मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर दि. ६ फेब्रुवारी रोजी पहिली पुण्यतिथी आहे. या दिवशी लता दीदींना त्यांचे चाहते तसेच अनेक मान्यवर आदरांजली वाहत आहेत. या प्रंसगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्वीट शेअर करुन लता दीदींना अभिवादन केलं आहे.
राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींचं गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार. माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण ह्यापुढे कदाचित अनेक पिढ्यांना सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील.चिरंजीवी होणं म्हणजे काय असं मला विचारलं तर मी ह्यालाच चिरंजीवित्व म्हणेन. दीदीच्या आठवणी आहेत राहतील पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवामध्ये राहतील.दींदीच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन!' असे ट्वीट राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे यांच्यासोबतच अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.