संकटमोचक भारत!

10 Mar 2023 21:08:26
world-India-helped-the-most-in-difficult-times-Sri-Lankan-Foreign-Minister-Ali-Sabre

श्रीलंका गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. श्रीलंकेत अन्नधान्य, इंधनाची भीषण टंचाई टळलेली नाहीच. आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेच्या या कठीण काळात भारत ‘संकटमोचक’ म्हणून वेळोवेळी धावून गेला. संकटकाळात भारताने श्रीलंकेची वारंवार मदत केली असून, आपला देश हा सदैव भारताचा कृतज्ञ राहील, असे श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साब्रे यांनी नुकतेच म्हटले. यानिमित्ताने त्यांच्या या विधानाचा अर्थ जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.

हजारो वर्षांपासूनच्या भारत-श्रीलंका सांस्कृतिक-राजनैयिक संबंधांत गेल्या काही वर्षांमध्ये काहीशी कटुता निर्माण झाली होती. श्रीलंकेचा चीनकडे वाढलेला कल, हंबनटोटा बंदर चीनला भाड्याने देणे, चीनची हेरगिरी करणारी नौका ‘युवान वाँग ५’ ला श्रीलंकेच्या बंदरांवर प्रवेश देणे यांसह मोठ्या संख्येने श्रीलंकेत पायाभूत सुविधांच्या नावाखाली चीनने दिलेले कर्ज, अशा सर्व कारणांमुळे भारत-श्रीलंकेत गेल्या काही वर्षांमध्ये संबंध बिघडले होते. मात्र, या कच्च्या चिनी मैत्रीच्या धाग्याने श्रीलंकेला दिवाळखोरीत नेऊन अन् याचा फटका भारताला बसणेही म्हणा साहजिकच होते. तामिळनाडूमध्ये श्रीलंकेतील आश्रयवादी लोकांची संख्या वाढू लागली होती. श्रीलंकेवर चीनच्या प्रभुत्वाने भारताच्या प्रवेशद्वारावरच चिनी संकट उभे ठाकले असते.

मात्र, यावेळी श्रीलंकेवर आलेले आर्थिक संकट याआधीच्या तुलनेत खूप मोठे असून, तेथे गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी ‘संकटमोचक’ म्हणून धावून आलेल्या भारतातील रायसीना संवादात अली साब्रे यांनी श्रीलंका-भारताचे संबंधांचे ‘ऐतिहासिक’ म्हणून वर्णन केले. केवळ भारत सरकारने श्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर काढताना मदतच केली नाही, तर इथले सामान्य लोकही आमच्याबरोबर उभे राहिले. ‘भारत आमचा खरा मित्र आहे. भारताने आमच्यासाठी जे काही केले त्यासाठी श्रीलंका नेहमीच कृतज्ञ असेल. जेव्हा आम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकलो आणि देश दिवाळखोर झाला, तेव्हा भारताने प्रथम मदत पाठविली. इतर कोणताही देश हे करू शकला नाही. भारताने आम्हाला ‘आयएमएफ’कडून कर्जदेखील मिळवून दिले, जेणेकरून आमची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यास मदत झाली आहे. कठीण परिस्थितीत मदत करतो, तोच खरा मित्र असतो, हे भारताने केले आहे,” असेही साब्रे यांनी आवर्जून सांगितले.

देशाची अर्थव्यवस्था फक्त पर्यटनावर अवलंबून असलेल्या श्रीलंकेला ‘वर्ल्ड बँक’, ‘एशियन डेव्हलपमेंट बँके’सारख्या संस्थांचे पैसे देणे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतूनही या देशाने कर्ज उचलले आहे. श्रीलंकेच्या निर्यातीतील उत्पन्न १२ अब्ज डॉलर्स आहे, तर आयातीचा खर्च २२ अब्ज डॉलर्स आहे. म्हणजेच त्यांची व्यापारी तूट दहा अब्ज डॉलर्स आहे. श्रीलंकेतील आर्थिक व राजकीय अस्थिरतेमागे चीनच्या कर्जाचा सापळा हे एक महत्त्वाचे कारण असले तरी, चुकलेली शेतीची धोरणे, कोरोनाचा प्रादुर्भाव व पर्यटनाला बसलेल्या फटक्यापासून हंबनटोटासारख्या फसलेल्या प्रकल्पांपर्यंत सर्वांचे विश्लेषण होत असते. श्रीलंकेतील आर्थिक आणि राजकीय आघाड्यांवर होणार्‍या उलथापालथीमागे चीनच्या कर्जाचा मोठा डोंगर हेच मुख्य कारण असल्याचेही दिसून आले आहे. अशा या दिवाळखोरीत निघालेल्या श्रीलंकेला चिनी मायाजालातून बाहेर काढणे एक आव्हान होते. त्यात भारतानेही मोठे योगदान दिले.

श्रीलंकेची जी अवस्था झाली, तशीच अवस्था भारताजवळील इतर देशांची होऊ नये म्हणून भारताने श्रीलंकेला मदतीचा हात दिला. तसेच, कठीण काळात आपल्या मित्र देशांच्या मदतीला धावून भारताने जगासमोर आदर्श ठेवला आहे.भारताचे शेजारी असलेले देश चीनच्या कर्जाच्या विळख्यात अडकत आहेत. पाकिस्तानचे चीन प्रेम सर्वश्रृत असताना आता नेपाळनेदेखील अमाप प्रमाणात चिनी कर्ज उचलले आहे. तसेच, गेल्या आठवड्यात चीनचे लांझू शहर ते काठमांडू अशी मालगाडी सुरू झाली आहे. ही रेल्वे व्यापारासाठी जरी असली तरी त्यामागचीचिनी महत्त्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही. रेल्वे काठमांडूपर्यंत पोहोचल्याने भारतालाही सामरिक दृष्टीनेही मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी व्यापक दृष्टिकोनातून शेजारी देशांना चिनी कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणे हे म्हणूनच भारतासाठीही तितकेच महत्त्वाचे!





-अमित यादव



 
Powered By Sangraha 9.0