आत्मचर्चेच्या अंतरंगात...

06 Feb 2023 19:25:36
Getting-Over-Negative-Self-Talk

माणूस म्हणून आपल्या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचे साम्य आहे, जे आपल्या मेंदूच्या कार्याचा अविभाज्य भाग आहे. तो अविभाज्य भाग म्हणजे आपण सगळे दिवसभर विचार करत असतो. यालाच सामान्यतः आपण आपला ‘आतील आवाज’ वा ‘आत्मचर्चा’ असेही म्हणतो. आपल्या सर्वांच्या मनात समीक्षकाचा एक आवाज चालू असतो. आतील आवाज ‘मी बलवान आहे, मी हुशार आहे, मी दयाळू आहे’ अशा विशेषणांनी भरलेला असू शकतो. काही वेळा हा असा ‘आतला आवाज’ खरोखर उपयुक्तदेखील ठरू शकतो आणि आपल्याला आपल्या ध्येयासाठी प्रेरक ठरू शकतो.


जसे की, आपण जे काही दैनंदिन क्रियाकलाप करत आहोत, ते आरोग्यदायी आहेत की नाही, हे समजण्यासाठी मदत करतो किंवा आपण जे काही करणार आहोत, ते शहाणपणाचे असू शकत नाही, याची वेळोवेळी आठवण करून देतो. याउलट, कधी आपला आतला आवाज ‘मी कमकुवत आहे, मी मूर्ख आहे, मी एक लाजिरवाणी व्यक्ती आहे,’ अशा हानिकारक विचारांनीही भरलेला असू शकतो. तथापि, हा आवाज उपयुक्त असण्यापेक्षा अधिक हानिकारकही होऊ शकतो. विशेषतः जेव्हा तो नकारात्मकतेच्या परिघात येतो, तेव्हा तो विनाशकारक असू शकतो. याला ‘नकारात्मक आत्मचर्चा’ म्हणून ओळखले जाते आणि ती खरोखरच आपल्या मार्गात अडथळा आणू शकते. म्हणूनच ‘नकारात्मक आत्मचर्चा’ आणि त्याचे शरीरावर, मनावर, जीवनावर काय आणि कसे परिणाम होतात, याची जाणीव तुम्हाला असणे आवश्यक आहे.


‘नकारात्मक आत्मचर्चा’ वा ‘स्वचर्चा’ ही आपल्यापैकी बहुतेकांना वेळोवेळी अनुभवास येणारी गोष्ट आहे आणि ती अनेक प्रकारांत ओळखता येते. जर आपण सावधगिरी बाळगली नाही, तर ती केवळ आपल्यासाठीच नाही, तर आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी देखील महत्त्वपूर्ण तणाव निर्माण करते. तुम्हाला कदाचित माहीत असेल की, तणावामुळेअनेक शारीरिक लक्षणे उद्भवू शकतात, जसे की पोटात दुखणे किंवा नैराश्यामुळे अनेकदा शारीरिक दुखापत होणे. यामागील शास्त्रीय पुराव्यांचा भाग असे सूचित करतो की, नकारात्मक भावनांचा आणि विचारांचा हृदयविकारासारख्या इतर गंभीर आरोग्य समस्यांशीदेखील संबंध असू शकतो.


राग, भीती आणि निराशा यांसारख्या अनेक नकारात्मक भावना समस्याप्रधान बनतात, तेव्हा त्या भावना अधिक प्रमाणातशाश्वत स्वरूपी स्वभावात बदलतात किंवा जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात विघातक स्वरूपाचे बदल घडवतात.मुळात, नकारात्मक स्वचर्चा म्हणजे काय? तर स्वतःशी असलेला कोणताही आंतरिक संवाद जो तुमच्या स्वतःवर आणि तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आणि तुमच्या क्षमतेपर्यंत पोहोचण्याची तुमची क्षमता मर्यादित करत असतो. तो असा विचार आहे, जो तुमच्या जीवनात सकारात्मक बदल करण्याची तुमची ऐपत कमी करतो किंवा तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास कमी करतो. त्यामुळे नकारात्मक आत्मचर्चा केवळ तणावपूर्णच असते असे नाही, तर ती खरोखरच तुमचे यश रोखू शकते.

‘नकारात्मक स्वचर्चे’चे परिणाम

‘नकारात्मक स्वचर्चा’ आपल्यावर अनेक हानिकारक मार्गांनी परिणाम करू शकते. एका मोठ्या प्रमाणावरील पाश्चात्त्य अभ्यासात असे आढळून आले आहे की, नकारात्मक घटनांवरील रवंथ केल्याने आणि स्वत:ला दोष देण्याचा स्वभाव असल्यास मानसिक आरोग्याची जोखीम वाढते. नकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित केल्याने आपली स्वप्रेरणा कमी होऊ शकते. तसेच, असाहाय्यतेची भावना वाढू शकते. अशा प्रकारचा नकारात्मकगंभीर आत्मसंवाद नैराश्याशी जोडला गेला आहे, त्यामुळे नकारात्मक स्व-संभाषणांचे निश्चितपणे निराकरण करण्याची आवश्यकता आहे. नकारात्मक स्व-संवादामुळे बिकट परिस्तिथीत एखादी संधी पाहण्याची क्षमता कमी होऊ शकते, तसेच पुढे जाऊन या संधींचा फायदा घेण्याची प्रवृत्ती कमी होऊ शकते. याचा अर्थ असा की, तणावाची वाढलेली भावना ही त्यामागचे विचार आणि त्यातून येणारे वर्तन या दोन्हींमधून येते. नकारात्मक आत्मचर्चांच्या इतर परिणामांमध्येखालील बाबी समाविष्ट असू शकतात.:


मर्यादित विचार : जितके तुम्ही स्वतःला सांगत राहाल की, तुम्ही कधीच काही भरीव कामगिरी करू शकत नाही, तितका तुमचा त्यावर विश्वास बसत जाईल.


परिपूर्णता/परफेक्शनिझम : तुमचा खरोखर असा विश्वास आहे का की, महान काम हे परिपूर्ण काम इतके तुलनात्मकदृष्ट्या चांगले नाही आणि ती परीपूर्णता प्रत्यक्षात मिळवता येणे शक्य आहे, तर तुम्ही या कल्पनेत नक्कीच फसले जाण्याची शक्यता अधिक आहे. याउलट, उच्च ध्येय वास्तवात साध्य करणारे लोक त्यांच्या परिपूर्णतावादी स्पर्धकांपेक्षा उत्कृष्ट काम करतात. कारण, ते सामान्यतः कमी तणावात असतात आणि आपल्या चांगल्या कामामुळे सदैव आनंदी असतात.


नैराश्याच्या भावना : काही संशोधनात असे दिसून आले आहे की, नकारात्मक आत्मसंवादामुळे नैराश्याच्या भावना वाढू शकतात. यावर जर नियंत्रण ठेवले नाही, तर ते खूप नुकसानकारक असू शकते.


नातेसंबंधातील आव्हाने: नकारात्मक आत्मचर्चेचा सर्वात स्पष्ट दोष म्हणजे तो सकारात्मकनाही. हे समजायला जरी सोपे वाटते तरी ते तसे नाही. सतत स्वत:ची टीका करत राहिल्यास तुम्हाला बिचारे आणि असुरक्षित वाटू शकते किंवा तुम्ही एकटे पडू शकता. कधी कधी तुम्ही तुमचे नकारार्थी स्व-बोलणे इतरांना उगाचच त्रास देणार्‍या नकारात्मक सवयींमध्ये बदलून टाकता. इतरांबरोबर संवादाचा अभाव आणि त्याबरोबर सामाजिक टीकेचाही परिणाम शरीरावर होऊ शकतो. अर्थात, संशोधनाने दर्शविले आहे की, सकारात्मक आत्मचर्चा हा यश मिळवण्यासाठी एक उत्तम मार्ग असू शकतो.


जरी आपल्यापैकी अनेकजणांचा नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन नसला तरी, आपल्याला सातत्याने नकारात्मकतेचा त्रास सातत्याने सहन करावा लागतो, असे नाही. एक चांगली बातमी अशी की, आपली इच्छाशक्ती आणि मेंदू आपले विचार, आंतरिक आवाज आणि स्वत:शी होणारी चर्चा नियंत्रित करू शकतात. यासाठी थोडा सराव लागेल. परंतु, नकारात्मक विचारांशी लढा देणे आवश्यक आहे. जीवन नेहमीच सहजसुलभ नसते. तरीही, नकारात्मक विचाराने आपण आपले आयुष्य अधिक बिकट आणि आव्हानात्मक बनवतो. आता, त्याचा आपल्यावर कसा परिणाम होतो हे पुढच्या लेखात जाणून घेऊया.



(क्रमश:)

डॉ. शुभांगी पारकर

Powered By Sangraha 9.0