संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १८ एकर जागा विकासकामांना

27 Feb 2023 19:20:05
 
 

ghodbunder road 

 
 
मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रीय वन्यजीव मंडळ अर्थात एनबीडब्ल्यूएलने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये असलेली १८ एकर जागा विकासप्रकल्पांसाठी देण्याची मंजुरी दिली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी कोलशेत ते भायंदरपाडा येथे सर्विस रोड उभारण्यात दिड एकर जंगल क्षेत्र जाणार आहे.

तर, दुसरीकडे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत दोन मोठ्या विद्युत वाहिन्या हलवण्यात येणार आहेत. ज्यामध्ये १६.७ एकर जंगल क्षेत्र वापरले जाईल. २७ जानेवारी रोजी एनबीडब्ल्यूएलने या विषयीचा अंतिम निर्णय घेतला असून या प्रकल्पांतर्गत येणारे क्षेत्रात नजीकच्या काळात मोठे परिवर्तन घडून येणार आहे. विरार अलिबाग मल्टि-मॉडेल कॉरिडोर आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर या प्रकल्पांचे बांधकाम सुरू असून हे वन्यजीवांच्या सुरक्षेबद्दल चिंता निर्माण करणारे आहे.
 
 
दुसरीकडे हे प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वरमधून जाणाऱ्या मोठ्या आणि महत्वाच्या वाईल्डलाईफ कॉरीडोरला धक्का पोहोचवणार आहे. घोडबंदर रोडच्या पलीकडे असलेल्या एसजीएनपी आणि तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य दरम्यान प्रवास करणाऱ्या वन्यप्राण्यांना सुरक्षित रस्ता मिळावा यासाठी सर्व्हिस रोडच्या सर्व कल्व्हर्टचे रुंद बॉक्स कल्व्हर्टमध्ये रूपांतर करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिकेला बोर्डाने दिले आहेत. घोडबंदर रोडच्या कडेला काटेरी तारांच्या साहाय्याने सिमेंट काँक्रीटची भिंत बांधण्याची सूचनाही ठाणे महानगरपालिकेला देण्यात आली आहे जेणेकरून वन्यप्राण्यांना येणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात प्रवेश होऊ नये. या बांधकामांची नेमकी ठिकाणे एसजीएनपीच्या मुख्य वनसंरक्षकाद्वारे ओळखली जातील.
Powered By Sangraha 9.0