मेक इन इंडियाचा परिणाम भारतात ‘लाख’मोलाच्या नोकर्‍या

28 Feb 2023 18:47:49
apple-in-india-creates-1-lakh-jobs-in-19-months-under-pli-scheme


मुंबई
: एकीकडे जगभरात कामगार कपात होत असताना भारतात मात्र वर्षभरात अ‍ॅपल आणि त्या कंपनीच्या घटक पुरवठादारांनी एक लाखाच्या वर नोकर्‍या निर्माण केल्या आहेत. ‘मेक इन इंडिया’ला चालना दिल्याचा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे.अ‍ॅपल ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय हे अमेरिकेमध्ये असून, सध्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत या कंपनीमधून हजारो कमर्चार्‍यांची कपात करण्यात आली आहे. मात्र टेक्नॉलॉजी कंपनी असणार्‍या याच कंपनीने भारतामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये लाखाच्या वर नोकर्‍या निर्माण केल्या आहेत.

अ‍ॅपलने भारतामध्ये गेल्या 19 महिन्यांमध्ये तब्बल 1 लाख नवीन नोकर्‍या निर्माण केल्या आहेत. यानंतर ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये ब्ल्यू कॉलर जॉबची सर्वात मोठी निर्माती बनली आहे. भारतातील एक लाख नोकर्‍या या अ‍ॅपलच्या भारतातील प्रमुख विक्रेते आणि त्यांच्या पुरवठादारांनी निर्माण केल्या असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.


देशात सध्या मेक इन इंडिया अंतर्गत अनेक योजना राबविण्यात येत आहे. त्यामधीलच एक पीएलआय (प्रोडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह) अर्थात स्वदेशी उत्पादन वाढीला चालना देणे. ही योजना ऑगस्ट 2021 मध्ये सुरु करण्यात आली. आता ज्या नोकर्‍या निर्माण झाल्या आहेत त्या नोकर्‍या ही योजना लागू झाल्यानंतरचा परिणाम आहे. आय फोनच्या निर्मितीच्या विविध टप्प्यात असेंबल करणारे तीन विक्रेते आहेत. या तिघांनी मिळून 60 टक्के नवीन नोकर्‍या निर्माण केल्या आहेत.

उर्वरित नवीन नोकर्‍या या अ‍ॅपलच्या इकोसिस्टमद्वारे निर्माण केल्या आहेत. ज्यामध्ये कंपोनंट आणि चार्जर सप्लायर यांचा समावेश आहे. यामध्ये पुरवठादारांनी 40 हजार नोकर्‍या निर्माण केल्या आहेत. यामध्ये टाटा इलेक्ट्रॉनिकसह अन्य कंपन्यांचा समावेश आहे.अ‍ॅपल इकोसिस्टममधील तीन विक्रेते आणि कंपन्यांवर आधारित ही प्रक्रिया असून त्यांना सरकारी अधिकार्‍यांकडे नियमितपणे रोजगार आकड्यांची नोंदणी करणे आवश्यक असते.

टाटा इलेक्ट्रॉनिक्सने पुरेशा प्रमाणात कर्मचार्‍यांची नियुक्ती केली असल्याचे सांगितले जात आहे. हे अ‍ॅपलचे यांत्रिक भागांसाठी प्रमुख घटक पुरवठादार आहे. याशिवाय अन्य कंपन्यातही 11 हजार पेक्षा आधी कर्मचारी काम करत आहेत. याच प्रक्रियेतून येत्या पाच वर्षांमध्ये 2 लाखांहून अधिक थेट नोकर्‍या निर्माण होतील असा सरकारचा अंदाज आहे.


Powered By Sangraha 9.0