सेवाव्रती विजयकुमार पाटील

    09-Feb-2023
Total Views |
VijayKumar Patil


समाजातील समस्यांच्या विळख्यात असलेल्यांना मदत, सहकार्य करीत नित्य समाजसेवा करणारे विजयकुमार पाटील हे त्यांच्या या कार्यकुशलतेमुळे ‘सेवाव्रती ’ म्हणूनच परिचित आहेत.

विजयकुमार पाटील हे पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनोखे व्यक्तिमत्त्व. अगदी शालेय जीवनापासून सामाजिक कामात सुरुवात केली. गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक, पर्यावरण, पोलीस मित्र, महिला सक्षमीकरण, नदीसंवर्धन, माहिती अधिकार, लेखन, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, विधिसंघर्षित बालक समुपदेशन, मध्यवर्ती शांतता समिती, वाहतूक सल्लागार अशा विविध क्षेत्रांत नागरिकांच्या सुरक्षा हेतू कार्यरत आहेत. मागील वर्षी त्यांच्या या अविरत सेवा व्रताची २५ वर्षे पूर्ण झाली.
 
विजयकुमार पाटील यांचे शालेय शिक्षण आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयात पूर्ण झाले. त्यानंतर ‘ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग’मध्ये पदविका धारण करून पुण्यातील नामवंत ऑटोमोबाईल कंपनीत ‘ज्युनिअर सर्व्हिस इंजिनिअर’ म्हणून नोकरी सुरू केली. ते व त्यांचे कुटुंब निगडी प्राधिकरण येथे १९७६ पासून राहते.१९९३ रोजी त्यांनी ‘ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग’ पूर्ण केले. त्यानंतर काही काळ नोकरी सुरू केली. पण, शालेय जीवनातील सामाजिक कार्याची आवड त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. कार्यकारी दंडाधिकारी व शिक्षक समाजसेवक वडील वसंतराव पाटील व आई संत साहित्याच्या अभ्यासक प्रमिला पाटील यांचा समाजसेवेचा वसा पुढे त्यांनी सुरू ठेवला आहे.

१९९७ ला सक्रिय सामाजिक कार्यास सुरुवात केली. २००४मध्ये प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीची स्थापना केली. समितीच्या माध्यमातून निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, दत्तवाडी, गंगानगर, चिंचवड, रावेत परिसरात मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांची फळी निर्माण केली उच्चशिक्षित, पर्यावरण अभ्यासक, पक्षिप्रेमी, दिव्यांग प्रतिनिधी, क्रीडा अभ्यासक, वैद्यकीयतज्ज्ञ, शिक्षक वृंद अशा सर्व क्षेत्रांतील प्रतिनिधी संस्थेमध्ये दाखल झाले. त्यामुळे संस्थेचा विस्तार हळूहळूपुणे जिल्ह्यात वाढू लागला. शहरातील उपेक्षितांसाठी मदतीचा हात देण्यासाठी ‘ओम शिवभक्त चॅरिटी ट्रस्ट’ची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून ते अनेकांशी जोडले गेले. सामाजिक कामानंतर व्यसनमुक्ती, करिअर विकास, आरोग्य शिबीर हे उपक्रम त्यांनी राबवले.

नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती माध्यमातून कामास सुरुवात केली. वाहतूक असो वा नागरिकांचे आरोग्य या कृती समितीच्या माध्यमातून ते सर्वांपर्यंत पोहोचत असे. यात प्रामुख्याने योगप्रसाराचे कार्य सुरु केले.
पुढे ‘डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी’करिता अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध खेळांत सामावून घेण्यात आले. विशेष म्हणजे, शहरातून उदयोन्मुख खेळाडू अशी अपेक्षा धरून आजपर्यंत हजारो जणांना विजय पाटील यांनी खेळामध्ये पाठिंबा दर्शवला. पोलीस ठाणे, मंडईचा परिसर आणि चौका-चौकात त्यांनी पोलिसांसमवेत जनजागृती करण्यास सुरुवात केली. निगडी येथील गणेश तलाव स्वच्छतेबाबत पाठपुरावा करून अखेर प्रशासनाकडून तलाव स्वच्छ करून घेतल्याची आठवण ते सांगतात.

शहरात एकूणच वाढत जाणारी पाणीटंचाई आणि नागरिकांना आत्तापासूनच पाणीबचतीची सवय लागावी, यासाठी पाणी बचत अभियान सुरू केले. शाळेमध्ये जाऊन तसेच महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्व सांगून, पुढील पिढी पाण्यावाचून राहू नये, अशी खंत त्यांनी बोलताना व्यक्त केले.एकूणच काम करत असताना समाजातील काही व संघटनांनी विविध पुरस्कारांनी गौरवले. यात राज्यपातळीवर उल्लेखनीय कार्याबद्दल ‘समाजभूषण’ आणि ‘पिंपरी-चिंचवड जय गणेश कमिशनर पुरस्कार’ म्हणून गौरव केला.महाविद्यालयीन तरुणींच्या छेडछाड प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस व समितीच्या माध्यमातून उपनगरांमध्ये तक्रार पेटी उपक्रम व्यापक स्वरूपात राबविला गेला २००० पेक्षा जास्त तक्रारींचे निराकरण केले गेले.

नदी संवर्धन व पर्यावरण संवर्धनासाठी शहरात व्यापक चळवळ सुरू केली त्यामुळे पालिका प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास दखल घ्यावी लागली. नुकतीच नदी प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील पाच हजार उद्योग समूहांना बरोबर घेऊन आयुक्त शेखर सिंह यांनी पुढाकार घेऊन मोठा सांडपाणी, घातक द्रव्य विरहित स्वच्छ पाणी प्रकल्प सुरू करण्यास सुरुवात केली आहे.
अशा बहुअंगी व्यक्तिमत्त्वाच्या अविरत सामाजिक कार्याची दखल समाजातील अनेक सामाजिक व प्रशासकीय संस्थांनी घेतली असून त्यांना आजपर्यंत ५०पेक्षा जास्त जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

पवना नदी प्रदूषण, इंद्रायणी नदी संवर्धन याकरिता शहरात तीन वेळा पर्यावरण अभ्यासकांच्या गटाद्वारे पाहणी केली गेली व त्याचा अहवालही प्रसिद्ध केला.त्या अहवालाची दखल पालिका प्रशासनाने घेतली असून नदीप्रदूषण मुक्त करण्यासाठी व सांडपाणी विरहित करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. विजयकुमार पाटील हे पक्षिप्रेमी व अभ्यासकही असून त्यांनी आतापर्यंत चार गव्हाणी घुबड, तीन घारी, सहा कोकिळा, दोन कावळे,चार पोपट, एक गाय बगळा, तीन बदके, तीन बुलबुल पक्षी, एक खंड्या पक्षी, एक धनेश पक्षी यांना जखमी अवस्थेतून उपचार करून जीवदान दिले आहे. १८ वर्षांपासून दरवर्षी उन्हाळ्यात सुट्टी कालखंडात ‘जागते रहो’ हा रात्र गस्त उपक्रम त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शहरात राबविला जात आहे.


-पंकज खोले