कोल्हा काकडीला राजी...

26 Feb 2023 20:31:26
Editorial on uddhav-thackeray-arvind-kejriwal-meet
 
जे उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या हातचे शिवबंधन टिकवू शकले नाहीत, ते आता मोदीविरोधकांच्या महागठबंधनाची गाठ घट्ट करण्याची भाषा करू लागले. याकुब मेमनचे समर्थन ते आता खलिस्तानवाद्यांना पाठीशी घालणार्‍या केजरीवालांच्या ‘मातोश्री’वारीने, ठाकरेंची चुकलेली राजकीय दिशा आणि दशाच पुनश्र्च अधोरेखित होते.

एकदा एक कोल्हा मळ्यात गेला. द्राक्षासह त्याने इतर अनेक फळे न्याहळली. पण, मांडवावर ती उंच असल्यामुळे त्या फळांची आशाच कोल्ह्याने सोडून दिली. अखेरीस एका वेलावरुन जड असल्यामुळे जमिनीवर पडलेल्या काकडीवरच या कोल्ह्याने भूक भागवली. म्हणजेच काय तर कोल्हा काकडीवरच मुकाट्याने राजी झाला. अर्थात, मोठा पराक्रम गाजवून पदरात लाभ पाडून घेण्याची क्षमता नसेल, तेव्हा आटोक्यात येईल तेवढ्यावरच समाधान मानावे, हा त्यामागचा बोध आणि सध्या अशीच काहीशी गत उद्धव ठाकरे यांचीही झालेली दिसते. शिवसेना शिंदेंची झाल्यापासून मागेल त्याला ‘मातोश्री’त प्रवेश, म्हणून संधीसाधूंच्या राजकीय भरतीला ऊत आला. त्यातूनच हिंदुत्वद्वेष्ट्या सुषमा अंधारेपासून ते प्रकाश आंबेडकरांपर्यंत ठाकरेंनी आपली राजकीय कूस उजवण्याचा प्रयत्न केला.


आपल्यासोबतची कर्तबगार लोकं सोडून गेली, तर त्यांची जागा भरायला ठाकरेंनी चक्क कर्तृत्वशून्यांची मेगाभरती केली. पण, हे करताना ठाकरेंनी केवळ संख्यात्मक विस्ताराला प्राधान्य दिले. त्यामुळे शिवसेनेच्या मूळ विचारधारेशी शेकडो मैल दूर असलेल्या आणि प्रसंगी शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या विचारांना कस्पटासमान लेखणार्‍यांनाही ठाकरेंनी अगदी मांडीवर बसवले. तात्कालिक राजकीय लाभापोटी हिंदुत्वाची विचारसरणी, भगवा झेंडाही ठाकरेंनी असाच धुडकावला. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी सहभागी होण्याच्या निर्णयापासून खरंतर ठाकरेंचा आणि शिवसेनेचा २०१९ सालीच हा उलटा प्रवास सुरु झाला होता.

शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही हिंदुत्वाच्या, भगव्या ध्वजाच्या आणि मराठी माणसाचे हित या तीन पायांवर अगदी भक्कमपणे उभी होती. बाळासाहेबांनी त्यांच्या अख्ख्या हयातीत यापैकी एकाही मुद्द्याशी तसूभरही फारकत घेतली नाही. सत्ता नसेल तरी ठीक, पण या सत्तेसाठी नसत्या तडजोडी, लांगूलचालनाचा लाळघोटेपणा बाळासाहेबांनी कदापि केला नाही की शिवसेनेत तसा तो कोणाला करुही दिला नाही. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाच्या सूत्रावरच शिवसेनेची मदार होती. परंतु, बाळासाहेबांच्या सुपुत्राने केवळ आणि केवळ खुर्चीसाठी शिवसेनेसह शिवसेनाप्रमुखांचे विचारही गहाण टाकले. त्यामुळे “खुर्चीचा मोह मला नाही,” असे ठामपणे सांगणारे बाळासाहेब आणि आज त्याच खुर्चीपोटी अख्खी शिवसेना हातातून गमावून बसलेले उद्धव ठाकरे... जे जे बाळासाहेबांनी नाकारले, शिवसेनेपासून कायम दूर ठेवले, ते ते सगळे उद्धव ठाकरेंनी विचारशून्यतेने कवेत घेतले. बाळासाहेबांचे सोनिया गांधी आणि शरद पवारांविषयीचे विचारही म्हणा सर्वश्रुत.


 “शरद पवारांसोबत निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली तर आपल्या मतदारांना काय उत्तर देणार,” असा प्रश्न उपस्थित करुन जनतेप्रतिची आपली बांधिलकी बाळासाहेबांनी अखेरच्या क्षणापर्यंत कायम जपली. पण, उद्धव ठाकरेंनी अख्खी शिवसेनाच पवारांच्या दावणीला बांधली. बाळासाहेबांनी “मी माझ्या शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही आणि तसे झाले तर मी माझे दुकान बंद करीन,” अशी राणाभीमदेवी गर्जना केली. पण, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची काँग्रेस करुन, त्याच्या मुळावरच आघात केला. बाळासाहेबांनी जे जे त्याज्य केले, नेमके ते ते सगळेच उद्धव ठाकरेंनी आपलेसे केले. त्यामुळे शिवसेनेतील हिंदुत्वाचा आत्माच महाविकास आघाडीच्या स्थापनेबरोबर तडफडू लागला होता.


अजान स्पर्धेचे आयोजन आणि दिनदर्शिकेत बाळासाहेबांपुढे ‘जनाब’ छापून तर मुस्लीम मतांच्या बेगमीसाठी ठाकरेंनी हद्दच केली. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकुबचे समर्थन करणार्‍या अस्लम शेखला मंत्रिमंडळात स्थान दिले. त्याच्या कबरीचे सुशोभीकरण, मुंबईत उद्यानाला टिपू सुलतानचे नाव, अशी ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेनेच्या आत्मघातासाठी जबाबदार ठरलेल्या निर्णयांची एक लांबलचक यादीच देता येईल. पण, शिवसेनेच्या अध:पतनासाठी जबाबदार ठरलेल्या त्या अडीच वर्षांतून दुर्दैवाने ठाकरेंनी कोणताही धडा न घेता, आततायीपणे निर्बुद्ध निर्णयांचा धडाका सुरुच ठेवलेला दिसतो. ज्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना बाळासाहेबांनी परम आदर-सन्मान दिला, त्याच बाबासाहेबांच्या चारित्र्यावर ‘संभाजी ब्रिगेड’सारख्या विखारी संघटनेबरोबर उद्धव ठाकरेंनी मित्रत्वाचा हात पुढे केला. तशीच अवस्था प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीचीही!
 
राज्यात जसे शिल्लकसेनेला तगवण्यासाठी निरुपयोगींना जवळ केले, तसेच राष्ट्रीय राजकारणातील मोदीद्वेष्ट्यांसाठी ‘मातोश्री’चे दरवाजे ठाकरेंनी सताड खुले केले. खरंतर ज्या नेत्याचे प्रादेशिक अस्तित्वच खालसा झालेले, त्याने तोंड वर करुन दिल्लीला डोळे दाखवणे ही म्हणा राजकीय अपरिपक्वताच! पण, तीच उद्धव ठाकरेंच्या अंगी अगदी ठासून भरलेली. त्यामुळे केवळ ‘ठाकरे’ नावाचे एकच वलय सध्या शिल्लक असल्यामुळे मोदीद्वेष्ट्यांची मांदियाळी ‘मातोश्री’च्या अंगणात अधूनमधून असा किलकिलाट करु लागली. केजरीवाल आणि आम आदमी गँग ही त्यापैकीच एक. तिथे पंजाबात खलिस्तानवाद्यांनी पुन्हा उच्छाद मांडला असताना, मानसाहेब मुंबईत माना डोलवताना दिसले. कारण, ‘आप’चा खलिस्तानवाद्यांना छुपा पाठिंबा असल्याचे यापूर्वीही उघड झाले आहेच. पण, ठाकरेंना त्याच्याशी काही देणेघेणे नाही.

भाजपचा विरोध हाच या सगळ्या असंतुष्टांना जोडणारा एक समान धागा. त्यामुळे मग केजरीवालांनीच केलेला राजकारणातील घराणेशाहीला विरोध असो वा ‘आप’च्याच मुंबईतील नेत्यांनी पालिकेतील भ्रष्टाचाराचा लावून धरलेला मुद्दा, यांसारखे विषय मग ठाकरेंसाठी एकाएकी गौण ठरावे. त्यामुळे केजरीवाल-मान कुठून आले, यापेक्षा त्यांचा अन् माझा शत्रू एकच, हीच भावना भाजपद्वेषाने पछाडलेल्या उद्धव ठाकरेंना अधिक सुखावून गेली.असो. ज्या मोदींच्या नावे २०१९च्या विधानसभा, लोकसभा निवडणुका शिवसेनेने जिंकल्या, आज त्याच मोदीविरोधकांसाठी ‘मातोश्री’ हे मुंबईतील विश्रामगृह ठरावे, हीच खरी शोकांतिका. पण, खरंतर अशा समदु:खी विरोधकांकडून ठाकरेंना केवळ आणि केवळ आता सहानुभूतीच मिळू शकते. त्यापलीकडे राजकीय पटलावर शिवसेनाच आता ठाकरेंची नसल्यामुळे त्यांची उपयोगिताही शून्यच!



Powered By Sangraha 9.0