ब्रिटिशांचा कर्दनकाळ आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक

    04-Feb-2023
Total Views |
Raje Umaji Naik

उमाजी राजे यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला. न्यायाधीश जेम्स टेलर यांनी फाशीची शिक्षा सुनावली. नरवीर उमाजी राजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर गेले. दि. ३ फेब्रुवारी, १८३२ पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१व्या वर्षी त्यांचा श्वास संपल्यावरच मान खाली गेली.

"उमाजींचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून त्यातून आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. ते सर्वसामान्य लोकांत अत्यंत प्रिय असून त्यांना सर्व लोक साथ देत आहेत. त्यांना ब्रिटिश सत्ता रोखू शकली नाही, तर उमाजी राजे उद्याचे प्रति शिवाजी होऊ शकतात,” हे उद्गार आहेत ब्रिटिश कॅप्टन रॉबर्टसन यांचे. १८२०ला ‘ईस्ट इंडिया’कंपनीला पत्र लिहून या भावी धोक्याची सूचना तो देतो, यावरून उमाजी राजांच्या पराक्रमाची महाकाय ब्रिटिश साम्राज्यशाहीने किती धास्ती घेतली होती, हे लक्षात येते. मॉकीन टॉस म्हणतो, “उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती, तर त्याने स्वराज्याची स्थापना केली असती. एकदा स्वराज्याची स्थापना झाल्यावर त्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक आखणी करून सर्व कार्य सिद्धीस नेण्यासाठी उपक्रम आखणी केली असती, तर महाराष्ट्रात इंग्रजांना पाय पसरणे खूप कठीण झाले असते. एवढेच कशाला लालची फितुरांनी गद्दारी केली नसती तरी उमाजी राजेंना इंग्रज पकडूच शकले नसते.”

नरवीर उमाजी राजे नाईक या प्रचंड पराक्रमी विराने ब्रिटिशांविरूद्ध दिलेली झुंज किती मोठी? असा प्रश्न जर कोणी विचारला तर याचे उत्तर देण्यासाठी शब्द अपुरे पडतात. रामोशी बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांचे अपत्य उमाजी राजे यांची इतिहासकारांनी उपेक्षाच केली. कोण किती पराक्रमी? कुणाची राष्ट्रनिष्ठाकिती? यापेक्षाही कुणाची जात कोणती? यावरून त्या व्यक्तीचे गुणवैशिष्ट्ये वा क्षमतेचा विचार करणं ही आमच्या सामाजिक जीवनाला लागलेली कीड, तिचे दुष्परिणाम उमाजींना भोगावे लागले, हे या व्यवस्थेचे दुर्दैव. दादोजी खोमणे यांच्यावर पुरंदर आणि वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना ‘नाईक’ ही पदवी मिळाली होती. उमाजी उपजतच अत्यंत चलाख, मुत्सद्दी, बलदंड आणि जिद्दी होते.आपल्या जन्मदात्याकडून सर्व प्रकारचे शस्त्र प्रशिक्षण घेऊन त्यांनी त्यात पराकोटीचे प्रावीण्य मिळविले होते.


इंग्रज सत्तेने महाराष्ट्रात मुसंडी मारून पुणेही हस्तगत केले. त्यामुळे १८०३ मध्ये दुसरा बाजीराव पेशवा इंग्रजांचा मंडलिक होऊन पुणे सांभाळीत होता.त्याने सर्व किल्ल्याच्या स्वरक्षणाची जबाबदारी रामोशी समाजाकडून काढून आपल्या जवळच्या माणसाकडे दिली. पराक्रम व निष्ठेपेक्षाही जेव्हा आपली माणसं महत्त्वाची वाटतात. तेव्हा त्या सत्तेचा अस्त समीप आलेला असतो. पेशवाईचेही तेच झाले. काही कालावधीपर्यंत रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. गोर्‍यांचे काळे अत्याचार वाढतच चालले. तेव्हा स्वाभिमानी उमाजी पेटून उठले. शिवरायांचे प्रताप त्यांच्या डोळ्यापुढे तरळून गेले. माझ्या देशावर परकीयांचा अमल सहन केला जाणार नाही, अशी शपथ घेऊन इंग्रजांना धडा शिकविण्यासाठी रणगर्जना केली. विठोजी नाईक, कृष्णा नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळसकर या निवडक खंद्या वीरांनासोबत घेऊन त्यांनी अठरापगड जातीचे लोक जोडले. दि. २२ जुलै, १८२६ ला उमाजी नाईकांचा राज्याभिषेक कडेपठार, जेजुरी येथे करण्यात आला. छत्रचामर व अब्दागिर ही राजचिन्हे त्यांनी धारण केली.


इंग्रज सरकार, त्यांचे समर्थक सावकार, वतनदार अशा शोषकांना लुटून शोषितांना मदत करण्याचे सत्र त्यांनी सुरू केले. स्त्रियांवर झालेला अत्याचार निषिद्ध होता. अशा वासनांध नराधमांना त्यांच्या न्यायालयात कठोर शिक्षा असे. १८१८ मध्ये त्यांना एक वर्षांचा कारावास झाला. तेव्हा उमाजी राजे तुरुंगात लिहिणे-वाचणे शिकले. कारावास असा सत्कारणी लावता येतो, हा धडाच दिला त्यांनी समस्त राजबंद्याना व सामान्य कैद्यांनाही. उमाजी राजेंची ही प्रगती मॉकीनटॉस यांच्यासाठी खूप कुतूहलाचा विषय होता. कारावास संपल्यावर स्वातंत्र्याविषयी त्यांच्या भावना अधिक प्रज्वलित झाल्या. जनतेची साथ त्यांना मोठ्या प्रमाणात मिळत होती. त्यांचे सैन्य निसर्गाच्या सान्निध्यात गटागटाने राहत असे. एका तुकडीत पाच हजार सैन्य. थंड प्रदेशातील इंग्रज सैन्य उमाजी राज्यांच्या रणनीतीसमोर टिकूच शकत नव्हते.

बलाढ्य शत्रूला धूळ चारण्यासाठी त्यांना मनुष्यबळ व अर्थबळ कधीच कमी पडले नाही. कारण, शोषकांना लुटणे आणि शोषितांना संघर्षासाठी उभे करणे या शिवछत्रपतींच्या रणनीतीचा सूक्ष्म अभ्यास करून प्रत्त्यक्ष अवलंब केल्यामुळे इंग्रजांना जेरीस आणणे त्यांना शक्य झाले. त्यांचे विभागनिहाय सैन्यप्रमुख व दर्‍याखोर्‍यातील रांगडे सैनिक, त्यांच्या कामाचे वाटप, संपर्क, दळणवळण, ब्रिटिशांच्या गुप्त बातम्या व लोकांच्या समस्येसाठी हेरखाते या सर्वबाबी त्यांच्याआदर्श राजनीतीची साक्ष देत होत्या. १८२६ ते १८३१ पर्यंत उमजीराजेविरुद्ध चार जाहीरनामे इंग्रजांनी प्रसिद्ध केले. बक्षिसाची रक्कम प्रत्येक वेळेस वाढविली जात होती. मोठमोठ्या अमिशांचा भडीमार केला जात.पण, उमाजी राज्यांच्या रणनीतीसमोर इंग्रजांचा टिकाव लागत नव्हता. इंग्रज सैनिकांची मुंडकी कापून इंग्रज अधिकार्‍यांना नजराणा पेश केला जात होता, नरवीर उमाजी राजेकडून प्रत्येक वेळेस पराजय पदरी पडत असलेला पाहून गोरी माकडं लालबुंद होत होती.

दि. २४ डिसेंबर, १८३० ला आपला पाठलाग करणार्‍या इंग्रज अधिकारी बाईड आणि त्याच्या सैन्याला जेरीस आणण्यासाठी तोफाचा उपयोग केला जात होता. पण, गोफनीसारख्या अत्यंत नाममात्र मूल्यात प्राप्त होणारे हत्यार उमाजी राज्यांच्या सैन्यासाठी वरदान ठरले होते. अक्षरशः जंगलातील माकडं टिपावित तशी अत्यंत धूर्त मुत्सद्दी जगावर राज्य करणारी गोरी माकडं उमाजींचा गोफणीने टिपली जात होती. इंग्रज सैन्याला ही युद्धनीती अनभिज्ञ असल्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आणि प्रेक्षणीय झाली होती. इंग्रज राजवटीला पळता भुई थोडी करून टाकणारे नरवीर होते राजे उमाजीनाईक!

स्वतःला महापराक्रमी समजणार्‍या इंग्रजांना आव्हान देऊन दि. १६ फेब्रुवारी, १८३१ ला इंग्रज राजवटीविरोधात उमाजी राज्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. लोकांनी इंग्रजी नोकर्‍या सोडाव्या. सर्व राजे, रजवाडे, सरदार, जमीनदार, वतनदार देशवासीयांनी एकाचवेळी एकत्र येऊन इंग्रजांवर हल्ला करून त्यांना पळता भुई थोडी करावी. त्यांच्याविरोधात अराजकता निर्माण करून त्यांना शेतसारा, घरपट्टी देऊ नये. खजिने लुटून त्यांचे अर्थबळ नष्ट करावे, असे करणार्‍यास आमच्या सरकारकडून जहागिरी, इनामे व रोख बक्षिसे मिळतील. ज्यांची वंशपरंपरागत वतने तनखे इंग्रज सरकारमुळे गेले असतील ती त्यांना परत मिळतील. माझी खात्री आहे की, इंग्रज राजवट लवकरच संपेल व नव्या न्यायधिष्ठित राज्याची स्थापना होईल. इंग्रजांना कुणीही मदत करू नये, केल्यास त्याची गय केली जाणार नाही.

या जाहीरनाम्यात साम्राज्यशाहीला सणसणीत चपराक देऊन स्वदेशी बांधवात ‘स्वराज्यनिष्ठा’ व ‘आत्मनिर्भरता’ निर्माण करण्याची व्यापक शक्ती होती. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात साम्राज्यशाहीचा विस्तार व दहशत निर्माण होत असताना आपल्या जाहीरनाम्यातून भारतीयांच्या मनात एवढे आत्मभान व दुर्दम्य आशावाद निर्माण करून इंग्रजांच्या छातीचे ठोके वाढविण्याचे काम फक्त उमाजी राजेच करू शकत होते. त्यामुळे त्यांचा जाहीरनामा हा इतिहासातील सोनेरी पान ठरते व राजे आद्यक्रांतिकारक ठरतात. उमाजी राजे हे जनतेचे विश्वासू प्रिय राजे ठरले. इंग्रज सरकारची पार भंबेरी उडाली.

पाचवा जाहीरनामा काढण्यात आला. उमाजी राजेंना पकडून देणार्‍यास दहा हजार रुपये व ४०० बिघे (२०० एकर) जमीन देण्यात येईल. बक्षीस खूप मोठे होते. त्यावेळी लालची त्र्यंबक कुलकर्णी फितूर झाला व त्याने उमाजी राजेंची सर्व गुप्त माहिती सांगितली.रात्री बेसावध असताना त्यांच्यावर छापा मारून त्यांना बंदिस्त करून काळ्या कोठडीत ३५ दिवस ठेवण्यात आले. कॅप्टन माकनटॉसने उमाजी राजाची एक महिना भर माहिती संकलित केली आणि ती लिहून ठेवली.कारण, उमाजी राजांच्या लढा इंग्रजांसाठी जगावेगळे आव्हान होते. कदाचित फितुरांनी गद्दारी केली नसती व उमाजी राजेंनी केलेल्या आवाहनानुसार सर्वजण एकाच वेळी एकत्र येऊन लढा देऊ शकले असते, तर देशाला स्वातंत्र्य १९व्या शतकाच्या पूर्वार्धातच मिळाले असते. असो.....

उमाजी राजे यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला. न्यायाधीश जेम्स टेलर यांनी फाशीची शिक्षा सुनावली. नरवीर उमाजी राजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर गेले. दि. ३ फेब्रुवारी, १८३२ पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१व्या वर्षी त्यांचा श्वास संपल्यावरच मान खाली गेली. शेवटच्या क्षणापर्यंत इंग्रज सरकार समोर त्यांची मान ताठ होती. क्रांतिकारकांना दहशत बसावी यासाठी तीन दिवस त्यांचे प्रेत लटकवून ठेवण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार खुशाबा नाईक व बापू सोळकर यांनाही फाशी देण्यात आली. कोण देशद्रोही, कोण देशप्रेमी आणि कोण लुटारू?स्वातंत्र्यासाठी उठाव करणारा आद्यक्रांतिकारक आपल्याच मायभूमीत देशद्रोही ठरतो. सर्वांना एकत्र येऊन एकाच वेळी लढा देण्याचे आवाहन करणारा नरवीर. दुर्भाग्य आमच्यातील गद्दारांचे आणि घडणारे प्रकार निमूटपणे पाहणार्‍या शंडाचे, पण असे नामर्द तळपता स्वातंत्र्यसूर्य आपल्या गद्दार कारवायांनी दडपून टाकू शकत नाहीत. ब्रिटिश राज्यकर्त्यांना १४ वर्षं सळो की पळो करून सोडणार्‍या उमाजी नाईकाचा स्वातंत्र्यलढा पुढे सर्व सशस्त्र क्रांतिकारकांना प्रेरणा देत राहिला. अगदी स्वातंत्र्यप्रभा होईपर्यंत.


-प्रा. वसंत गिरी