षांपूर्वी अमेरिकेने लिखित संविधान अमलात आणले. त्यात लोकांना अधिकार हवे होते. त्यातील काही लोकांचे म्हणणे की, पूर्वी आम्ही ब्रिटिश नागरिक होतो. जे ब्रिटिशांना अधिकार आहेत, ते आम्हालाही हवेत. दुसरीकडे ब्रिटनमध्ये तत्कालीन ब्रिटनचा राजा हा दूरदृष्टी नसलेला चक्रम राजा होता. त्यामुळे लोकांनी राजेशाही नाकरली. तिथे संविधान कशासाठी तर समान अधिकारासाठी. फ्रान्समध्ये लोकांना वाटले की, वाटेल ते कायदे करून कर लावणारा राजा कोण?


आमच्या संमतीशिवाय कर लादू नये, संपत्ती हडपू नये. आम्हालाही अधिकार मिळावेत. यासाठी मग फ्रेंच राज्यक्रांती झाली. त्यावरच आधारित संविधान आहे. आपले संविधान यापेक्षा वेगळे आहे. आपले ‘पॉलिटिकल’ बरोबरच सामाजिकतेवर आधारितसंविधान आहे. त्यामुळेच तर आपल्या संविधानाला ‘सामाजिक क्रांतीचा दस्तावेज’असे म्हणतात. आपल्यासारखे सामाजिक प्रश्न दुसर्‍या देशात नाहीत. आपल्या संविधानाचे वैशिष्ट्य असे की, सुरुवातीपासून कोणताही भेद न करता संविधानाने सर्व भारतीयांचा विचार केला. स्त्रीयांना समान संधी दिल्या. अमेरिकेमध्ये महिलांना मतदानाचाअधिकार १९२४ मध्ये, तर ब्रिटनमध्ये १९२७ साली स्त्रीयांना मतदान आणि राजकीय क्षेत्रात येण्याची परवानगी मिळाली. आपल्याकडे इतकी वाट बघावी लागली नाही. संविधान निर्मितीच्या सुरुवातीपासूनच आपल्या संविधानामध्ये स्त्रीयांनाच काय, कोणालाच संधीपासून डावलले गेले नाही.

 
आजही आपल्याकडे काही पुरोगामी आणि राजकीय पक्षांचे मंडळी ‘संविधान खतरे में हैं’ असा अपप्रचार करताना दिसतात. त्यांच्या या अपप्रचाराकडे आपण कसे पाहाता?


आपल्या संविधानाबद्दल लिहिताना मी जगभराच्या संविधानांचा संदर्भासहित अभ्यास केला. त्यामुळे मला आपल्या संविधानाचा आणि जगातील इतर देशांच्या संविधानाचा तौलनिक अभ्यास करता आला. त्यातून एकच निष्कर्ष निघाला की, आपले संविधान महान आहे. संविधान कधीही खतर्‍यामध्ये येऊ शकत नाही. जे असे म्हणत आहेत त्यात त्यांचा काहीतरी स्वार्थ आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व भारतीयांचे आदर्शस्थान. तळागाळातील जनतेच्या जगण्याला अर्थ येण्यासाठी त्यांनी जे कार्य केले ते वादातीत आहे. मात्र, त्यांचे नाव घेऊन काम करणार्‍या काही संस्था या बाबसासाहेबांच्या राष्ट्रप्रेमी विचारांपासून, समाजनिष्ठ विचारांपासूनफारकत घेतल्यासारखी भूमिका घेताना दिसतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी जीवपणाला लावणारा मोठा समाजवर्ग आहे. त्यांच्यामध्ये मुद्दाम दुहीचा विचार माजवण्यासाठी हे काही समाजविघातक विचारी लोक ‘संविधान खतरे में हैं’ म्हणत असतात. संविधानाचा अर्थ लावताना डॉ. बाबासाहेबांनी जे काही कष्ट घेतले आणि निर्णय घेतला त्याला तोड नाही.

असाच आणखी एक अपप्रचाराचा बळी ठरलेला विषय म्हणजे ‘अखंड भारत.’ त्याबद्दल आपली नेमकी काय भूमिका आहे?

 
अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश हा सांस्कृतिक भारत आहे. सांस्कृतिक भारत म्हणून एक स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. या संस्कृतीचे दर्शन या सांस्कृतिक भारतातीलप्रत्येक देशातील लोकगीत आणि लोककथांमध्ये दिसते. ज्या परिसरामध्ये आपण राहतो, त्या परिसरातील वन्यजीवन, पीक, वनस्पती याला धरून काही कथा असतात. त्यांना काही सांस्कृतिक मूल्ये असतात. ती सर्व मूल्ये या सांस्कृतिक भारतातील देशासारखी आहेत. उपासना पद्धती बदलल्यामुळे त्या त्या देशातील लोक सांस्कृतिकतेच्या मुळापासून कापले जात नाही. बलुचिस्तानचा एक प्राध्यापक म्हणाला होता की, ’बलुचिस्तान टू बांगलादेश इंडिया इज वन. आय एम इंडियन-पाकिस्तान.’ सांस्कृतिक भारतासाठी आजची राजसत्ता मोठ्या प्रमाणात काम करते. आपल्या देशात सांस्कृतिक भारत म्हणून गणल्या गेलेल्या देशांचे उत्सव आयोजित करायला हवेत. या सर्व देशांच्या लोककला, साहित्य यांचे संमेलन भरवायला हवे. त्याचा आस्वाद आणि भारतीय संस्कृतीशी जुडलेली पाळमुळे पाहण्यासाठी भारतीयांनी जायला हवे. सांस्कृतिक भारतातील देशाला भारतीयांनी आपले मानले पाहिजे.

पण, हे सगळे भारतीयांनीच करावे, असे आपल्याला सूचवायचे आहे का?


हो, कारण, भारतीय म्हणून आपण मोठे आहोत. वयाने, संस्कृतीने, साधनसंपत्तीने आपण मोठे आहोत. सांस्कृतिक भारत एक कुटुंब आहे. महाशक्ती आहे. या कुटुंबातील मोठ्या भावाची जबाबदारी भारताची आहे. मोठा भाऊ जसे सगळ्या वेगळे निघालेल्या भावांना सांगतो की, तुमचा स्वतःचासंसार उत्तम चालवा. काही लागले, तर मी आहेच. पण, लक्षात ठेवा की, आपण कुटुंंब म्हणून एक आहोत. तसेच भारताचे म्हणणे काय तर? आज सांस्कृतिक भारतातील देश स्वतंत्र राज्यकारभार करतात, पण भारतीय संस्कृतीच्या बंधात ते एक आहेत.

भारताचे अहीत चिंतणार्‍या अशा बर्‍याच शक्ती आहेत. तेव्हा, अशा ‘ब्रेकिंग इंडिया’वाल्या देशविरोधी तत्वांचा कशाप्रकारे बंदोबस्त करता येऊ शकतो?


विदेशातून मदत घेऊन देशात असंतोष माजवणार्‍यांविरोधात ‘नॅशनल सिक्युरीटी’ प्रभावी काम करते. अगदी पूर्वीपासूनच. सामाजिक स्तरावर याबाबत जागृती करायला हवी. राष्ट्रीय एकता फक्त रा. स्व. संघाचा विषय नाही, तर सगळ्यांचा विषय आहे. लोक विरोध करतातही. भारताचे तुकडे व्हावे, असे चिंतणारे या जन्मात काय, पुढच्या दहा जन्मांत तसे करण्यात अजिबात यशस्वी होणार नाहीत. कारण, त्यांना अजून भारत समजलेलाच नाही. आपल्या देशात लोक आपसात भांडतात. पण, हे सगळे एका विशिष्ट स्तरापर्यंत. ते हे विषय घेऊन ‘ब्रेकिंग पाँईट’वर येत नाहीत. काश्मीर ते केरळ भारतीय माणूस अखंड भारताचा विचार करतो. त्याची अखंड भारताचीकल्पना कशी असते? तर केरळच्या माणसालाकाशी मानसरोवरला जायचे असते, तर काश्मीरवाल्याला कन्याकुमारीला जायचे असते. मुंबईवाल्यांना आसाम कामाक्षी देवीला जायचे असते. देश घट्ट बांधून ठेवणारे हे विषय आहेत. त्याला हे ‘ब्रेकिंगवाले’ काय करणार? काय पर्याय देणार? जेव्हा गोष्ट देशाची येते, त्यावेळी समाज एक होतो. त्यामुळे भारत हा नुसता अखंड नाही, तर विश्वगुरू म्हणून जगभरात कार्य करणार आहे. हिंदू समाज जगाला मार्ग दाखवणार आहे, यात शंका नाही...

संविधानासंदर्भात तुम्ही विपुल लेखन केले. तुमचे ‘आपले संविधान’ हे पुस्तकदेखील अल्पावधीत लोकपसंतीस उतरले. तेव्हा, त्याविषयी काय सांगाल?

संघ घटना बदलणार आहे, संविधान बदलणार आहे, अशी बोंबाबोंब तथाकथित पुरोगाम्यांनी सुरू केली. पण, मी तर बाल स्वयंसेवक. गेले कित्येक दशके संघ बैठका, कार्यक्रमाला जात असतो. पण, तिथे कधीही संविधानाविरोधात कोणीही काहीही बोललेले मी कधीही ऐकले नाही की पाहिले नाही. शाखेमध्ये तर विविध मार्गाने व्यक्तिमत्व विकास होत होता. पण, त्यामध्येही मला कधीही कुणी शिक्षकाने किंवा स्वयंसेवकाने किंवा संघ कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी किंवा लोकांनी कुणीही संघविरोधी एक शब्द उच्चाारल्याचे आठवत नाही. माझ्यासारख्या संघ स्वयंसेवकाला हा खोटारडेपणा कसा सहन होणार? त्यामुळे संविधान, ध्येयवाद, मूलतत्व या सर्वांचा अभ्यास करावा, असे मला २०१२ पासून वाटायला लागले आणि मी त्यादृष्टीने अभ्यास करू लागलो. अभ्यास करणे हे स्वांतसुखाय नाही किंवा वैयक्तिक आकांक्षा नसते, तर आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संविधान समाजावे अशा परिभाषेत मांडावे असे मला वाटले. ‘आपले संविधान’ या पुस्तकाची मोठ्या संख्येने विक्री झाली असली तरी आजही त्याची मागणी वाढत आहे. संविधानावरची पुस्तकं कार्यकर्ता समाजप्रिय झाली. पुस्तकावर कार्यक्रम झाले. संविधान अभ्यास मंडळं झाली. संविधानावर अभ्यासपूर्ण मांडणी करणारे कार्यकतेर्र् तयार झाले. पुढच्या तीन-चार वर्षांत तर संविधानावर बोलणारी तज्ज्ञ मंडळी म्हणजे संघ स्वयंसेवकच असतील, अशी परिस्थिती निर्माण होईल.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.