सर्व भ्रष्टाचारी तुरुंगात जाणारच : भाजप प्रवक्ते गौरव भाटिया

    11-Mar-2023
Total Views |
Gaurav Bhatia


नवी दिल्ली
: देशातील जे प्रादेशिक पक्ष भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत, त्यांच्यावर तपास यंत्रणा कारवाई करणारच. जे जे लोक भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत, ते ते सर्व तुरुंगात जातील; अशा शब्दात भाजपने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईविषयी विरोधी पक्षांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

ईडी कारवाई सुडाच्या भावनेतून केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर केला आहे. त्यास भाजपने राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकाळात घोटाळ्यांची मालिकाच सुरू होती. टूजी स्पेक्ट्रम घोटाळा, राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा घोटाळ्यासह अनेक घोटाळे काँग्रेसच्या कार्यकाळात झाले होते. मात्र, आता जनता जागरूक झाली असून भ्रष्टाचाऱ्यांना कठोर शासन व्हावे, अशी सर्वसामान्य जनतेची ईच्छा आहे. भ्रष्टाचारात गुंतलेल्या प्रादेशिक पक्षांविरोधात तपास यंत्रणांची कारवाई सुरू आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांकडून सध्या व्हिक्टिम कार्ड खेळले जात आहे. मात्र, जे जे लोक भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत, ते सर्व तुरुंगात जाणारच असा टोला भाटिया यांनी लगाविला आहे.

मनीष सिसोदिया यांची कोठडीत चौकशी आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटल्याचे भाटिया यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, मनीष सिसोदिया यांचा लज्जास्पद कारवाया पुढे नेण्यात हातखंडा आहे आणि ते भ्रष्टाचाराच्या 'ड्रिंक्स'मध्ये बाडलेले आहेत. भ्रष्टाचारी पकडले जातात तेव्हा ते त्या विषयावर कधीच बोलत नाहीत. त्यावेळी ते केवळ सहानुभूती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, असेही भाटिया यांनी नमूद केले.


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.