वैज्ञानिक कोण? मुसलमान, ख्रिश्चन की हिंदू?

Total Views |
Andre Vesalius
 
पश्चिमी जगाची आज जी वैज्ञानिक-तांत्रिक प्रगती आपल्याला दिसते आहे आणि त्या भौतिक प्रगतीतून निर्माण झालेल्या समृद्धीमुळे आपण दिपून गेलो आहोत, ती एका रात्रीत झालेली नसून गेली किमान ५००-७०० वर्षं हळूहळू होत गेलेलीआहे आणि प्रत्येक गोष्टीला ‘का?’ असा प्रश्न करा असं आम्हाला पाश्चिमात्यांनी कशाला सांगायला हवं? उपनिषदांमधलं सर्वश्रेष्ठ मानवी तत्वज्ञान हे शिष्याने गुरूला केलेल्या प्रश्नांमधूनच तर निर्माण झालंय - ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा.’

मुंबईच्या एका फार ख्यातनाम मिशन स्कूलमध्ये एक जर्मन शिक्षक होते. मिशन स्कूलमधल्या संन्यास घेतलेल्या शिक्षकांना ‘टीचर’ न म्हणता ‘फादर’ असंच म्हटलं जातं. या जर्मन फादरचा असा खाक्या होता की, ते कधीही पाठ्यपुस्तकानुसार शिकवत नसत. अभ्यासक्रम काय आहे आणि आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांना आत्ता नेमकं काय शिकवायचं आहे, हे फादरना पुरेपूर माहीत होतं. ते सांगायचे, ’परीक्षेत काय येणार आहे, याचा विचार करून मी शिकवत नाही, तर मी जो विषय तुम्हाला सांगतो आहे, त्याच्यात तुम्हाला गोडी कशी निर्माण होईल, हे मी पाहतो. एकदा तुम्हाला या विषयाची गोडी लागली की बस. माझं काम झालं. पुढचा अभ्यास तुम्हाला आपोआपयेईल’ आणि खरंच तसं घडायचं. साहजिकच ते फादर शाळेतले फार विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. दुर्दैवाने १९३९ साली जर्मनी आणि ब्रिटन यांच्यात दुसरे महायुद्ध सुरू झालं. हे फादर जरी कॅथलिक होते, तरी जर्मन नागरिक होते. त्यामुळे त्यांना भारतातून मायदेशी परतावं लागलं. त्या फादरच्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी सांगतात, ’आम्हाला त्या विषयात मुळातच इतकं स्वारस्य निर्माण व्हायचं की आम्ही पाठ्यपुस्तकातला संबंधित धडा आणि त्यासंदर्भातलं अन्य मिळेल ने वाचूनच वर्गात जायचो आणि मग ती तासिका (पिरियड) म्हणजे अत्यंत सुंदर, माहितीने पुरेपूर भरलेल्या प्रश्नोत्तरांची तासिका ठरत असे.’

माझ्या स्वतःच्या इतिहास विषयाच्या शिक्षिका बर्‍याचशा या उदाहरणाच्या जवळ पोहोचणार्‍या होत्या. इतिहास या विषयात विद्यार्थ्यांना गोडी निर्माण होईल, अशाच धोरणाने त्यांचं शिकवणं होतं. अमेरिकन राज्यक्रांती आणि अमेरिकन राज्यघटनेच्या निर्मितीमधील लोकशाही मूल्यांची महानता याबद्दल त्या फार सुंदर विवेचन करायच्या. त्याचप्रमाणे फ्रेंच राज्यक्रांतीमधील ’स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ या मूलभूत मानवी मूल्यांबद्दलही त्या अतिशय तळमळीने बोलायच्या. मात्र, भारताचा इतिहास, भारतीय संस्कृती, तिच्या परंपरा, मूल्ये, श्रद्धा, निष्ठा यांबद्दल बोलताना त्यांचा स्वर एकदम बदलायचा. फार कठोर टीका नव्हे, पण जितकी म्हणून टिंगल करता येईल, तेवढी त्या करायच्या. अशा वेळी दोन महान शास्त्रज्ञांची नावं त्या हमखास घेत असत. पहिला आंद्रे व्हेसालिअस आणि दुसरा गॅलिलिओ गॅलिली. ’आपल्याकडे कोणत्याही क्षेत्रात ’सायंटिफिक मेथड’ हा प्रकारच नाही.’ बाई म्हणायच्या, ’‘अमुक गोष्ट अशी का? असा प्रश्न करायचा नाही. केलात तर तुमच्यावर बहिष्कार पडेल. तुम्हाला वाळीत टाकलं जाईल.” बाई पुढे सांगायच्या, असंच आधी युरोपातहीहोतं. पण, तिथे आंद्रे व्हेसालिअस निर्माण झाला. मानवी शरीराचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी त्याने चक्क स्मशानातून पुरलेली प्रेतं पळवून आणली.

गॅलिलिओने शास्त्रीय पद्धतीने सिद्ध केलं की, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे सत्य जाहीरपणे सांगितल्याबद्दल त्याच्यावर खटला भरण्यात आला. त्याला आयुष्यभर तुरुंगात राहण्याची शिक्षा फर्मावण्यात आली. पण, आज अशा शास्त्रज्ञांमुळेच पाश्चिमात्य देश विज्ञानात कुठल्या कुठे पोहोचलेत, नाहीतर आपण. बाई पुढे सांगायच्या, ’‘तेव्हा लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीला ’का?’ असा प्रश्न करा, कुणीतरी सांगितलं म्हणून डोळे मिटून तसं करू नका. ‘बाबा वाक्यम् प्रमाणम्’ या भारतीय मानसिकतेतून बाहेर पडा, तरच आपला देश प्रगती करू शकेल.”आता ’सायंटिफिक मेथड’ने विचार कसा करायचा? बाई पुढे सांगायच्या, ’तर समजा, तुम्ही सायकलवरून शाळेत येता. हल्लीप्रमाणे बापाची गाडी, फटफटी, स्कूटर वगैरे चैनी आमच्या काळात नव्हत्या. सायकल पण सोडा, बहुसंख्य पोरं पायीच शाळेत यायची, ’तर समजा तुमची सायकल चालत नाहीये. मग पहिली गोष्ट म्हणजे सायकल का चालत नाही, हे नीट निरीक्षण करा. तेवढ्यात कुणीतरी म्हटले की, तुझी सायकल जुनी झाल्यामुळे चालत नाहीये, तर त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका. ‘सायंटिफिक मेथड’ला पहिला मुद्दा प्रश्न करणं - माझी सायकल का चालू होत नाही?

दुसरा मुद्दा - स्वतः निरीक्षण करणं, परीक्षा करणं, तिसरा मुद्दा- टायरमधली हवा जाणं, चेन सरकणं किंवा कुलूपच काढलेलं नसणं, हीच संभाव्य कारणं असू शकतात. ती कारणं लक्षात घेऊन या अनुषंगाने निरीक्षण करणं, चौथा मुद्दा- यांपैकी जे कारण आढळेल, ती त्रुटी दूर करणं. म्हणजे कुलूप काढणं, चेन नीट बसवणं किंवा हवा भरणं आणि आता पाचवा मुद्दा - त्रुटी दूर केल्यावर सायकल प्रत्यक्ष चालवून पाहाणं. म्हणजे बघा, तुम्ही प्रश्नाचा सर्व बाजूंनी स्वतः विचार केलात, परीक्षा केलीत, कोण काय म्हणतो यावर विश्वास न ठेवता स्वतः समस्येवर तोडगा काढून ती दूर केलीत. ही झाली ‘सायंटिफिक मेथड.’ कोणत्याही क्षेत्रातल्या कोणत्याही समस्यांवर हाच फार्म्युला लावा, अशी स्थिती जेव्हा संपूर्ण समाजाची होईल, तेव्हा आपला देश पश्चिमी देशांप्रमाणे प्रगती करेल, नाहीतर बसा टाळ कुटत, ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान, असं म्हणत!’बाई पक्क्या समाजवादी होत्या. त्यामुळेच इतिहास शिकवताना पण त्या पाश्चात्यांच्या वैज्ञानिक प्रगतीच्या इतिहासात शिरायच्या आणि भारताची म्हणजे अर्थातच हिंदूंची टिंगल करायच्या. समाजवाद्यांचे हे शेलके ’गुण’ त्यावेळी माहीत नव्हते. नंतर कळले. असो. पण, बाईंनी मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करायलाच हवा.

आंद्रे व्हेसालिअस या डच शरीरशास्त्रज्ञाने मानवी शरीरावर मोठंच संशोधन केलं आणि वैज्ञानिक प्रगती केली, असं आज ५०० वर्षांनंतर आपण म्हणतो. तत्कालीन लोकांनी त्याची ‘हजाम-बार्बर फिजिशियन’ अशा शब्दांत कुचेष्टाच केली. ते एकवेळ सोडा. कारण, नवीन काही करू पाहणार्‍या प्रत्येक माणसाला अशाच टिंगलटवाळीला तोंड द्यावं लागतं, असा जगभरचाच अनुभव आहे. पण त्याने ख्रिश्चन धर्मविरोधी आचरण केल्याचा आरोप ठेवून ‘इन्क्विझिशन’ म्हणजे पोपची अत्यंत कुख्यात अशी धर्मसभा तिने त्याला मृत्यूदंड ठोठावला. पण, सम्राट पाचवा चार्ल्स हा व्हेसालिअसच्या संशोधनाचं महत्त्व जाणत होता. त्याने मृत्यूदंडाऐवजी त्याला जेरूसलेमच्या धार्मिक यात्रेला पाठवलं. म्हणजे एकप्रकारे हद्दपारच केलं. जीव वाचला एवढचं. पण, तिथून परतताना हा थोर शरीरशास्त्रज्ञ समुद्री वादळात सापडून मरण पावला. ते साल होतं इ.स. १५६४ आणि व्हेसालिअस तेव्हा फक्त ४९ वर्षांचा होता.

गॅलिलिओ गॅलिली याचीही अगदी तीच गत झाली. खरं तर पोप उबार्र्न तिसरा हा गॅलिलिओचा चांगला मित्र होता. पण, पृथ्वी चपटी नसून गोल आहे आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे वैज्ञानिक सत्य त्याने गणिताने, प्रत्यक्ष निरीक्षणाने सिद्ध केलं. हे बायबलमध्ये लिहिल्याच्या विरूद्ध झालं. म्हणजेच गॅलिलिओने धर्मविरोधी पाखंडी सैतानी मताचा प्रचार-प्रसार केला म्हणून सगळे पाद्री गॅलिलिओवर भयंकर संतापले. ‘इन्क्विझिशन’ धर्मसभेसमोर त्याच्यावर खटला भरण्यात आला. दस्तुरखुद्द पोपच त्याचा मित्र होता. त्यामुळे त्याचा मृत्यूदंड टळला. पण, त्याला बहिष्कृत ठरवण्यात आलं. या वेळचाच तो प्रसिद्ध किस्सा सगळी कथित विज्ञानानिष्ठ मंडळी अगदी चवीचवीने वर्णन करत असतात. तो किस्सा असा की, गॅलिलिओला फर्मावण्यात आलं, ‘या धर्मसभेसमोर मोठ्याने म्हण की पृथ्वी स्थिर आहे.’ गॅलिलिओने नाईलाजाने तसं म्हटलं आणि मग मागे वळून तो हळूच पुटपुटला ‘ए पर सि मोव्ह -पण ती फिरते.’

म्हणजे पश्चिमी जगाची आज जी वैज्ञानिक-तांत्रिक प्रगती आपल्याला दिसते आहे आणि त्या भौतिक प्रगतीतून निर्माण झालेल्या समृद्धीमुळे आपण दिपून गेलो आहोत, ती एका रात्रीत झालेली नसून गेली किमान ५००-७०० वर्षं हळूहळू होत गेलेलीआहे आणि प्रत्येक गोष्टीला ‘का?’ असा प्रश्न करा असं आम्हाला पाश्चिमात्यांनी कशाला सांगायला हवं? उपनिषदांमधलं सर्वश्रेष्ठ मानवी तत्वज्ञान हे शिष्याने गुरूला केलेल्या प्रश्नांमधूनच तर निर्माण झालंय - ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा.’ शिष्य नाना प्रकारचे विचारतोय आणि गुरू त्याला कळेल, समजेल, पचेल अशा तर्‍हेने उत्तर देत ज्ञानसंपन्न करतो आहे. संपूर्ण हिंदू तत्वज्ञानाचंसार असणारी भगवद्गीता म्हणजे तरी काय आहे? अर्जुन प्रश्न, शंका, कुशंका काढतोय आणि भगवंत उत्तर देतायत.पुराणांमधल्या कित्येक कथांची रचना अशी आहे की, विश्वातल्या कोणत्याही गूढ गोष्टीबद्दल साक्षात जगत्माता पार्वती भगवान शिवाला प्रश्न करते. मग शिव उत्तर देताना अशी सुरुवात करतात की, ‘हे पार्वती हे रहस्य त्या अमुक तमुक ऋषींना मी अमुक सहस्त्र वर्षांपर्वी सांगितलं होतं, ते आता तुला सांगतो आहे. लक्षपूर्वक ऐक.’

हे संगळ वाचून तुम्ही नक्कीच म्हणाल की, भारताचंतत्वज्ञान, हिंदू धर्म आणि विज्ञान हे एकमेकांमध्ये सहजपणे मिसळून गेलेलं आहे वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही एकवेळ मान्य करू देखील. पण, मग पाश्चिमात्य देश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बळावर समृद्धीच्या, वैभवाच्या शिखरावर आहेत नि ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा’ म्हणणारे आम्ही हिंदू भिका मागतोय, ते का, हे सांगा.अगदी याच आशयाचा प्रश्न एका पाश्चिमात्य श्रोत्याने स्वामी विवेकानंदांना विचारला होता - तुमचं तत्वज्ञान जर सर्वश्रेष्ठ आहे, तर तुमचा देश गुलाम का? त्यावर स्वामीजी उत्तरले होते, “आमचं तत्वज्ञानसर्वश्रेष्ठ आहेच. पण, ते प्रत्यक्ष जगायंच असतं, याचा विसर पडल्यामुळे आमच्या देशाची ही अवनती झालेलीआहे. समुद्र हा सर्वशक्तिमान असतो. पण त्यालाही भरती-ओहोटी असते. तशी सध्या आमची ओहोटी आहे.”पुन्हा भरती यावी यासाठी गेली ९८ वर्षं प्रयत्न सुरू आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.