यांत्रिक गजराज करणार केरळच्या मंदिरातील विधी

28 Feb 2023 15:32:46
Kerala: India temple replaces elephant with robot for rituals

थ्रिसूर : गजराज म्हणजेच हत्तीला श्री गणरायाचे रुप मानले जाते. केरळातील बहुतांश मंदिरांच्या परिसरात भल्या मोठ्या गजराजच्या माध्यमातून धार्मिक विधी होत असतात. आता मात्र हे विधी यांत्रिक गजराज करणार आहेत.

प्राणिमात्रांचे नैतिक अधिकार आणि मूल्यांसाठी कार्यरत असलेल्या ‘पेटा’ या संस्थेने थ्रिसूर येथील मंदिराला नुकताच एक यांत्रिक हत्ती भेट दिला आहे. प्रत्यक्ष जीवंत असलेल्या हत्तीसारख्याच सर्व विधी या यांत्रिक हत्तीच्या मार्फत केल्या जातात. त्यामुळे भाविकही समाधानी असून पशुपक्षांच्या हक्कासाठी लढणार्‍या पेटा संघटनेनेही समाधान व्यक्त केले आहे.
 
ऐरवी केरळच्या मंदिरात होत असलेल्या विविध धार्मिक विधीत गजराज सहभागी होत असतात. हे दृश्य अनेक चित्रपटांतूनही दाखविण्यात येते. मात्र यापुढे प्रत्यक्ष गजराजऐवजी यांत्रिक हत्तीच्या साहाय्याने मंदिरातील विधी होणार आहेत.

वास्तविक हत्ती हा निसर्गात रमणारा महाकाय प्राणी असून त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करुन त्याच्याकडून धार्मिक विधी करुन घेणे जसे एखाद्या मूर्तीची पूजा, त्या मूर्तीवर जल शिंपडणे, पुष्पवृष्टी हे सर्व विधी हत्तीकडून करुन घेताना त्यास वेदना दिल्या जात असल्याच्या तक्रारी ‘पेटा’ ने केल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून त्यांच्याच संघटनेने थ्रिसूर येथील श्री कृष्ण मंदिराला हा यांत्रिक हत्ती भेट दिला आहे.
 
आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने या मंदिराला नुकतीच भेट दिली तसेच या यांत्रिक हत्तीचा व्हिडिओ सोमवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी ट्विट करुन ‘प्राणिमात्रांवर प्रेम करण्यासाठीचा आणखी एक मार्ग, प्राणिमात्रांचे रक्षण करा, खर्‍या हत्तींना निसर्गाच्या सानिध्यातच जगू द्या, असे आवाहनही केले आहे. सिध्दार्थच्या या व्हिडिओला मोठ्या संख्येने लायक्स मिळत आहेत.
 
पेटाने मंदिराला भेट दिलेल्या यांत्रिक हत्तीचे नाव इरिनजाडापील्ली आहे, या व्हिडिओत मंदिराचे पुजारी राजकुमार नमबुत्री दिसत असून दक्षिण भारतात हत्तीचे असलेले महत्त्व यापुढे यांत्रिक हत्तीच्या माध्यमातून पूर्ण केले जाणार असून त्यास भाविकांचीही अनुमती मिळाली असल्याचे म्हटले जाते.



Powered By Sangraha 9.0