मनाची घावावरी ‘मानसरंग’ फुंकर

    05-Feb-2023
Total Views |
 
मन
 
मान भंग आदी व्याधी नाना व्याप ताप.., सुखे एकरंगी दु:खे अनंत अपार.. मनाचीया घावावरी मनाची फुंकर’ ‘पुढचे पाऊलं’ या मानसी मागीकर अभिनीत मराठी चित्रपटात हे गीत अर्थपूर्ण आहे. शरीराला आजार झाला. घाव बसला, तर आपण डॉक्टरांकडून उपचार करून घेतो. मन आजारी पडले, तर मनाच्या घावांवरती तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घेणेही तितकेच आवश्यक. मनाचा थांग लागणे अवघड. मनोव्यापाराच्या गुंतागुंतीतून व्याधी विविध मनोसामाजिक समस्या निर्माण होतात. त्यावर उपचार करून घेतेले तर ते पूर्ण बरे होतात, असा संदेश नुकताच नाशिकमध्ये झालेल्या ‘मानसरंग’ नाट्यमहोत्सव आणि तज्ज्ञांच्या चर्चासत्रात दिला गेला. मनोआजारांवर आज प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. ’मन आजारी आहे’ आणि त्यावर उपचार लागलात हेच मात्र लोकांना कळत नाही. यातील अज्ञान, दुर्लक्षामुळे समस्या वाढतात. मनाला आजार झाले, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्यामुळे होणार्‍या परिणामांची जाणीव करून घेत शरीराप्रमाणे मनही कधी आजारी पडते. मात्र, प्रभावी वैद्यकीय मनासोपचाराने मनाच्या आजारावर फुंकरही घालता येते. हाच संदेश देणार्‍या ‘मानसरंग’ नाट्य महोत्सवाचे आयोजन अत्यंत स्तुत्यच. मानसिक आजारांवरील तीन नाटके महोत्सवात सादर झाली. ‘रंगीत संगीत गोंधळ’ ‘न केलेल्या नोंदी’ यानंतर सादर झालेल्या ‘तो एक राजहंस’ या प्राजक्त देशमुख अभिनीत नाटकाने महोत्सवात कळस गाठला. मोबाईल-गॅझेटस्, यांचा वाढता वापर, भौतिक सुखाची अनिवार ओढ, वाढलेली बेरोजगारी हे नातेसंबंंधांची विण उसवत आहे. असहिष्णू वृत्ती, जाणिवांचे विघटन करते. माणसापेक्षा पैसा श्रेष्ठ ही जाणीव झाल्याने मानसिक आजारात गेल्या 20 वर्षांत प्रचंड वाढ झाली. एकीकडे असे मानसिक आजारी रुग्ण वाढताना मनोआजारांबद्दल अल्प जागृती आहे. साहजिक मानसिक आजारांची संख्या वाढतच आहे. त्यामुळेच मनोकायिक आजार (सायकोसोमॅटीक डिसीज)ही वाढले. यातून सामाजिक समस्याही निर्माण होत गेल्या. मनोव्यापाराचा अभ्यास करून त्याला आधुनिक वैद्यकीय विज्ञानाची जोड देऊन मानसोपचार तज्ज्ञ गुंतागुतीच्या रुग्णांमध्ये नवीन उमेद देतात. मात्र, मानसिक आजार असलेल्या रुग्णाकडे त्याच्या कुटुंबाने तो आजारी व्यक्ती आहे, असे समजून त्याच्या बरे होण्यात साथ द्यावी, हाच संदेश नाट्य महोत्सवातून मिळाला.
‘नो व्हेईकल डे’
 
“मालेगाव महापलिकेने आपल्या कर्मचार्‍यांसाठी बुधवार ’नो व्हेईकल डे’ म्हणून पाळावा आणि या दिवशी कर्मचारी, अधिकारी वर्गाने सायकलवरून कार्यालयात यावे,” अशी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. हा स्तुत्य आणि अनुकरणीय निर्णय. केंद्र सरकारच्या ’स्वच्छ सर्वेक्षण-2023’ व राज्य सरकारचे ‘माझी वसुंधरा अभियाना’अतंर्गत विविध उपक्रमांची तयारी केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून सध्या मालेगाव महापालिकेतील कर्मचारी महिन्याच्या पहिल्या बुधवारी ‘विनावाहन दिवस’ पाळत आहेत. प्रजासत्ताक दिनाचेनिमित्त साधून सुरू झालेला स्तुत्य उपक्रम आहे. मात्र, केवळ महिन्यातून एक दिवस ‘विना वाहन’ पाळण्यापेक्षा ‘आठवड्यातून एक दिवस’ हा उपक्रम राबवणे अधिक योग्य ठरेल असे वाटते. पुणे-बंगळुरुसह राज्यातील काही जिल्ह्यात ‘आयटी’ कंपन्यांचे कर्मचारीही आठवड्यातून एक दिवस ’नो व्हेईकल डे’ पाळतात. याचा आदर्श सर्वच शासकीय कार्यालये आणि खासगी आस्थापना यांनी घेतला तर प्रदूषण कमी होण्यासह नागरिकांचे आरोग्यही सुधारणार आहे. सायकल चालवण्याने मधुमेह, फुप्फुसांचे आजार, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा या आणि अशा आजारांपासून दूर राहणे शक्य आहे. मालेगाव महापालिकेने सुरू केलेला ‘विनावाहन दिवस’ उपक्रम जिल्ह्यातही सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचारी-अधिकार्‍यांनी अंगीकारावा असे वाटते. नाशिक हे भारतातील ‘सायकल सिटी’ म्हणून उदयास येत असलेले शहर. येथे ‘नाशिक सायक्लिस्ट’ने सायकिंगचा प्रचार प्रसार करून शहराला सायकल नगरीचा बहुमान मिळवून देण्यात महत्त्वाचा हातभार लावला. बाराही महिने थंड आल्हाददायक प्रदूषणमुक्त हवामान हे नाशिकचे वैशिष्ट्य. मात्र, गेल्या काही वर्षात वाढत जाणार्‍या औद्योगिकरणाने, वाढत्या लोकसंख्येमुळे नाशिकमध्येही हवेचा दर्जा घसरला. प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये नाशिकचे नाव नुकतेच आले. शहरीकरणाचा हा परिणाम. नाशिक सायकलचे शहर होताना नाशिककरांनी कामाच्या ठिकाणी जाताना आठवड्यातून एक दिवस ‘सायकल डे’ म्हणून पाळावा. शहरातील स्मार्ट रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या सायकल ट्रॅकचा वापर केवळ सायकल चालवणार्‍यांसाठी ठेवावा. त्र्यंबकेश्वर रोडवरील प्रलंबित सायकल टॅ्रकचा प्रश्नही मार्गी लावल्यास नाशिक प्रदूषणमुक्त शहर राहील आणि सर्वाथाने सायकलनगरीही होईल.
 
- निल कुलकर्णी