ठाणे : शहरातील नऊ बड्या बांधकाम व्यावसायिकांनी तब्बल पाच हजार ग्राहकांची फसवणूक केली आहे. त्यांना ‘एमसीएचआय’ या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने गृह प्रदर्शनात त्यांचे प्रकल्प ठेवण्यास मनाई केली आहे. त्यांच्यामुळे ग्राहकांना नाहक बँकेच्या कर्जाचे हप्ते फेडावे लागत असून त्यांच्या विरोधात आ. संजय केळकर यांनी मोहीम उघडली असून आगामी अधिवेशनातही या बड्या विकासकांचे बिंग फोडणार असल्याचा इशारा आ. संजय केळकर यांनी दिला आहे.
ठाण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांना लवकर सदनिका देण्याचे प्रलोभन दाखवून व्यवहार केले. परंतु, इमारतींची कामे मात्र पूर्ण केलेली नाहीत. काही व्यावसायिकांनी पार्किंग, तरण तलाव, उद्यान, क्लब हाऊस, जिम या सुविधा देण्याचे आमिष दाखवून सदनिकांची विक्री केली आहे. या सर्व सुविधांमुळे बँकांकडून ग्राहकांनी कर्ज घेतले आहे. त्या कर्जाचे हप्ते सुरू झाले आहेत.
परंतु, सदनिका मात्र ताब्यात मिळत नसल्याने अनेक ठाणेकर ग्राहकांनी आ. संजय केळकर यांच्याकडे कैफियत मांडली होती. या ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेऊन आ. केळकर यांनी त्या नऊ बिल्डरविरोधात मोहीम उघडली आहे. या बिल्डरच्या विरोधात रेराकडेदेखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. ग्राहकांचे मेहनतीचे पैसे बुडणार नाहीत, याची काळजी घेऊन बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात मोहीम उघडणार असल्याचे आ. संजय केळकर म्हणाले.
सामान्यांना वार्यावर सोडणार नाही!
नऊ बड्या विकासकांनी करारपत्रे करून 90 टक्के रक्कम भरूनही ग्राहकांना घरे दिलेली नाहीत. अनेक ठिकाणी तर घराची वीटही लागलेली नाही. तब्बल पाच हजार सामान्यांची फसवणूक झालेली असल्याने त्यांना वार्यावर सोडणार नाही, असे स्पष्ट करून आ. संजय केळकर यांनी आगामी अधिवेशनात ठाण्यातील ग्राहकांच्या समस्या मांडणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही लेखी तक्रार केल्याचे सांगितले.