Love Jihad : हिंदूंच्या मनातील आग जनआक्रोश मोर्चातून बाहेर पडतेयं!

महाराष्ट्रात पुन्हा श्रद्धा वालकर सारखं प्रकरण होऊ देणार नाही हे सरकारचं कर्तव्य आहे : मंगल प्रभात लोढा

    10-Mar-2023
Total Views |

mangal prabhat lodha


मुंबई (Mangal Prabhat Lodha on Love Jihad) :
एका श्रद्धाला आपण मुकलो पण महाराष्ट्रात पुन्हा नव्याने श्रद्धा वालकर सारखी प्रकरण होऊ नयेत ही सरकारची जबाबदारी आहे. महाराष्ट्रभर लव्ह जिहादाची एकूण लाखभर प्रकरणे आहेत. इतक्या मोठ्या संख्येने लव्ह जिहाद प्रकरणातील पीडिता आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे समाज व्यथित आहे. याचेच पडसाद जनआक्रोश मोर्चातून निघत आहेत. ही हिंदूंच्या मनातील आग आणि खदखद बाहेर पडत आहे, असे मंगल प्रभात लोढा म्हणाले. आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.


लोढा म्हणाले, "आज आपण महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतो, पण लव्ह जिहाद (Love Jihad) तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात राज्यभर मोठे मोर्चे निघत आहेत. महाराष्ट्रात लव्ह जिहादची एकूण एक लाख प्रकरणे आहेत. समाज व्यथित आहे. इंटरफेथ मेरेज कमिटीबद्दल मी बोलू इच्छित नाही. आधी विरोधी पक्षांना प्रश्न विचारण्यापूर्वी जीआर वाचावा त्यात कुठल्याही धर्माचा उल्लेख केलेला नाही. तो वाचल्यावर तुम्ही बोलवाल तिथे मी यायला तयार आहे. जीआरमध्ये एकाही शब्दात असा उल्लेख नाही जो कुठल्याही प्रकारे वैयक्तीक आयुष्यात ढवळाढवळ करेन.", असे खडेबोलही त्यांनी विरोधकांना सुनावले.

 
या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड आणि अबु आझमी यांनी आक्षेप घेतला. मंगल प्रभात लोढांनी त्यांनाही सुनावले. "राज्यात पुन्हा श्रद्धा वालकर सारखे हत्याकांड घडू नये ही आपल्या सर्वांची आणि सरकारची जबाबदारी आहे. श्रद्धा वालकरचे ३६ तुकडे केले. तिला मारणारा कोणी होता, मरणारी कोणी होती म्हणून तो मुद्दा बनत नाही. लग्नानंतर ज्या मुलीचा आपल्या कुटुंबियांसोबत संपर्क तुटला आहे, तो पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न महिला बालविकास विभाग करणार आहे, अशी ग्वाही त्यानी दिली.

आंतर धर्मीय विवाह कुटूंब समन्वय समिती काय काम करते?

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे राज्यातील आंतरधर्मीय विवाह करणार्‍या मुलींचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या मुलींनी आपले कुटुंब आणि धर्माला सोडून इतर धर्मीय युवकांसोबत विवाह केल्यानंतर त्यांची कुठलीही माहिती युवतीच्या कुटुंबाकडे नसते. किंबहुना, त्या मुलींकडे समाजाकडून दुर्लक्ष केले जाते. अशाच मुलींची माहिती ठेवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी राज्याचे महिला बालकल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एका समितीची घोषणा केली होती. लोढांनी केलेल्या घोषणेनुसार आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणार्‍या मुलींसाठी शासकीय आणि अशासकीय व्यक्तींचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांचादेखील समावेश करण्यात आला आहे.

 
‘आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती’ नावाने या समितीची स्थापन झाली असून या संदर्भातील शासन निर्णय महिला व बाल विकास विभागामार्फत मंगळवार, दि. १३ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. दोनच दिवसांपूर्वी महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबद्दल घोषणा केली होती. त्याबाबतची अधिकृत घोषणा महिला बालकल्याण विभागातर्फे करण्यात आली आहे.

या समितीत सदस्य म्हणून विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा प्रधान सचिव, महिला व बालकल्याण पुणेच्या आयुक्त, महिला व बालकल्याणच्या सहसचिव, महिला व बालकल्याण आयुक्तालय (पुणे) येथील उपायुक्त (महिला विकास) या शासकीय मंडळींसह दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी, अ‍ॅड. योगेश देशपांडे, संजीव जैन, सुजाता संतोष जोशी, अ‍ॅड. प्रकाश साळसिगिकर, यदु गौडिया, मीरा कडबे, शुभदा गिरीश कामत या अशासकीय मंडळींचा समावेश करण्यात आला आहे.
 
 
जानेवारीपर्यंत १५२ आंतरधर्मीय विवाहांची माहिती

जानेवारीपर्यंत राज्य सरकारच्या आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीला १५२ आंतरधर्मीय विवाहांची माहिती मिळाली होती. समितीच्या सदस्यांच्या माध्यमातून १५२ प्रकरणे समोर आली आहेत. "समितीचं नावं प्रसिद्ध झाल्यानंतर काही कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. बहुतांश प्रकरणांमधील सदस्यांनी सांगितलं की, त्यांचा त्यांच्या मुलांशी संवाद तुटला आहे. त्यांना संवाद पुन्हा प्रस्थापित करण्याची किंवा समुपदेशन घेण्याची आवश्यकता होती," असेही लोढा म्हणाले. 


(Love Jihad) 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.