राहुल गांधी यांच्या निकवर्तीयाची ईडी चौकशी!

    04-Feb-2023
Total Views |
investigation-of-alankar-sawai-by-ed

नवी दिल्ली :
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हवाला प्रकरणात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय अलंकार सवाई याची चौकशी केली आणि त्यांचा जबाब नोंदविला. हवाला प्रकरणात ईडीने नुकतीच तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यास गुजरातमधून अटक केली होती. त्याच संदर्भात सवाई यांची चौकशी करण्यात आली आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, सवाईची तीन दिवस चौकशी करण्यात आली होती. अहमदाबादमध्ये गोखले याच्यासोबतही त्याची चौकशी करण्यात आली आहे. अलंकार सवाई हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानला जातो. राहुल गांधी यांच्या संशोधन पथकाचा प्रमुख म्हणून त्याने काम केल्याचेही समजते.

ईडीने २५ जानेवारी रोजी साकेत गोखले यास अटक केल्यानंतर सवाई यासदेखील समन्स पाठविले होते. इंटरनेटद्वारे क्राउड फंडिंगमध्ये कथित आर्थिक अनियमिततेप्रकरणी तो गुजरात पोलिसांच्या ताब्यात होता. गोखले याने दिलेल्या माहितीनुसार, त्याने जमविलेले पैसे समाजमाध्यमांशी संबंधित कामे आणि अन्य कामांसाठी काँग्रेस पक्षासाठी अलंकार सवाई यास दिल्याचे गोखले याने सांगितले आहे. या घटनांबाबत सवाई याची चौकशी करण्यात आली आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यानुसार (पीएमएलए) त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे.