मंदिरं पाहायला आवडतात, पण ती जाणून घेणंही तितकचं महत्त्वाचं! : अमोघ वैद्य

11 Mar 2023 20:41:52
Indologist Amogh Vaidya

 
भारतातील प्राचीन मंदिरे ही अनेकांच्या कुतूहलाचा विषय. पण, ही मंदिरे नेमकी कशी पाहावी, याची माहिती नसल्याने अनेकदा फक्त नमस्कार करून आपण बाहेर पडतो. पण, ही मंदिरे म्हणजे आपल्या समृद्ध संस्कृतीचा ठेवा. ही मंदिरे आपल्याला इतिहास सांगतात. ही मंदिरे कित्येक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आणि हीच मंदिरे त्या त्या काळातील संस्कृतीचे जीवंत प्रतीक. त्यामुळे या मंदिरांकडे पाहण्याची एक अभ्यासपूर्ण दृष्टी विकसित करणेही तितकेच महत्त्वाचे. म्हणूनच ही मंदिरं नेमकी कशी पाहावी, अशा एका आगळ्यावेगळ्या विषयावर लेखक व अभ्यासक शंतनू परांजपे आणि इतिहास व संस्कृती अभ्यासक तसेच इंडोलॉजिस्ट असलेले अमोघ वैद्य हे दोन तरुण कार्यशाळा आयोजित करतात. त्यानिमित्त अमोघ वैद्य यांच्याशी चर्चा करुन खरंच मंदिर कसे पाहावे, हे समजून घेण्याचा केलेला हा प्रयत्न...


मंदिराच्या बांधकामात वेगवेगळ्या कलाकुसरी पाहायला मिळतात. अशा एकूण किती शैली आहेत? तसेच, मंदिरांवर विशिष्ट ठिकाणी विशिष्ट प्रतिकृती कोरलेल्या असतात. उदा. प्रवेशद्वाराजवळ पाण्याने ओसंडून वाहणारा घडा घेतलेल्या स्त्रिया किंवा आत गर्भगृहाबाहेर इतर स्त्रिया.. यामागे काही विशिष्ट अर्थ आहेत का?

 
शैली तसे पाहिल्या तर मुख्य तीन. द्राविड, नागर आणि वेसर. भूमिज शैली म्हणजे हेमाडपंथी. ही शैली द्राविड आणि नागर शैलीतील मंदिरांचं मिश्रण. महाराष्ट्रात ही मंदिरं मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. सर्वांत प्राचीन हिंदू मंदिर आपल्याला सापडतं ते विदेशातील वासुदेवाचं. या मंदिरासमोर गरुडध्वज बांधलेला होता. हे मंदिर इसवी सन पूर्व पहिल्या शतकात बांधलं गेलं होतं. तू ज्या स्त्रियांचं म्हणतेस, त्या दोन प्रकारच्या असतात. द्वारशाखेवर म्हणजेच प्रवेशद्वाराजवळ असणार्‍या- ज्या हातात घडा घेऊन असतात त्या गंगा आणि यमुना. या दोन नद्या आहेत. मंदिरं नेहमी संगमावर पाहायला मिळतात. माणसांचे विश्रामाचे स्थान तिथे पूजा होई आणि तिथेच मंदिरे उभारली जात. आपण म्हणतो ना, देवाला जाताना पाय धुवून, शुचिर्भूत होऊन जावे. म्हणून या नद्या आणि या नद्या आहेत हे स्पष्टपणे ओळखू यावे, याचीही पुरेपूर काळजी घेतलेली असते. त्यांनी आपलं वस्त्र थोडं वर ओढून घेतलेलं आणि भिजलेलं असतं.


ज्यामुळे ते शरीराला पूर्णपणे चिकटून असतं. त्यांच्या गुडघ्यांच्या वाट्याही स्पष्ट दिसतात. पाण्याचे काही थेंबही त्यांच्या चेहर्‍यावर उडालेले दिसतात. आता दुसर्‍या आतल्या स्त्रिया म्हणजे सुरसुंदरी. त्या अंतराळात असतात. अत्यंत आखीव-रेखीव सौष्ठव असलेल्या या सुंदरी मंदिरात जाताना काय करावे व करू नये, ते सांगतात. अशा एकूण ३२ सुंदरी आहेत. दर्पणा, जी आरशात पाहत असते, आपल्या रूपाचा गर्व करत आत जाऊ नये, हे ती सांगते. आपल्याकडच्या सर्व मूर्ती क्रियाशील आहेत. कोणतीच मूर्ती अशी हातावर हात ठेवून पोझ देऊन उभी नाही. डालमालिका असते - ती काहीतरी फांदीवरून तोडत असते, मंदिरात जाताना फुले, फळे, पाने अगदीच काही नाही, तर अभिषेकाला पाणी किंवा यज्ञाला समिधा घेऊन जाव्यात. रिक्तहस्ते मंदिरात किंवा देवाच्या घरी जाऊ नये. शुभगामिनी पायात मोडलेला काटा काढत असते. मंदिरापर्यंत येतानाचा मार्ग अत्यंत काट्याकुट्यानी भरलेला आहे, त्यावेळी असे अनेक सल आपल्याला खुपत असतात, पण देवभेटीला येताना ते अलगद बाहेर काढून ठेवावे. आलासिका किंवा आलसा थोडी जाड असते आणि ती फक्त आळस झटकत असते.


मंदिरात जाताना प्रसन्न मनाने जावे हे आपल्याला तिच्याकडे पाहिल्यावर समजते. माकड घेतलेली एक स्त्री असते. माकड चंचल असतं. माकडाला आपल्या मनाची उपमा दिलेली आपल्याला अनेकदा आढळते. त्या माकडाला आपल्या कह्यात ठेवायचा प्रयत्न ती करते. एक सुंदरी पोपटाला घेऊन असते. अगदी आंजारून-गोंजारून खेळवते. पोपट म्हणजे कामदेवाचे प्रतीक. कामवासना दूर ठेवून मंदिरात या असे ती सांगते. तिला ‘शुकसारिका’ म्हणतात. वाद्ये वाजवणार्‍या आणि नृत्ये करणार्‍या स्त्रिया असतात. देवासमोर नेहमी कला सादर करायचा प्रघात आहे. त्यातूनच भजने, कीर्तने, वंदन नृत्ये आली. म्हणून याला ‘रंगमंडप’ असेही म्हणतात. कधी अष्टदिग्पाल असतात. आठ दिशांचे राखणकर्ते. नवग्रह असतात. नायिका असतात. नायिका तर अजून छान संकल्पना आहे. त्या आपल्या प्रियकराची वाट पाहत मंदिरात थांबलेल्या असतात. यक्ष किन्नर असतात. किती किती सांगू इतकी विविधता यातून पाहायला मिळते.

बहुतांशवेळा मंदिरातील गर्भगृहात जो देव आहे, त्याव्यतिरिक्त इतर देव बाहेरील बाजूस भिंती किंवा खांबांमध्ये कोरलेले आढळतात. उदा. खिरेश्वरच्या नागेश्वर मंदिरात गर्भगृहात शंकराची पिंडी आहे. पण, प्रवेशद्वारावर शेषशायी विष्णू आहे. शाक्त आणि वैष्णव पंथीयांत एवढे वाद असताना दोन देवांचे मंदिर एक कसे?


अगदी बरोबर. आपली संस्कृती नेहमीच सर्वसमावेशक राहिली आहे. इतर संस्कृतीतील, इतर पंथांतील जे जे उत्तम, ते ते तिने आपलंसं केलं. तुझं उत्तर देतो, पण त्या आधी मला सांग तुला सूर्यदेव माहितीये? त्याच्या पायात नेहमी गुडघ्यापर्यंत गमबूट घातलेले असतात. आता सूर्याचे उपासक जगात अनेक ठिकाणी आहेत. ग्रीक लोक जेव्हा भारतात आले तेव्हा ते गमबूट घालून फिरत. त्यामुळे त्यांचा देवही तसाच, त्यांच्या संस्कृतीचा परिणाम त्याच्या मूर्तीवर झालेला. आपण ती मूर्ती जशास तशी स्वीकारली आणि मग त्याबाबत आख्यायिका आल्या. अशा तीन ज्ञात कथा आहेत. त्याही आम्ही सांगतो. आता तुझ्या प्रश्नाकडे येतो. आज जशी ज्ञातीव्यवस्था आहे, तशीच किंबहुना तेवढीच कडवी याकाळी पंथ व्यवस्था होती. शाक्त आणि वैष्णव पंथ आजही पाळले जातात, पण गाणपत्य पंथ होता. गणपतीला पुजणारे वेगळे होते, कार्तिकेय होता. यांची मंदिरे वेगवेगळी असत. मधल्या काळात आक्रमणं झाली, मूर्ती फोडल्या गेल्या किंवा काही मूर्ती जवळच्या जलस्थानात लपवल्या गेल्या.


पुढे रिकामी मंदिरं पाहून एखाद्याने आपला देव त्या मंदिरात स्थापन केला. त्यानंतर काही काळाने जवळ सापडलेली मूर्ती या मंदिरातली ओळखून तिचीही स्थापना झाली. या पंथांतले आंतरिक विवाद जेव्हा पराकोटीला पोहोचले, तेव्हा पंचायतनाची संकल्पना आली. म्हणजे मध्ये एक देऊळ गणपतीचं, त्याच्या चार बाजूला इतर देवांची चार मंदिरं, आत विष्णूचं, तसेच इतर देव बाजूच्या चार मंदिरात असत. आजही आपण पाहतो, तर काही मंदिरात तीन विविध मूर्ती गर्भगृहात आढळून येतात. हे सर्व पंथ एकत्र करण्याचा हा प्रयत्न. तुला हरिहर माहिती असेल. हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर. विष्णू आणि शंकरालाही एकत्र करून त्या मूर्तीची स्थापना केली, संस्कृतीतली ही इतकी विविधता हिंदूंनी आपलीशी केली.


ही सगळी माहिती आपण ‘मंदिर कसे पाहावे’ या विषयावरील अभ्यासवर्गांतूनही जाणकारांना उपलब्ध करुन देता. तेव्हा, त्यामध्ये अशा या अभ्यासवर्गांत, कार्यशाळांमध्ये नेमके काय आणि कसे मार्गदर्शन केले जाते?


मंदिर म्हणजे काय? मंदिराची संकल्पना आपल्याकडे कशी आली? मंदिराचे भाग किंवा आपण त्याला अवयव म्हणू. कारण, मंदिराची रचना पुरुषासारखी असते. मंदिराचे प्रकार, वेगवेगळ्या काळातील पूजा प्रकार, शिखर, शैली, कीर्तिमुख म्हणजे काय, जे आपल्या पायाशी असतं, आपण म्हणतो ना ओलांडून जावं, त्यावर खरेतर पाय ठेवायचा असतो. त्यामागे काही कथा आहेत. या आख्यायिका जरी असल्या तरी मानवी स्वभावाचं उत्तम विश्लेषण करतात. अनादीकाळापासूनची माणसे आणि त्यांची कर्म आपल्यासारखीच कशी होती, याची सांगड घालणार्‍या या कथा आहेत. त्या आम्ही सांगतो. अध्यात्म आणि देवता यांचा संदर्भ कसा आहे, ते सांगतो. अर्वाचीन मंदिर, गोपूर कसं असतं, मंदिरांचं प्रयोजन काय. थोडक्यात जेव्हा तुम्ही मंदिरं पाहायला जाता, तेव्हा फक्त त्याची कलाकुसर, कोरीव काम पाहून फक्त भारावून न जाता आणि सेल्फी-फोटो काढून परत न येता, चार लोकांना माहिती देऊ शकाल, इतकं ज्ञान आम्ही देतो.

आपण सांगितले तसे मंदिरांमध्ये बरेचदा मंदिर पाहण्यापेक्षा हल्ली त्याचे छायाचित्रण करणे, सेल्फी काढण्यातच पर्यटक धन्यता मानताना दिसतात. तेव्हा, मंदिरांना भेट देणार्‍या भाविकांना/पर्यटकांना तुम्ही यानिमित्ताने काय सांगू इच्छिता?


आपल्याला मंदिरं पाहायला आवडतात, पण ती जाणून घेणं जास्त महत्त्वाचं. कारण, हे एक प्रकारचे संस्कृतीदर्शक स्थान आहे. काही मंदिरांवर लग्नप्रसंग, तर काहींवर कुस्ती कोरलेली दिसते. एका मंदिरात तर चक्क प्लासीची पूर्ण लढाई कोरलेली दिसते. कॉमिक बुक्स प्रसिद्ध आहेत. पण, मी म्हणतो, त्यांची सुरुवात मंदिरातल्या कोरीव आकृत्यांपासून झाली. आपण आपल्या इतिहासातील संस्कृतीचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत भविष्यातील संस्कृतीप्रवाह आपल्याला कितपत समजतील? आपण कोण होतो, कुठून आलो, केव्हा आलो हे सर्व आपल्याला मंदिरातून समजतं. कारण, टिकलेला तोच मोठा ठेवा आपल्याकडे आहे. आज मी नालंदा विद्यापीठाचा अभ्यास करतो तेव्हा ठामपणे सांगतो, तिथलं ज्ञान नष्ट झालं नाही, तर अजूनही प्रवाहाबरोबर वाहत आपल्यासोबत आहे.


(अधिक मााहितीसाठी संपर्क- अमोघ वैद्य - ७९७२०५०७६५)


 
Powered By Sangraha 9.0