आशा बगे यांच्या साहित्याला आध्यात्मिक अधिष्ठान : एलकुंचवार

‘जनस्थान’ पुरस्कार आशा बगे यांना प्रदान

    11-Mar-2023
Total Views |
'Janasthan' award presented to Asha Bagge

नाशिक : “आशाताईंचे साहित्य निर्मळ गंगेइतकी पवित्र आहे. त्यांच्या जगण्याला जसे आध्यात्मिक अधिष्ठान आहे, तसेच त्यांच्या लिखाणातही संत वाङ्मयाचे, अध्यात्माचे भक्कम अधिष्ठान आहे. आशाताईंनी लिहिलेले साहित्य केवळ विरंगुळा म्हणून नव्हे, तर अत्यंत जबाबदारीने वाचण्याचे साहित्य आहे. वाचकांनी त्यासाठी आधी स्वत:च्या मनाची तयारी करून वाचल्यास त्याचा अर्थगर्भ समजतो. त्यासाठी भारतीय तत्वज्ञान, अध्यात्म याची तोंडओळख वाचकाला असावी लागते, तेव्हाच आशाताईंचे साहित्य सुंदर जीवनानुभूती देते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी केले.

‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘जनस्थान’ पुरस्कार शुक्रवारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते आशा बगे यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये सन्मानचिन्ह आणि सन्मापत्र असे पुरस्कारचे स्वरुप होते. महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या शानदार सोहळ्यात व्यासपीठावर ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चे कार्यवाह मकरंद हिंगणे, विश्वस्त प्रकाश होळकर, कोषाध्यक्ष अ‍ॅड. अजय निकम उपस्थित होते.

नरेंद्र चपळगावकर म्हणाले, ”पारितोषिक गुणवत्तेने मिळते, यावर माझा विश्वास नाही. परंतु, प्रतिष्ठानने पुरस्कारासाठी गुणवत्तेवर पुरस्कार दिला. आशाताईंची निवड करून पुरस्कार देण्याचे भाग्य मला लाभले, याचा आनंद आहे.”मकरंद हिंगणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्वानंद बेदरकर यांनी मानपत्राचे वाचन तसेच सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील मान्यवरांसह नाशिककर साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुसुमाग्रजांमुळेच साहित्यातील सुक्ष्मभाव समजले

 
“मी कुसुमाग्रज यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराचा कृतज्ञपणे स्वीकार करते. प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मला येथून प्रेम आणि आगत्य मिळाले. नाशिकचे साहित्यप्रेमी कलावंत, एका साहित्यिकाचा विलक्षण आदर करतात. नाशिकशी माझे जुने ऋणानुबंध आहे. कुसुमाग्रज यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार खूप मोठा आहे. कुसुमाग्रजांमुळेच मला साहित्यामधील सूक्ष्मतम जाणीव समजली. आज अत्यंत धन्य वाटत आहे. हा अंत्यतिक आनंदाच क्षण आहे,“ अशी भावना सत्काराला उत्तर देताना आशा बगे यांनी व्यक्त केली.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.