‘भारत-ऑस्ट्रेलियात क्रिकेटचा समान धागा’

10 Mar 2023 15:15:19

Anthony Albanese In India


नवी दिल्ली
: गुजरातमधील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषकाच्या चौथ्या कसोटी सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज गुरुवारी उपस्थित होते. यावेळी क्रिकेटची आवड हा भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातला समान धागा आहे, असे ट्विट पंतप्रधानांनी केले. पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचे आगमन झाल्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह आणि ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी त्यांचा सन्मान केला. गायिका फाल्गुई शाह यांच्या ‘युनिटी ऑफ सिम्फनी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचाही पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी आनंद घेतला.

पंतप्रधानांनी भारताचा कर्णधार रोहित शर्माला, तर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथला कसोटी सामन्याची टोपी दिली. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी खेळपट्टीवर गेले असताना उभय पंतप्रधान ‘फ्रेंडशिप हॉल ऑफ फेम’ पाहण्यासाठी गेले. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू, रवी शास्त्री यांनी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील समृद्ध क्रिकेट इतिहासाची माहिती दिली. त्यानंतर दोन्ही पंतप्रधानांनी अध्यक्षीय कक्षात बसून सामन्याचा आनंद घेतला.
 
भारत-ऑस्ट्रेलिया सहकार्य महत्त्वाचे : पंतप्रधान अल्बानीज


ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीदेखील भारत-ऑस्ट्रेलिया सहकार्य दोन्ही देशांसाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ते ट्विटमध्ये म्हणाले की, “क्रिकेटच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत जगातील सर्वोत्तम होण्यासाठी स्पर्धा करत आहेत. त्याचवेळी मैदानाबाहेर ऑस्ट्रेलिया आणि भारत चांगल्या जगाची निर्मिती करण्यासाठी परस्पर सहकार्य करत आहेत,” असे अल्बानीज यांनी म्हटले आहे.


Powered By Sangraha 9.0