आव्हाड-आझमी म्हणाले, "लव्ह जिहादसारखं काहीच नसतं!", भाजप नेत्यांनी धु-धु धुतलं!

सत्ताधारी आमदारांनी आझमी-आव्हाडांना लव्ह जिहादवरुन घेरले

    10-Mar-2023
Total Views |

love jihad

Love Jihad


मुंबई :
महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्यात लव्ह जिहादची (love jihad) एकूण लाखभर प्रकरणे आहेत, अशी माहिती दिली. याच माहितीवर मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मानखुर्दचे आमदार अबू असीम आझमी यांनी आक्षेप घेतला. लव्ह जिहाद (love jihad) अस्तित्वातच नाही, असे म्हणत आझमींनी मंत्र्यांनी माफी मागी मागावी, अशी मागणी केली. जितेंद्र आव्हाडांनीही यानंतर खरी माहिती द्यावी, अशी मागणी केली. यानंतर मंत्री गुलाबराव पाटील, भाजप आमदार आशिष शेलार, योगेश सागर यांनी दोघांचाही चांगलाच समाचार घेतला.


जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

"मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मांडलेला लव्ह जिहाद (love jihad) प्रकरणाचा आकडा हा चुकीचा आहे. लव्ह जिहादची एक लाख प्रकरणे नसून ती फक्त ३ हजार ६९३ प्रकरणे आहेत. आम्ही अशा प्रकरणांना इंटरफेथ मॅरेजेस म्हणतो. त्याला हे लोकं लव्ह जिहाद म्हणतात मात्र, आम्ही तसे मानत नाही. एका मंत्री महोदयांनी अशी चुकीची माहिती देऊन समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम करू नये, प्रकरण समजून घ्यावे.", असा मुद्दा जितेंद्र आव्हाडांनी मांडला.

आव्हाडांना सडेतोड उत्तर

यानंतर भाजप आमदार योगेश सागर बोलण्यास उभे राहिले. त्यांनी आव्हाडांसह अबू आझमींचाही समाचार घेतला. ते म्हणाले, "मंत्री महोदयांनी मांडलेल्या माहितीत कुठल्याही जाती धर्माचा उल्लेख नाही. एखादा विषय आला तर आपल्याला विशिष्ट समाजाचा काय पुळका निर्माण होतो? लव्ह जिहादची प्रकरणे सव्वा लाख असो वा तीन हजार असो आव्हाडांचा संबंध काय? कुणाची दलाली करतायतं, आव्हाड कुणाची वकीली करत आहेत? हे लव्ह जिहादचे (love jihad) वकील आहेत का?", असा जाब त्यांनी विचारला. सोबत राम सातपुतेंनीही या प्रकरणावर आवाज उठवला.

एक असो वा लाख असो! हिंदूंसाठी आमचा आवाज उठवणारच!

भाजप आमदार अॅड. आशिष शेलारांनीही जितेंद्र आव्हाडांना झापले. "जितेंद्र आव्हाडांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांचा अधिकार आहे. मला कुणाच्या भावनांवर शंका घ्यायच्या नाहीत. लव्ह जिहादवर चर्चा करायची आमची तयारी आहे. लाख असो किंवा एक मुलगी असो माझ्या हिंदू मुलीवर अत्याचार केले जात असतील तर त्यासाठी लढण्याची आमची तयारी आहे. लव्ह जिहादवर कायदा झालाच पाहिजे.", असा घणाघात शेलार यांनी यावेळी केला. लव्ह जिहादवर आपण चर्चा घेणार असाल तर त्याची तयारी आमची आहे. एक लाख, तीन हजार असो वा एका मुलीचा प्रश्न असेल तर आमची लढायची तयारी आहे.

लव्ह जिहादसारखी कुठली गोष्टच नाही!


त्यानंतर अबू आझमी यांनी चुकूीच्या माहितीबद्दलचा प्रश्न विचारत मंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. लव्ह जिहादसारखे कुठली गोष्टच अस्तित्वात नाही, असेही ते म्हणाले. त्यावर आशिष शेलारांनी जोरदार आक्षेप घेत आझमींना जाब विचारला. अबू आझमी कशासाठी माफी मागायची, एका महिलेचे संरक्षणासाठी कायदा आणला समिती नेमली म्हणून माफी मागायची का?, असा जाब आझमींना विचारला.



आव्हाड तुम्ही काय बोलता! ज्याची मुलगी जाते ना त्या बापाला जाऊन विचारा!


"जितेंद्र आव्हाडांना लव्ह जिहाद काय हे माहिती नाही. माझ्या स्वतःच्या गावात दोन लव्ह जिहादची प्रकरणं आहे. तुम्ही मुंब्र्याचे आमदार आहात म्हणून बोलू नका, त्यांची मते पाहिजे म्हणून बोलू नका, ज्याची मुलगी जाते ना तिच्या बापाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. मतांच्या लांगूलचालनासाठी तुम्ही बोलत असाल तर निषेध आहे तुमचा, असे म्हणत गुलाबराव पाटलांनीही आव्हाडांना झापले.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.