‘कुशल कारागीर’ हे आत्मनिर्भर भारताच्या भावनेचे प्रतीक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

11 Mar 2023 17:50:39
modi
 

नवी दिल्ली
: स्थानिक हस्तकलांवर आधारीत वस्तूंच्या उत्पादनात छोटे कारागीर महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, अशा कुशल मनुष्यबळाकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, असे कुशल कारागिर हे आत्मनिर्भर भारताच्या भावनेचे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान’ या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करताना ते बोलत होते.
 
स्थानिक हस्तकलांवर आधारीत वस्तूंच्या उत्पादनात छोटे कारागीर महत्त्वाची भूमिका बजावतात. प्राचीन भारतातून होत असलेल्या निर्यातीत कुशल कारागीर आपापल्या पद्धतीने आणि आपापल्या क्षमतेनुसार भर घालत होते. या कुशल मनुष्यबळाकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष झाले, अनेक वर्षांच्या गुलामगिरीच्या कालखंडात त्यांचे काम कमी महत्त्वाचे मानले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा केंद्र सरकारनं या कुशल कारागिरांच्या मनुष्यबळाला पाठबळ पुरवण्यासाठी काहीही केले नाही आणि त्यामुळे अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी आपल्या कितीतरी पारंपरीक कला-कौशल्य आणि कारागिरी बाजुला ठेवून इतर मार्ग पत्करावे लागले. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने त्यांच्यासाठी ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान’ योजना लागू करून आत्मनिर्भर स्वावलंबी भारताच्या तत्वाच्या खऱ्या प्रतीकास सन्मान प्राप्त करून दिला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आजचा विश्वकर्मा उद्याचा उद्योजक बनावा हे केंद्र सरकारचे ध्येय आहे, असे पंतप्रधानांनी संगितले. ते पुढे म्हणाले, सरकारचे लक्ष केवळ स्थानिक बाजारपेठेकडे नसून जागतिक बाजारपेठेकडेही आहे. देशातल्या दुर्गम भागातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यापैकी अनेकांना प्रथमच शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे. बहुतेक कारागीर दलित, आदिवासी, वंचित समाजातील आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना लाभ देण्यासाठी व्यावहारिक धोरणाची आवश्यकता असेल, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.

Powered By Sangraha 9.0