आजकाल पुण्यात पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नुकत्याच राज्यात पार पडलेल्या पदवीधर निवडणुकीत भाजप पराभूत झाला म्हणून महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्ष त्यांच्यात अंतर्विरोध असूनदेखील गुदगुल्या झाल्यासारखे वागत आहेत. मात्र, तांबे-थोरात प्रकरणात पक्षाची इज्जत चव्हाट्यावर आली असतानादेखील नाना पटोले यांनी तेथे राष्ट्रवादीने मदत केली नाही, असे सांगून आघाडीत आलबेल नसल्याचे संकेत दिलेत. विशेष म्हणजे, एकीकडे ते आमचा पक्ष राज्यात हातात हात अभियान राबवित असल्याचे सांगतात आणि दुसरीकडे मात्र त्यांच्या पक्षातील कलहातून पायात पाय घालणे सुरू असल्याचेदेखील वारंवार सिद्ध होत आहे. पुण्यातदेखील बंडखोरी थांबवणे त्यांच्या नाकीनऊ आले होते. संजय राऊत हे आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत, असे सांगून त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाबाबत आपल्या काय भावना असू शकतात, हे सूचित केले. बरं हे कमीच की काय म्हणून तिकडे आता जे राष्ट्रवादी आणि उबाठा गटात सुरू आहे, ते देखील फार काही ठीकठाक म्हणता येत नाही. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीऐवजी आम्हाला उमेदवारी द्या, असा आव संजय राऊत यांनी आणून बघितला. मात्र, अजितदादांपुढे आपली डाळ शिजणार नाही म्हणून त्यांनी राहुल कलाटे यांना बंडखोरी कर असे सांगून अजितदादांना अडचणीत आणण्याची खेळी केल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. दुसरीकडे, मूळ राष्ट्रवादी पक्षाच्या धोरणाचे समर्थक असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या उमेदवाराला माघार घेऊ नको, असे राष्ट्रवादी पक्षाने सांगितल्याची चर्चा आहे. उद्या काँग्रेसचा उमेदवार पडला तर ऊबाठा गटाशी युती केलेल्या संभाजी ब्रिगेडने आमचा उमेदवार पाडला, हा आरोप काँग्रेस करेल आणि त्याचे खापर उद्धव ठाकरेंवर फोडेल. त्यामुळे या तिन्ही पक्षांचे असे पायात पाय घालणे काय निकाल लावते, हे लवकरच समजेल.
हातात हात
काँग्रेस पक्ष राज्यात आमचे हातात हात अभियान सुरू असल्याचे सांगत सुटला आहे. मात्र, त्यापेक्षा त्यांच्या पायात पाय घालण्याच्या कार्यक्रमाची चर्चा राज्यात जोरात असते. भाजपने मात्र हातात हात घालून कसे चांगले साध्य केल्या जाऊ शकते, हे वारंवार आपल्या कृतीतून मित्रपक्षाशी असलेल्या संबंधातून आणि या निवडणुकीच्या निमित्ताने योग्य रणनीती आखून दाखवून दिली आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरात भाजपने उमेदवारी दिली नाही म्हणून भाजपवर आरोप करणार्या तिन्ही पक्षाला मुक्ता टिळक यांचे पती आणि मुलाने पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहून आम्ही एक आहोतच, पण पक्षासोबतदेखील असल्याचे सांगून विरोधकांना जोरदार चपराक दिली.शिवाय भाजपचे मित्रपक्ष असलेल्या सगळ्या पक्षांनी कोठेही भाजप विरोधात ब्र न काढत आमचे नेहमीच हातात हात असतात, हे दाखवून दिले आहे. उमेदवारी अर्ज भरतानादेखील ही एकी दिसून आली. उलट धंगेकर नामांकन भरत होते तेव्हा अजितदादा गायब होते आणि काटे अर्ज भरताना पटोले किंवा तिन्ही माजी मुख्यमंत्री कुठेही दिसले नाहीत. उबाठाकडून पण कोणीही मान्यवर दिसले नाहीत. संभाजी ब्रिगेडने अर्ज दाखल केला तेव्हा या युतीचा राज्यभर गाजावाजा केलेल्यांनीदेखील पाठ फिरवल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाने हेमंत रासने यांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच तातडीची सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आणि उमेदवाराच्या विजयासाठी सक्रिय होण्याचे निर्देश दिलेत. युतीचे हे हातात हात घालून वावरणे राज्यात काँग्रेसच्या सुरू असलेल्या हातात हात अभियानापेक्षा नक्कीच देखणे आहे. निदान पायात पाय घालण्याची ते शोभा करीत नाहीत, हे येथे आवर्जून नमूद करावे लागेल. कसबा पेठमध्ये सातत्याने भाजपला कौल मिळत राहिलेला.त्यामुळे येथे अन्य पक्षाच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी ठोस रणनीती आखावी लागेल किंवा किमान एकी तरी दाखवावी लागेल. मात्र, तूर्त तरी कोणतीही तशी सुतराम शक्यता वाटत नाही. त्यामुळे भाजपला आणि राज्यात ज्यांनी आपल्याला सतेतून हाकलले त्यांना बदनाम करणे एवढाच विरोधकाकडे कार्यक्रम आहे, बाकी मतदार सुज्ञ आहेच, तोही पुण्याचा... त्यामुळे अधिक सांगणे न लगे.