प्रचंड श्रमशक्ती असूनही तुटपुंज्या पायाभूत सुविधांचा गरीब देश अशी पूर्वी भारताची जगात प्रतिमा होती. पण, आज हिंदुस्थान सशक्त अर्थशक्ती म्हणून उदयास येत आहे. स्थिर राजकीय सरकार, सूक्ष्म आर्थिक सुधारणा, डिजिटलायझेशन तसेच दळववळण, पाणी, वीज यातील प्रगतीसह मुक्त आर्थिक धोरण यामुळे देश विकासाचा नवोन्मेष धारण करत आहे.
२०२३ हे वर्ष भारताला जगातील सर्वात मजबूत अर्थशक्तीचा देश म्हणून प्रस्थापित करण्यास सिद्ध होत आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा दूरदृष्टीचे नेतृत्व आणि स्थिर सरकार हे विकासाला पूरक आहे. म्हणूनच वेगाने वाढणारी मजबूत आर्थिक वाढ, सूक्ष्म आर्थिक सुधारणा आणि बदललेल्या भू-राजकीय वातावरणाचा एकत्रित परिणाम म्हणून भारत झपाट्याने आर्थिक स्थिरता, विकास आणि समृद्धीकडे आगेकूच करत आहे.
पाश्चिमात्य देशांसह अनेक देशांची लोकसंख्या झपाट्याने वृद्धत्वाकडे झुकत असताना, भारत हा तरुणांचा देश आता सर्वाधिक श्रमक्षमतांचाही देश ठरला आहे. त्याचे दृश्य सकारात्मक परिणाम उत्पादकतेवर दिसतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नोंदवलेल्या निष्कर्षात भारताची वार्षिक आर्थिक वाढ या वर्षी सरासरी साडेसहा टक्के असेल आणि ती ३० प्रमुख अर्थशक्ती असलेल्या देशांच्या तुलनेत सर्वाधिक वेगवानही ठरणार आहे. गेल्याच वर्षी भारताने युनायटेड किंग्डमला जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून मागे टाकले, तर २०२५ पर्यंत भारत अर्थव्यवस्थेच्या विकासात जर्मनीच्या चौथ्या स्थानाच्या बरोबरीत येण्याइतका सक्षम होईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे,
त्यामुळे वेगाने अर्थव्यवस्था विकासित होण्यार्या देशांच्या यादीत भारत आपले स्थान निर्माण करतोय. अशाप्रकारे ’सूक्ष्म आर्थिक सुधारणा’ स्थिर राहिल्यास, त्या अर्थव्यवस्थेची पुरवठा बाजू तयार करतात. नेमके येथेच भारताने विलक्षण प्रगती साधली आहे. विकासाचा रथ दळवणवळाच्या राजमार्गावरुन धावत असतो. अलीकडच्या वर्षांत, देशात असंख्य भव्य नवीन द्रुतगती महामार्ग तयार झाले आहेत. अनेक महामार्ग निर्माणाधीन आहेत. २०१४ ते २०१९ दरम्यान देशातील राष्ट्रीय महामार्गांचा किलोमीटरप्रमाणे ४५ टक्क्यांनी विस्तार झाला. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून, विमानतळांची संख्याही दुप्पट झाली आहे. ग्रामीण रस्त्यांची संख्या ८५ टक्के इतकी वाढली. विकासाला विद्युलतीची गती वीजप्रकल्पाने मिळते. गेल्या पाच वर्षांत देशातील वीज प्रकल्पांची क्षमता ६६ टक्क्यांंनी वाढली आहे. त्यामुळे विकासातील ’ब्लॅकआऊट’ अडथळे मोदीपर्वात दूर झाले.
मालवाहतुकीचे भक्कम आणि जलद जाळे विकासाला चैतन्य प्रदान करते. पूर्वी रेल्वेद्वारे मालवाहतूक केली जात असे, तेव्हा मालगाड्या निश्चित वेळापत्रकाशिवाय सरासरी २५ ते ३० किलोमीटर प्रतितास वेगाने धावत. आता वेगवान ’लोकोमोटिव्ह’वर विकास स्वार होऊन घोडदौड सुरु आहे. सध्या मालवाहतूक करणार्या ’लोकोमोटिव्ह’ ४५ गाड्या ८० किलोमीटर प्रतितास वेगाने धावत आहेत. उच्चक्षमतेच्या विद्युत रेल्वे कंटेनर गाड्या बंदरांशी जोडल्या जात असल्याने पूर्वीच्या नियमित मार्गांच्या तुलनेत निम्म्या वेळेत मालवाहतूक करतात. नवी दिल्लीपासून मुंबईपर्यंत अशा अतिजलद दीड किलोमीटर लांब रेल्वेगाड्यांवर ’डबल लोड’ केलेले डब्बे मालवाहतूक करतील. यातून समृद्धीचा नवा लोहमार्ग तयार होत आहे, हे निश्चितच विकासाचे द्योतक ठरावे. असाच एक लोहमार्ग ’पूर्व कॉरिडोर’ कोलकात्यापर्यंत लवकरच विस्तारणार आहे.
रस्ते, वीज आणि दळणळणाच्या सोईंसह देशात गेल्या तीन वर्षांत पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा झालेल्या घरांची संख्या अंदाजे तिप्पट म्हणजे १०८ दशलक्ष इतकी झाली आहे. देशवासीयांचे राहणीमानही हळूहळू सुधारत आहे. भारताचे नागरिक ’डिजिटलायझेशन’ व्यवहाराला जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग म्हणून स्वीकारतोय. आधीचे सरकार असताना सुरू केलेले ’फ्रंट कॉरिडोर’ सारखे अपूर्ण प्रकल्प मोदी सरकारच्या काळात पूर्ण होत आहेत. तरुणाई उद्यमशील होताना ‘स्टार्टअप’मध्ये आता १००हून अधिक ‘युनिकॉर्न’चा समावेश झालेला दिसतोय. ‘स्टार्टअप’मधून एक दशलक्षापेक्षा अधिक किमतीचे नवीन व्यवसाय मोदी सरकारच्या काळातील विकासपर्वाचा वेगच अधोरेखित करतात.
भारताला मजबूत आर्थिक राष्ट्र म्हणून घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’मेक इन इंडिया’ला गती दिली. तिची मधुर फळे लवकरच दिसणार आहे. जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी मुक्त व्यापार सौद्यांचा मोठा वाटा असतो. नुकतीच संयुक्त अरब अमिराती आणि ऑस्ट्रेलियासोबतचे व्यापार करार अंमलात आले. आता ब्रिटनशी मुक्त व्यापारासंबंधी चर्चा सुरू असून लवकरच तोही मार्गी लागणार आहे.
अमेरिकेतील बायडन प्रशासनाने म्हटले आहे की, चीन आणि रशिया या दोन राष्ट्रांमधील आर्थिक महासत्ता होण्याची तीव्र स्पर्धा लागली असूनही भारतातील स्थिर राजकीय स्थितीमुळे हा देश ‘अर्थशक्ती’ म्हणून उदयास येत आहे आणि विकासाचा हा नवोन्मेष प्रगतिपथावर नेत आहे.
-निल कुलकर्णी