तोंडात जोर...

10 Mar 2023 21:03:39
Political leader in Maharashtra

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधक खरोखरच सैरभैर झाले आहेत. आता सत्तेत असलेल्या सरकारला बदनाम करण्यासाठीच फक्त विरोधकांच्या तोंडात जोर असल्याचे चित्र दिसते. हे सरकार जे काही लोकहिताचे निर्णय घेत आहे, त्यावरून जनतेचे लक्ष विचलित करणे आणि विरोधक आहोत म्हणून केवळ बेछूट आरोप करीत सुटणे, असा एकमेव उद्योग या सगळ्या महाविकास आघाडीतील नेत्यांचा झालेला दिसतो. पण, जनता सुज्ञ आहे. कोणावर किती विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही, याचा निवाडा करण्यात ती तत्पर आहे. त्यामुळेच खरंतर आपल्या भारतीय लोकशाहीचे महत्त्व अधिक उजळ होत असते.मात्र, आजकाल जे देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात राजकारण केले जात आहे, विरोधक ज्या तर्‍हेने त्यांचा दर्जा घालवित आहेत, नीच पातळीवर जात आहेत, ते राजकीय नीतिमत्तेला अशोभनीय असेच. सार्वजनिक जीवनात शोभत नाहीत, अशी वक्तव्य करून ही विरोधक मंडळी महाराष्ट्रातील एकमेकांचा आदर करण्याच्या, टीकेच्या, आरोपांच्या मर्यादा पाळण्याच्या परंपरेचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे जनतादेखील या आसुरी विरोधावर संताप व्यक्त करीत आहे. राज्याच्या हितावर न बोलता रोज हे विरोधक उठसूठ फडणवीस-शिंदे यांना लक्ष्य करीत असतात. राज्यात काय समस्या, प्रश्न आहेत, ते सरकार दरबारी मांडून विरोधक या नात्याने सरकारला त्यावर उत्तर देण्यास भाग पाडण्यात हे विरोधक वारंवार अपयशी ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्या या अश्लाघ्य भाषेला आगामी काळात सुज्ञ जनता योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही यात संदेह नाही.सरकारकडून या लोकांना खरे तर चांगल्या कामांच्या कृतीतून उत्तर मिळत आहे. सरकार यंत्रणांचा गैरवापर करते, हुकूमशाही गाजविते, असे आरोप करून खरे तर हे विरोधक ‘आमच्याजवळ कोणतेच काम नाही, आम्ही निष्क्रिय आहोत’ हेच दाखवून देत आहेत. यंत्रणांचा वापर सरकार गैरमार्गाने करते, हे सिद्ध करण्यासाठी न्याय यंत्रणा आहे. मात्र, तेथे न जाता केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी विरोधकांना जोर येत असतो, हेच वास्तव कालच्या विरोधकांच्या अर्थसंकल्पावरील केविलवाण्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर अधोरेखित झाले.


बोलती बंद!


विरोधकांच्या टोमणेबाजी आणि निरर्थक, वायफळ बडबडीस फडणवीस-शिंदे सरकार तोडीस तोड तोंडाच्या वाफा गमावून नव्हे, तर कृतीने उत्तर देत असल्याचे दिसून येते. कालचा देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करून जे जनहिताचे निर्णय घेतले, त्यामुळे या विरोधकांची तोंडे बंद झालीत. अर्थमंत्र्यांकडून विधानसभेत घोषणा केल्या जात असताना, तर विरोधकांचे चेहरे बघण्यासारखे होते. त्यांना कळतच नव्हते की, आता यावर काय प्रतिक्रिया द्यावी. जनता तर नक्कीच खूश होणार, त्यांना लाभ मिळणार, हे सत्य या विरोधकांना पचविणे आता कायमच जड जाईल, हे मान्य करावे लागेल. ‘गाजराचा हलवा’, ‘निवडणुकीवर लक्ष ठेवून मांडलेला अर्थसंकल्प’ वगैरे... यातूनच हे विरोधक यात जनतेचे हित आहे हे मान्य करीत होते. त्यापैकी काही तर आताच्या सरकारने घेतलेले निर्णय आमचे असल्याचे सांगून आपले अपयश देखील कबूल करीत होते.अशा या नेमकी बोलती बंद झालेल्या विरोधकांच्या झोपा आता उडाल्या आहेत. त्यामुळे या राज्यातील जनतेला आणखी कसे घुमवित राहायचे, त्यांची कशी दिशाभूल करीत राहायचे, यासाठी विरोधकांची धडपड सुरू झाली आहे. मात्र, जनता आता आपले ऐकेल की नाही, ही चिंताच या लोकांना सतावत आहे. त्यामुळे काय बोलावे, हेच त्यांना सुचेनासे झाले आहे.सरकारने हाती घेतलेल्या विकासकामांनी जनतेला आपल्या बाजूने करावे तरी कसे, हा यक्षप्रश्न या विरोधकांसमोर उभा ठाकला आहे. सत्तेत असलेले लोक गैरव्यवहार करणार नाहीत, दुष्कृत्य करणार नाहीत, कुण्या व्यक्तीवर जाणूनबुजून साधू हत्याकांड किंवा करमुसेसारखा अत्याचार करणार नाहीत, यांचा कोणताही नेता अनिल देशमुख, नवाब मलिकप्रमाणे गजाआड करता येणार नाही, अधिकार्‍यांना हाताशी धरून कट कारस्थान करता येणार नाही, अशा आपल्या वाईट सवयी, कृत्यांची आठवण करीत या विरोधकांचे डोके सुन्न झाले आहे. एसटीतून मोफत प्रवास करणारा ज्येष्ठ नागरिक किंवा ५० टक्के सवलत मिळवून प्रवास करणारी भगिनी खरच आपले ऐकेल का? आपल्यावर विश्वास ठेवेल का? हे प्रश्नच आता विरोधकांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत!


-अतुल तांदळीकर



Powered By Sangraha 9.0