संस्कृतींना सांधणारा भावसेतू

26 Feb 2023 20:34:08
Interview with leena sohoni

माणसं, त्यांची जीवनपद्धती, त्यावर आधारलेली विचारपद्धती एका समूहापुरती न राहता गावं देश जोडत गेली. वाचनसंस्कृतीचा वारसा आपल्याला लाभला आहेच, तो समृद्ध केला अनुवादित साहित्याने. भाषांतरानेही जागतिकीकरण होतं. मूल्यांची, विचारांची देवाणघेवाण होते. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून जेष्ठ अनुवादक लीना सोहोनी यांच्याशी केलेली ही खास बातचीत.


सांस्कृतिक संबंध असलेला मजकूर एका भाषेतून दुसर्‍या भाषेत अनुवादित करायचा झाल्यास, दुसर्‍या भाषेत त्यासाठी शब्दच उपलब्ध नाहीत, असे कधी झाले आहे का?

प्रत्येक भाषेवर स्थानिक वातावरणाचा, तिथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा प्रभाव असतो. उदाहरणार्थ, मराठीमध्ये ‘माठ’, ’घट’ ,’कलश’ ,’घडा’, ‘घागर’ असे अनेक शब्द असून ते निरनिराळ्या संदर्भात जिथे आणि जसे चपखल बसतील तसे वापरण्यात येतात. त्या सर्वच शब्दांना इंग्रजीमध्ये समानार्थी शब्द 'POT' हा आहे. 'POT' म्हटल्याने कदाचित ’घट’ किंवा ’घडा’ हा अर्थ व्यक्त होईलही. पण ’कलश’चा खरा अर्थ कळणार नाही. ’कलश’ याचा अर्थ पाण्याने भरलेली आणि पूजेत वापरली जाणारी घागर. कलश हा नेहमी ‘मंगल’ कार्यातच वापरण्याची प्रथा आहे. पण इंग्रजी भाषेतील समाजात ’पूजाअर्चा’ ही संकल्पना नाही. म्हणूनच ’कलश’ म्हणजे नेमकं काय हे सांगायला शब्दच नाही.

‘तुळशी वृंदावन’ हा एक असाच सांस्कृतिक संदर्भ असणारा शब्द आहे. मुळात ‘तुळस’ या शब्दाशी भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे जे अनेक संदर्भ जोडलेले आहेत, ते ‘इरीळश्र’ या शब्दातून व्यक्त होऊच शकत नाहीत.‘काकस्पर्श’ हा एक असाच शब्द आहे. जिथे पुनर्जन्माची संकल्पनाच अपरिचित आहे, तिथे मृत व्यक्तीचा आत्मा ऐहिक गोष्टींमध्ये गुंतून पडण्याची, किंवा त्या आत्म्याला मुक्ती मिळण्याची संकल्पनाही परकीयांना समजायला कठीणच! असे अनेकदा घडते.

संस्कृती किंवा विचारपद्धतीच्या भिन्नतेमुळे अनुवाद करताना एकंदर मजकुराचा अर्थच बदलू शकतो, उदा, भारतीय संस्कृतीतील मूल्ये आणि पाश्चात्य मूल्ये यात मोठा फरक आहे. अशावेळी शब्दशः भाषांतर करावं की नीतिमूल्यांचा विचार करावा?

एखाद्या साहित्याचा अनुवाद करत असताना संहितेशी १०० टक्के प्रामाणिक राहायचं, त्यात जराही बदल करण्याचं स्वातंत्र्य घ्यायचं नाही आणि त्याचवेळी तो अनुवाद सहज, स्वाभाविक, प्रवाही आणि प्रत्ययकारीही वाटला पाहिजे. हे साध्य करणं निश्चितच अत्यंत अवघड काम आहे. म्हणजे थोडक्यात शब्दश: भाषांतर करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. येथे अनुवादकाला लेखकाची वस्त्रे चढवावी लागतात. तो शब्दप्रभू आणि सर्जनशील असावा लागतो. त्याला त्या स्रोत भाषेतील साहित्यकृतीची लक्ष्य भाषेत अक्षरश: पुनर्निर्मिती करावी लागते.

एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करत असताना अनुवादकाचे त्यामागे दोन हेतू असू शकतात. एक तर तो अनुवाद संशोधनात्मक कामासाठी केलेला असतो. अशावेळी अर्थातच अनुवादकाला थोडंसुद्धा स्वातंत्र्य घेऊन चालत नाही. जे काही आहे ते तसंच्या तसं अनुवादातून वाचकांसमोर ठेवावं लागतं. उदाहरणच द्यायचं झालं, तर ‘अरेबियन नाईट्स’ची बरीच भाषांतरं आहेत. पण रिचर्ड फ्रान्सिस बर्टन या अनुवादकाने केलेलं भाषांतर हे मूळ साहित्यकृतीशी प्रामाणिक आहे असं मानण्यात येतं.
 
मी लहानपणी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी केलेला ‘अरेबियन नाईट्स’चा मराठी अनुवाद वाचला होता. तो लालित्यपूर्ण तर होताच, तसंच तो मुलांच्या मनोरंजनासाठी असल्याने त्यात अश्लीलता नावालाही नव्हती. असा अनुवाद हा केवळ सर्वसामान्य रसिक वाचकांच्या मनोरंजनासाठी केलेला असतो. भारतीय संस्कृती आणि पाश्चात्त्य संस्कृती या दोन्हींमध्ये जो मूलभूत फरक आहे तो अशावेळी अनुवादकाने नजरेआड करून चालत नाही. अशा अनुवादाला नुसता ‘अनुवाद’ असं न म्हणता त्याचा उल्लेख ‘स्वैर अनुवाद’ म्हणून करणे हा एक मार्ग आहे. वाचकाला अनुवाद वाचत असताना अवघडल्यासारखे होऊ नये आणि त्या साहित्याचा निखळ आनंद घेता यावा एवढाच त्याचा हेतू असतो.

मला स्वत:ला एक अनुवादक म्हणून अशा प्रकारचं स्वातंत्र्य घेणं पटत नाही. पण त्याचबरोबर जर एखादी कलाकृती माझ्या मध्यमवर्गीय संवेदनशील आणि परंपराप्रिय मनाला फार धक्कादायक वाटत असेल, तिचा अनुवाद करताना त्यातील अश्लीलतेमुळे अवघडल्यासारखं वाटणार असेल, तर मी ते अनुवादाचं काम अंगावर घेतच नाही. मी हा मार्ग मी माझ्यापुरता शोधून काढलेला आहे.


भाषांतर आणि अनुवाद यातला फरक काय?

भाषांतर म्हणजे शब्दाला प्रतिशब्द देणं, भावार्थाला प्राधान्य न देणं!मूळ भाषेतील भावाला, तेही दुसर्‍या कुणाच्यातरी मनातील भावाला, केवळ भाषेचंच नव्हे तर संपूर्ण संस्कृतीचं अंतर पार करून पैलतीराला पोहोचवणं, म्हणजे उत्कृष्ट अनुवाद. थोडक्यात मूळ साहित्यकृतीतील जीवनाशय (Content) आणि जीवनचैतन्य (Spirit) परकीय भाषेमध्ये जीवंतपणे संक्रमित करणारी अनुवाद ही प्रक्रिया असते. शब्दानुवाद, भावानुवाद, छायानुवाद, सारानुवाद, व्याख्यानुवाद, वार्तानुवाद, आदर्शानुवाद आणि रूपांतर असे काही अनुवादाचे प्रकार आहेत.


अनुवाद करताना अनुवादकाचे अंतरंग त्यात उतरतं किंवा मूळ लेखकाचा विचारासोबत क्वचित छेडछाड होते. ते कितपत योग्य आहे?

अनुवादकाने नेहमी निर्मोही किंवा अलिप्त असलं पाहिजे. मूळ साहित्यकृती ही दुसर्‍या कुणाचीतरी ‘इंटिलेक्च्युअल प्रॉपर्टी’ असून त्यात आपल्या विचारांचं प्रतिबिंब पडू देण्याचा, आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पडून देण्याचा आपला अधिकार नाही, याचा विसर अनुवादकाला कधीच पडता कामा नये. अनुवादकाच्या मनाची स्थिती नेहमीच दोलायमान असते. एकीकडे आपल्या मनातील भावभावना व्यक्त करण्याची जबरदस्त इच्छा, तर दुसरीकडे दुसर्‍या व्यक्तीच्या विचार आणि भावभावनांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी. या दोन्ही भावनांमधील तारेवरची कसरत त्याला करायची असते, तीही स्वत:च्या मनाचा समतोल आणि अनुवादासाठी हाती घेतलेल्या साहित्यकृतीविषयीची एकनिष्ठा अजिबात ढळू न देता. आपण लेखक व वाचक यांच्यामधला केवळ सेतू आहोत, हे अनुवादकाने नेहमी लक्षात ठेवायचं असतं. मूळ संहितेशी प्रामाणिक राहून अनुवाद करणं ही अनुवादकाची नैतिक जबाबदारी आहे.


तुम्ही इतकी वर्षे अनुवाद करताय, अनुवाद करताना होणारी शब्दांची, आशयाची किंवा अन्य अशी एखादी सरमिसळ झाल्यासंबंधीचा एखादा प्रसंग अथवा उदाहरण सांगता येईल का? त्यांचे परिणाम काय होऊ शकतात?
माझ्या स्वत:च्या हातून असा प्रकार कधीही घडलेला नाही, परंतु चुकीच्या अनुवादातून झालेल्या गोंधळाचं एक उदाहरण सुप्रसिद्ध आहे. जगप्रसिद्ध जर्मन कंपनी ‘मर्सिडीज बेन्झ’च्या नावाचा जेव्हा चिनी भाषेत अनुवाद करण्यात आला, तेव्हा ‘बेन्झ’चं झालं ‘बेन्सी’ आणि बेन्सी याचा अर्थ चिनी भाषेत होता "Rush to die'!( मरण्यासाठी त्वरा करा!) साहजिकच कोणत्याही कार कंपनीच्या नावातच जर असं असेल, तर कठीणच परिस्थिती ओढवायची की! मग ते नाव बदलून घाईघाईने ‘मर्सिडीज बेन्ची’ असं करण्यात आलं. त्याचा अर्थ होता "Run quickly as if flying' ( जणू काही गगनभरारीच घेत असल्यासारखं धावा!)


भाषा आणि वाचनसंस्कृतीच्या संदर्भात बोलायचे झाल्यास भाषांतरित साहित्याची गरज काय आहे, असे तुम्हाला वाटते?

अनुवाद ही खरं तर जगाची खिडकी आहे. यातूनच जगभरातील माहिती आणि ज्ञानविज्ञानाची प्रकाशकिरणं आपल्या घरात येऊ शकतात. अनुवादित साहित्य हे देश व काळाच्या सीमा ओलांडून, दुसर्‍या प्रदेशात राहाणार्‍या, दुसरी भाषा बोलणार्‍या लोकांना मूळ कलाकृती वाचल्याचा आनंद देते. प्रसारमाध्यमे जेव्हा जगभरातील घडामोडी आपल्यापर्यंत आणून पोचवतात, त्या कशाच्या माध्यमातून? अनुवादाच्याच! अनुवादातूनच राष्ट्राराष्ट्रांमधील समाजकारण, अर्थकारण, राजकारण व इतर असंख्य क्षेत्रातील प्रगतीची माहिती जगभरातील लोकांपर्यंत पोहोचू शकते.

 
अनुवादित साहित्याकडे आजही साहित्यप्रवाहात दुय्यम दृष्टिकोनातून बघितले जाते. त्याविषयी काय सांगाल...
 
मी जेव्हा ३५ वर्षांपूर्वी अनुवादाच्या कामाला सुरवात केली तेव्हा साहित्याच्या यात्रेत आम्हा अनुवादकांची अवस्था रेल्वेच्या फूटबोर्डवरून प्रवास करणार्‍या प्रवाशासारखी होती. पण आज चित्र बरंच पालटलंय. अनुवादाचं काम म्हणजे खरं तर सर्जनशील प्रतिभेने केलेली पुनर्निर्मिती आहे, ते नुसतं अनुवादाचं काम नसून ‘अनुसर्जना’चं काम आहे आणि अनुवादकाला त्यासाठी किती अपरंपार कष्ट घ्यावे लागतात, हे हळूहळू लोकांना पटू लागलेलं आहे. जे लोक पूर्वी मला अनुवादाचं हे काम बंद करून त्या ऐवजी स्वत:चं काहीतरी चांगलं लिहिण्याचा सल्ला देत, तेच लोक आज माझे अनुवाद आवडीने वाचतात. सुधा मूर्तींनी तर अनेकदा जाहीरपणे असे उद्गार काढले आहेत की, ‘हे पुस्तक आमचं दोघींचं आहे. मी जर देवकी असले, तर लीना यशोदा आहे.’ मला त्यांचे हे उद्गार कोणत्याही पुरस्कारापेक्षा अधिक मोलाचे वाटतात.


अनुवादकांसाठीचे काही प्रशिक्षण किंवा अनुवाद कला कशी अवगत करावी....?

विश्व मराठी परिषदेतर्फे वेळोवेळी नवोदित अनुवादकांसाठी, तसेच या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणार्‍यांसाठी कार्यशाळा भरवण्यात येते. मी स्वत: त्यात मार्गदर्शक म्हणून काम करते. अनुवाद या विषयासाठी अनेक अभ्यासक्रम भारतात उपलब्ध असून त्यांची माहिती इंटरनेटवर मिळू शकते. मी अनुवादाची तंत्रं आणि मंत्र शिकवणारं पुस्तक लिहिलेलं असून ‘मेहता पब्लिशिंग हाऊस प्रा. लि.’ यांच्या तर्फे ते लवकरच प्रसिद्ध होणार आहे.



Powered By Sangraha 9.0