राजस्थानच्या बारमेर खेड्यातून एक संस्था हस्तशिल्प तसेच तत्सम गृहोद्योग करून शेकडो घरे चालवते. तसे म्हंटले तर राजस्थानात हस्तशिल्प आणि कलाकुसर काही नवीन नाही. घराघरातून स्त्रिया हेच करताना दिसतात. मग 'ग्रामीण विकास एवं चेतना संस्थान'चे कार्य काय वेगळे?
७१ च्या सालात निर्वासित भारतभर पसरले तेव्हा राजस्थानात आलेल्या निर्वासितांनी ही कला येथील लोकांना विकून आपला चरितार्थ चालवला. त्यावेळेपासून स्त्रिया पडद्याआड राहून कलाकुसर करायची कामे करत तर या वस्तू बाजारात घेऊन जाऊन विक्रीचे काम पुरुष करत. आपसूकच येणार पैसे पुरुषांच्या हातात राहिला. व्यसने, बेरोजगारीची शिकार झालेले काही पुरुष मिळालेले पैसे घरी न देता स्त्रियांना मारहाण करत. अशावेळी दुर्बल आणि गरीब स्त्रियांना मुलाबाळांचे घर व चरितार्थ कसा चालवावा हे समजत नाही. या स्त्रियांसाठी गावातल्या गावात बाजारपेठ, प्रशिक्षण व संधी उपलब्ध करून दिली ती मूळची फॅशन डिझायनर असलेल्या डॉ. रुमा देवी यांनी.
७ जुलै १९९८ या दिवशी या आगळ्या समाजकार्याचे बीज प्रथम रोवले गेले. स्त्रियांना समृद्ध करायचे तर समाजाशी वाकडे घेऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे समाजव्यवस्था विस्कळीत करण्यासाठी कारणीभूत ठरेल. अशावेळी गावातल्या गावात त्यांना प्रशिक्षण देऊन कच्च माळ पुरवून त्यांच्याकडून सुंदर वस्तू बनवून घेतल्या जातात. त्यांना बाजारपेठ देऊन त्यांच्या हातातच मोबदल्याचे पैसे मिळतात. ग्रामीण भागात आजही जिथे वीज, पाणी आणि जीवनोपयोगी वस्तुंना घेऊन संघर्ष करावा लागतो, त्या खेडवळ भागात कलाकार महिलांना हस्तकलांच्या जोरावर रोजगार मिळवून देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. एकूण ७ सदस्य आणि २० जणांचा चमू एकत्रितपणे हे कार्य २४ वर्षे अविरत करीत आहे. २५० गावांतील ३० हजारांहून जास्त महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या महिलांकडून ५० हुन अधिक प्रकारच्या कला आणि २५ हुन अधिक कुसरी करवून घेतल्या जातात.
या उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी मोफत जागरूकता कार्यशाळा राबवल्या जातात. शिलाई मशीन तसेच सौर उर्जेवर चालणाऱ्या दिव्यांचे वाटप केले जाते. किमान शिक्षण असावे यासाठी गरजेपुरता वाचता व लिहिता यावे इतके शिक्षण दिले जाते. संपर्क वाढवण्यासाठी विपणन कार्यशाळा तसेच स्मार्टफोनचेही वाटप केले जाते. सर्व प्रकारच्या मोफत प्रशिक्षणासोबत आरोग्य तपासणी सुद्धा केली जाते. कोरोना महामारीच्या काळात या स्त्रियांनी अनेक उपक्रम हाती घेऊन अनेक उत्पादने बनवली.
रुमा देवी यांच्या कार्यासाठी व महिला सशक्तीकरण, रोजगार वर्धन, क्राफ्ट उत्थान, कला आणि संस्कृती संवर्धन, इत्यादी उपक्रमांमुळे १०० हुन अधिक पुरस्कार राष्टीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळाले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व पुरस्कार २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या काळात जाहीर झाले आहेत. महिला सबलीकरण व सशक्तीकरणासोबतच त्यांना डिजिटली साक्षर करून जगाच्या बाजारपेठेत आपल्या कलेच्या जोरावर उभे राहण्याचा आत्मविश्वास प्रदान केला तो रुमा देवी यांच्या प्रयत्नातून. त्यांच्या कारकिर्दीला आणि व्यक्तिमत्वाला दैनिक मुंबई तरुण भारत कडून अनेकानेक शुभेच्छा !