प्रामाणिक शिल्पकाराच्यासृजनशील कलाकृती

10 Mar 2023 21:11:48
Sculpture by sculptor Vikrant Manjrekar


भारताच्या स्थापत्य, शिल्प, त्रिमितीय कला आणि हस्तकला कौशल्यांची बीजे भारतीय संस्कृतीच्या इतिहासात आहेत. ‘मानसार’ नावाच्या प्राचीन ग्रंथात ‘शिल्पलक्षण’ नावाचे एक प्रकरण आहे. त्यात शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण पदार्थांचा उपयोग करून मूर्त किंवा अमूर्त आकार संकल्पित केले जातात, अशी माहिती दिलेली आहे. शिवाय माती, मेण, पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांचा उपयोग करूनही त्रिमितीकृती बनवल्या जातात. या त्रिमितीत एकतर आकार देऊन किंवा आकार जोडून किंवा विशिष्ट भाग कोरून आकार शोधला/काढला जातो.
 
शिल्पकला ही संस्कृती अभ्यासण्यासाठी मैलाच्या दगडाप्रमाणे मार्गदर्शक असते. विविध शैली किंवा डौलात या त्रिमिकारांना पाहताना, सर्व बाजूंनी पाहण्याची सोय असते. मूर्ती मग ती वास्तववादी किंवा मूर्त स्वरुपातील असो की अमूर्त म्हणजे अवास्तववादी किंवा ’अ‍ॅब्स्ट्रॅक’ असो, या दोन्ही प्रकारच्या मूर्तींमध्ये ‘आसनपर्यक’, ‘अर्धपर्यक’, ‘आलीढ’, ‘प्रत्यालीढ’, ‘पद्म’, ‘वीर’ अशा शैली किंवा डौलातील प्रकार पाहायला मिळतात. अशा त्रिमिती आकाराला असलेल्या वाकास ‘भंग’ असे नाव आहे. म्हणजे ‘समभंग’, ‘त्रिभंग’, ‘अतिभंग’ अशा कमनीय स्वरुपात त्रिमिकार पाहणार्‍याला आनंद देते. म्हणूनच ललितकलेचा इतिहास पाहिला, तर दृश्यकला प्रकारातील ‘शिल्पकला’ या कला प्रकाराचे समाजात वेगळे महत्त्व आहे. संस्कृती, राजकारण, इतिहास, धर्म, निधी आणि स्मरणार्थ या विषयांमध्ये शिल्पकलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
 
संवादाचं प्रभावी माध्यम असणार्‍या शिल्पकला प्रकारांत प्राचीनतम इतिहास आहे. प्रदीर्घ पार्श्वभूमी आहे. अशाच पार्श्वभूमी लाभलेल्या घराण्यांचाही ‘शिल्पकार घराणे’ म्हणून एक दबदबा असतो. अशाच एका ‘खानदानीपण’ जपणार्‍या घराण्यातील एक कलावंत, ज्याच्या नावातच ‘विक्रांत’ आहे.नावाच्या आशयाप्रमाणेच ज्यांचा हात चालतो, हातांची बोटे आकार घडवतात, ते आकार आशयगर्भ असतात आणि तो आशय समाजाभिमुख असतो.ख्यातकीर्त शिल्पकार विक्रांत मांजरेकर यांच्या धातू आणि लाकडी कामासह दगडी त्रिमिताकृती पाहिल्यावर शिल्पकलेचा विकीपीडिया डोळ्यांसमोर उभा राहिला. अगदी सिंधू संस्कृतीपासून तर आधुनिक मूर्ती कलाप्रकारांपर्यंत सर्व स्थित्यंतरे चित्रपटाप्रमाणे डोळ्यांसमोरून गेली. कारणही तसंच आहे.

शिल्पकार मांजरेकर हे स्वतःशी प्रामाणिक असलेले शिल्पकार आहेत. त्यांंचंच मागील काम हेच त्यांचं वर्तमान कामाशी तुलना करणारं स्पर्धक असतं. खूपदा शिल्पकाराच्या मनातील विचार हे त्याच्या शिल्पकृतीत प्रतिबिंबित होत असतात. शिल्पकार विक्रांत यांच्या शिल्पकृतीत लौकिकार्थाने आत्मसंवाद दिसतो.त्यांचे ‘मार्बल कार्व्हिंग’ अत्यंत सफाईदार असते. त्यांचे ‘वूड कार्व्हिंग’ हे त्या ‘वूड’च्या नैसर्गिक पोताचा सन्मान करून झालेले असते. धातुकामातील त्रिमिताकृतीदेखील दृश्यकला विषय आणि धातूची घनता वा काठिण्यता यांचा समन्वय साधणारी असते. हे सर्व सृजनशील कार्य केवळ प्रयत्नशील कष्ट करणार्‍या आणि प्रयोगशील संस्कारात काढलेल्या दृश्यकलाकारासच शक्य होत असतं.या सर्व निकषांचे पात्र हकदार- शिल्पकार विक्रांत मांजरेकर यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन जहांगिर कलादालनात दि. १४ ते २० मार्च या सप्ताहात सुरू होत आहे.

शतकांहून अधिक काळाचं आयुष्य लाभलेला ‘मुंबई आर्ट सोसायटी’च्या सदस्यपदी पदाधिकारी म्हणून जबाबदारी पेलणारे विक्रांत हे तत्कालीन विश्वविख्यात असलेल्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून १९८९ साली शिल्पकला विभागातून प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. १९८५ ते २००९ या काळात त्यांनी त्यांच्या कलाकृतींसाठी विविध नावीन्यपूर्ण अवॉर्ड्स आणि पुरस्कार मिळविलेले आहेत. १९९७ पासून २०२३ पर्यंत त्यांची चेन्नई, मुंबई येथील गॅलरीज्मधून एकल प्रदर्शने झालेली आहेत.१९९४ पासून २०२३ पर्यंतच्या दीर्घकाळामध्ये त्यांनी समूह प्रदर्शनांद्वारेही कलाकृती पाठवून सहभाग घेतलेला आहे. अनेक प्रतिष्ठित नामवंतांच्या संग्रहामध्ये त्यांच्या कलाकृती वातावरणाची शोभा वाढवत आहेत.शिल्पकार विक्रांत मांजरेकर यांचा आणि माझा परिचय सुमारे एक तपाचा. त्यात समक्ष वा दूरध्वनीद्वारे बोलणे, चर्चा झालेल्या आठवणीही खूप आहेत. त्या प्रत्येकवेळी हा गृहस्थ महाराष्ट्रातील कला व सांस्कृतिकतेबद्दलच्या उपक्रमांविषयीच बोलताना आठवतो.

कथित राजकारणापासून आणि दृश्यकलेतील राजकारण्यांपासून चार हात लांबच राहणे पसंत केल्यामुळेच हा दृश्यकलाकार म्हणूनच आशयगर्भ कलाकृती साकारु शकतो. त्यांचा कलासृजनातील प्रामाणिकपणा हाच त्यांच्या त्रिमिताकाराचे वैशिष्ट्ये ठरावा.त्यांच्या कलाकृती या नैसर्गिक घटकांमधील विषय, सामाजिक निरीक्षणांद्वारे लाभलेले विषय घेऊन निर्माण झालेल्या जाणवतात. धातू असो, दगड असो की लाकूड असो, तो-तो घटक त्याचे स्वत:चे अस्तित्व अबाधित ठेवून विक्रांत यांच्या मनातील मूर्ताकारांना साद देतात. म्हणूनही त्यांच्या कलाकृती या स्मृतिप्रवण ठरतात. हॉटेल्स, हॉस्पिटल्स, विविध कार्यालये, कंपन्यांची ऑफिसेस, मीटिंग हॉल्समधील व्यवस्थापकांनी आणि संग्राहकांनी आवर्जून भेट देऊन कलाकृती पाहाव्यात. हे प्रदर्शन चुकवू नये असेच आहे. शिल्पकार विक्रांत यांना शुभेच्छा...!
 


-प्रा. डॉ. गजानन शेपाळ

 
Powered By Sangraha 9.0