शहराकडून गावातील आपल्या छोट्या मित्रमंडळींसाठी शैक्षणिक सहकार्याचा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाचा सेतू बांधायचे काम ‘लेट्स इमॅजिन टूगेदर’ने हाती घेतले आहे. त्या अंतर्गत मोज शाळेत मोज, बालीवली, तुसे, वरई बुद्रुक आणि बिलघर या सर्व शाळेत मुलं पहिल्यांदाच एकत्रित जमली होती. दुर्गम भागातील मुलांना परिसराबाहेरचे जग समजावे, स्वत:ची ताकद ओळखावी, गुणवत्ता पारखावी म्हणून एक उपक्रम आयोजित केला. त्या उपक्रमातील अनुभव इथे शब्दांकित केला आहे.
मोज शाळेत दोन दिवसांत जे जे उपक्रम झालेत, त्या सगळ्यांचा अनुभव आता फेब्रुवारीच्या भेटीत विक्रमगडातील शाळेच्या मुलांना पण देऊया... या कल्पनेवर किशोर सर, प्रल्हाद सर आणि आम्हा सर्व ‘लेट्स इमॅजिन टूगेदर’च्या टीमचे एकमत झाले. या वर्षी नवनवीन संकल्पना आणि उपक्रम या सर्व शाळांमध्ये करायचे, हे ठरवलेच होते. मग वर्षाची सुरुवात हसतखेळत, मज्जामस्ती करत आनंदाने करायची आणि त्याच बरोबर आरोग्याचे महत्त्वही पटवून द्यायचे, असा संकल्प सोडला. आमच्या टीममधल्या मानसीची आधीपासूनच खूप इच्छा होती की, आपल्या या छोट्या दोस्त मंडळींना मेजवानीचा लाभ द्यायचा. तिने ते ठरवले आणि तिच्या कुटुंबीयांनी ते अंमलातही आणले. त्यांच्या ‘पॅराडाईस कॅटरर्स’ने त्यासाठी बरीच धावपळ केली आणि जय्यत तयारीसुद्धा. तिचा पूर्ण स्टाफ, जेवणासाठी लागणारे सगळे साहित्य आणि खास पिझ्झा बनविण्यासाठीचे साहित्य असा सगळा जामानिमा घेऊन ते कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच टेम्पोने मोज शाळेत दाखल झाले.
बरं फक्त जेवणच नाही, तर मुलांच्या मनोरंजनासाठी जादूगारही मुंबईवरून खास आमंत्रित केला होता. या अभिनव उपक्रमामुळे शाळा सोडणार्याची संख्या कमी होण्यास मदत होईल आणि मुलांना शाळा म्हणजे एक आनंदाचे ठिकाण वाटेल हा उद्देश हा अभिनव उपक्रम करण्यामागे आहे. असे उपक्रम मुलांना रोज शाळेत येण्यासाठी उत्साहित करतील आणि त्यांना प्रोत्साहनही देतील.मोज शाळेत मोज, बालीवली, तुसे, वरई बुद्रुक आणि बिलघर या सर्व शाळेत मुलं एकत्रित पहिल्यांदाच जमणार होती. जवळपास ३५० मुलं या ‘मोजमज्जा’साठी एकत्र आली होती. जादूच्या प्रयोगासोबत ‘माईम’ हा कलाप्रकार ही मुलं पहिल्यांदा अनुभवणार होती. ‘मोजमज्जा’चं हे जादुई जग मुलांसाठी नवीन होतं. त्यांचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. शनिवारी हा कार्यक्रम होता, तर आदल्या दोन दिवसांपासूनच मुलं त्या भावविश्वात हरवून गेली होती. जादूगार कसा असतो, तो कसा दिसतो, खरंच जादू असते का...असे अनेक प्रश्न विचारून शिक्षकांना भंडावून सोडले, तर होतेच पण जादूगाराला काय काय प्रश्न विचारायचे, याची एक यादीच बनवली होती. काहींनी तर कल्पनेतला जादूगार चित्रात साकारला होता.
‘माईम’ म्हणजे नक्की काय, ते न बोलता अभिनय करतात म्हणजे काय...सगळे प्रश्न, उत्सुकता, कुतूहल घेऊन मुलं शनिवारी शाळेत दाखल झाली. त्यांना आणण्यासाठी टेम्पो, टमटम गाड्यांची सोय केली गेली होती. आम्हीही सर्व आमच्या टीमसोबत ९ वाजता शाळेत दाखल झालो. शाळेत भव्य मंडप बांधला होता. मुंबईत असतो तसाच बफेच्या काऊंटरचा थाट होता. मुलं उत्सुकतेने वाकून वाकून बघत होती, पिझ्झा कसा बनवतात ते. मानसी आणि तिचे कुटुंबीय या सर्व गोष्टींकडे जातीने लक्ष देत होते. मुलांना हा बफेचा अनुभव आपण देऊ शकलो, याचे समाधान आणि आनंद मानसीच्या चेहर्यावर दिसत होता. जादूगाराची एन्ट्री झाली आणि सगळी मुलं नाश्ता करून आपल्या जागेवर पटापट येऊन बसली.
जादूचे प्रयोग आणि ‘माईम’ हे दोन्ही प्रकार त्यांच्यासाठी नवीनच होते. जादूचे एकेक प्रयोग आणि ‘माईम’चा मूक अभिनय मुलांनी ‘फुल्ल टू एन्जॉय’ केला. ‘माईम’ सादर करणारे दोन्ही कलाकार हे वाड्यातीलच होते. या दोन्ही कलाप्रकारांची मुलांना ओळख झाली आणि आपणही हे शिकू शकतो, याची भावना कुठेतरी त्यांच्यामध्ये रुजली. मुलांनी पोटभर हसून घेतल्यावर भरपेट जेवण केले.सकाळचा पहिला कार्यक्रम होता होता दुपारचे २ वाजले होते. मुलं घरी जायला निघाली आणि आता चित्रकार श्रीनिवास बाळकृष्ण यांच्या बोबडी दृश्यभाषाच्या कार्यशाळेची तयारी सुरू झाली. त्यांच्या या कार्यशाळेतून शिक्षक आणि पालक वर्गही पुन्हा लहान झाले होते. कारण, त्यांना मुलांच्या भाषेला समजून देणारी अंकलिपी जाणून घ्यायची होती. त्यात अनेक उदाहरण देऊन चित्रभाषा शिकतानाचा अनुभव आनंद द्विगुणित करून गेला. या आधी डिसेंबरपासूनच श्रीनिवास व प्राची श्रीनिवासने मुलांसाठी चित्रकार्यशाळा आणि मोज मधील भिंत रंगविण्याचे काम सुरू केले होते. मोजमधील मुलांसाठी हा अनुभव खूपच अद्भुत होता. शनिवारचा पूर्ण दिवस एका वेगळ्याच दुनियेत आम्हालाही घेऊन गेला.
रविवार सकाळची सुरुवात डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या आरोग्य मार्गदर्शनाने झाली. डॉ. भाग्यश्री पाटील यांनी मुलांना निरोगी आरोग्याचे महत्त्व सांगताना त्याच बरोबर चांगला स्पर्श-वाईट स्पर्श आणि वयात येतानाच्या समस्या यासारखे नाजूक विषय सहजसोपी उदाहरण देऊन समजावून सांगितले. पौगंडावस्थेतील मुलांना समजून घेणारा कार्यक्रम पहिल्यांदाच या भागात राबवला गेलाय, असे वाडा विभागातील प्रयोगशील शिक्षक प्रल्हाद काठोले आणि किशोर काठोले यांनी सांगितले. महत्त्वाचं म्हणजे, सहावी ते आठवीतील मुलं आणि मुली एकत्र बसून हा कार्यक्रम ऐकत होते. मुलींसोबत मुलांनाही मुलींच्या समस्या कळणे गरजेचे आहे, असे तेथील शिक्षकांचे म्हणणे होते आणि ते खरंही आहे. कारण, त्यामुळे मुलं मासिक पाळीच्या समस्येच्या वेळी मुलींकडे बघून हसणार नाहीत, तर शाळेतच काय पण घरीही आईबहीण असेल, तर या दिवसात त्यांना समजून घेतील तसेच घरकामासाठी मदतही करतील.
डॉ. भाग्यश्रींनी हा विषय खूप सहजतेने हाताळला. त्याचा एक चांगला परिणाम असा झाला की, त्यांच्या आरोग्य संवादानंतर काही मुलींनी त्यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्या पुढे मांडल्या. अशाप्रकारचे आरोग्य मार्गदर्शन सर्वच शाळेत वारंवार होण्याचे गरजेचे आहे, हे आम्हालाही कळून आले. डॉ. भाग्यश्रींनीही या बाबतीत सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. एवढेच नाही, तर त्या मुलींना मोफत औषधेही दिली.२५ फेब्रुवारी तारीख नक्की करण्यात आली आणि आम्ही पुन्हा सगळे कामाला लागलो. व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकच्या आमच्या पोस्ट बघून फोन आणि मेसेजेस यायला लागले. आता परत कधी जाताय, काय मदत हवी आहे, आम्ही पण तुमच्या या उपक्रमात सहभागी होऊ इच्छितो, वगैरे वगैरे.मागे वळून पाहता गेल्या चार वर्षांत (त्यातील दोन वर्षं कोरोनाची होती) आमच्या सोबत बरीच माणसे जोडली गेली. जवळपास ७५ जणांनी आमच्यासोबत प्रत्यक्ष वाडा भेटीत, कार्यशाळेत भाग घेतला. दिवसेंदिवस ही साखळी वाढतच चालली आहे.
प्रत्यक्ष येऊन अनुभव घेतल्यावर त्यांना तेथील परिस्थिती अनुभवता आली. आमच्या कार्यातील सच्चेपणा. कष्ट, मेहनत, तळमळही समजून घेता आली, अनुभवता आली. एक बोलका प्रसंग खास नमूद करावासा वाटतो. मानसीच्या बिल्डिंगमधील ५ वर्षांच्या व्योमने आपल्याकडील एक शार्पनर दिले. मानसीने विचारले तिकडे मुलं तर खूप आहेत. पण त्यावर त्या व्योमने मात्र कल्पकतेने उत्तर दिले, “तर काय झालं...एक शार्पनर ते एकेक करून पेन्सिल शार्प करतील ना.” एवढ्या छोट्या व्योमला ही मानसीताई काहीतरी चांगलं काम करते आहे आणि आपण तिला मदत केली पाहिजे, हे समजले. हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. युवा पिढी तर मोठ्या संख्येने बरोबर येतेय, सहभाग घेतेय आणि आपले योगदानही देते आहे.शहराकडून गावातील आपल्या छोट्या मित्रमंडळींसाठी शैक्षणिक सहकार्याचा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाचा सेतू बांधायचं काम ‘लेट्स इमॅजीन टूगेदर’ने हाती घेतलं आहे...जमेल तसं आपल्या परीने आमच्यासोबत जोडले जाणारे सहकार्य करत आहेत आणि हा सेतू बांधायला मदत करत आहेत.
-पूर्णिमा नार्वेकर