अमेरिकन रिसर्च फर्म ‘हिंडेनबर्ग’ हे नाव भारतासह सध्या जगभरात चर्चेत आहे. अवघ्या पाच विश्लेषकांच्या जीवावर या ‘हिंडेनबर्ग’ने जगभरातील बड्या उद्योजकांना वेठीस धरले. ‘हिंडेनबर्ग’ हे नाव हल्लीच्या पिढीसाठी नवे असले, तर ज्या पिढीने पहिले आणि दुसरे महायुद्ध अनुभवले किंवा त्या कालावधीत वावरले, त्यांच्यासाठी आणखी एक ‘हिंडेनबर्ग’ होऊन गेला. होय तोच ज्याने अॅडॉल्फ हिटलरला हुकूमशहा होण्यासून रोखले होते. पहिल्या महायुद्धात बलाढ्य जर्मनीचा फिल्ड मार्शल हे सर्वोच्च पद ज्याने भूषविले तो लुडविंग हिंडेनबगर्र्! आपल्या युद्धनीतीमुळे त्याकाळी तो सर्वाधिक लोकप्रिय होता. शत्रूंसाठी कर्दनकाळ अशी ‘हिंडेनबर्ग’ची ओळख होती. १९२५ मध्ये जर्मनीच्या राष्ट्राध्यक्षपदी ‘हिंडेनबर्ग’ होते. त्याच वेळी तेथे कोणत्याच पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळाले नाही. हिटलरचा नाझी पक्षदेखील सत्तेच्या जवळपास होता. परंतु, घटनेप्रमाणे काम करणारे शिस्तप्रिय सेनाधिकारी होते. त्यांनी हिटलरच्या दडपशाहीला न जुमानता आधी बहुमत दाखवा, मगच सत्ता स्थापन करता येईल अशी अट घातली. हिटलरने विविध प्रकारचे दबावतंत्र वापरून त्या ‘हिंडेनबर्ग’ची कोंडी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, ‘हिंडेनबर्ग’ आपल्या भूमिकेवर अखेरपर्यंत ठाम राहिले. त्यांचे म्हणणे एकच होते - हिटलरला जर पंतप्रधान केले, तर देशात यापुढे निवडणुका होणार नाहीत आणि कालांतराने हुकूमशाही येईल. त्यांनी केलेले शर्थीचे प्रयत्न कमी पडले आणि हिटलरचा उदय झाला. जर्मनीच्या त्या ‘हिंडेनबर्ग’ने अॅडॉल्फ नावाच्या हिटलरच्या हुकूमशाहीला वेसण घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, अमेरिकेत उदयास आलेला रिसर्च फर्म हिंडेनबर्ग’ याला कोण वेसण घालणार? हा प्रश्न उद्योगजगताला हल्ली भेडसावत असणार. हा ‘हिंडेनबर्ग’ लोकप्रियता आणि पैसा कमवण्यासाठी जगाच्या अर्थव्यवस्थेवरच वार करत आहे. ‘हिंडेनबर्ग’ने जाहीर केलेल्या अहवालामुळे ‘अदानी’ समूहाच्या मार्केट कॅपमध्ये ५.५ लाख कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. यापूर्वीही ‘हिंडेनबर्ग’ने अनेक कंपन्यांविरूद्ध अहवाल जारी केले आहेत. या अहवालांमुळे कंपन्यांचे शेअर्स सरासरी १५ टक्क्यांनी घसरले होते. जर्मनीच्या ‘हिंडेनबर्ग’ने एका हुकूमशहाला रोखण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिकेचा हा दुसरा ‘हिंडेनबर्ग’ अर्थव्यवस्थेचा हुकूमशहा होण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच बळी ‘अदानी’समूह ठरत आहे.
खवय्ये मंडळी नवनवीन पदार्थ आणि ठिकाणांच्या शोधात नेहमीच असतात. खाऊगल्ली, ढाबा, टपरीवरचे चटपटीत पदार्थ येथपासून ते पंचतारांकित हॉटेल्सपर्यंत नानाविध पदार्थांची लयलूट करून खवय्ये क्षुधातृप्ती झाल्याने ढेकर देत असतात. आपण एखाद्या नव्या शहरात किंवा पर्यटनस्थळी दाखल होताच सर्वप्रथम तेथे खाण्याचे काय विशेष, हे आवर्जून पाहत असतो आणि संधी मिळताच भरपेट ताव मारतो. स्थान आणि कालपरत्वे खाण्याचे रंगढंगही वेगवेगळे असतात; ध्येय मात्र एकच पोटोबा! अलीकडच्या काळात युरोपीय देशातून आपल्याकडे आलेली नवी खाद्य संस्कृती म्हणजे हवेत आपल्या आवडत्या भोजनावर ताव मारणे. इटलीत जगातील पहिले हँगिंग म्हणजेच हवेत लटकलेले रेस्टाँरंट सुरू झाले, तर भारतातील पहिल्या हँगिंग रेस्टाँरंटचा मान बंगळुरु शहराला मिळाला आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेशसह अन्य राज्यातही हँगिंग रेस्टॉरंट एकापाठोपाठ सुरू होत आहेत. विशेष म्हणजे, या रेस्टॉरंटला ग्राहकांची कधीच उणीव भासत नाही. बंगळुरुतील हँगिंग रेस्टारंटला भेट देऊन प्रत्यक्ष हवेत बसून पोटोबा करण्यासाठी खवय्यांची प्रतीक्षायादी नेहमीच लांबलचक असते. येत्या काळात हिमाचलमध्ये एक-दोन नव्हे, तर चक्क पाच हँगिंग रेस्टारंट सुरू होणार आहेत. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम हल्ली सर्वच देशांत लोकप्रिय ठरत असून, ग्राहकांची या रेस्टॉरंटमध्ये गर्दी सातत्याने वाढत आहे. या रेस्टॉरंटला अनुसरून रोजगारवाढ आणि अन्य उपक्रमांनाही चालना मिळत आहे. ‘हँगिंग रेस्टॉरंट’ या नव्या व्यवसायामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात महसूलवाढ होण्याची अपेक्षा आहे. बंगळुरुला भेट देणारे पर्यटक आवजूर्र्न ‘हँगिंग रेस्टॉरंट’ला भेट देतात. किमान चार हजारांपासून येथील पदार्थांना सुरुवात होत असून एका कुटुंबाला १० ते १२ हजार खर्च अपेक्षित आहे. हा खर्च तारांकित हॉटेल इतकाच असला तरी वातानुकूलित वातावरणापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात १५० ते २०० फूट उंचीवर ‘क्रेन’च्या साहाय्याने हवेत लटकणार्या रेस्टॉरंटमध्ये आपले आवडते पदार्थ खाण्याचा आनंद काही औरच आहे. येत्या काळात महाराष्ट्रातही ‘हँगिंग रेस्टॉरंट’ सुरू होतील तोपर्यंत ज्या खवय्यांना ‘हवे’शीर पोटोबा करायचा असेल, त्यांनी बंगळुरु किंवा हिमाचलमध्ये जायला हरकत नाही!